Sunday, December 31, 2017

शुभ नव वर्ष २०१८

माझ्या सर्व वाचकांना वर्ष २०१८ च्या आभाळभर शुभेच्छा! काळ आपण बांधून ठेवू शकत नाही. काळाचे असे दिवस, महिना, वर्षांचे तुकडे माणसानं आपल्या सोयीसाठी पाडलेले आहेत. त्यांतून माणसाचा हिशेबीपणा दिसतो. पण त्याचबरोबर आपण किती जगतो हेही कळतं. याच किती जगण्यात आपण कसं जगतो यालाही महत्त्व आहे. खरंतर सर्वांत जास्त महत्त्व त्यालाच आहे. त्यामुळे मागील वर्षभरांत आपण कसे जगलो याची स्वतःशीच उजळणी करत यावर्षी आपण कसे जगणार आहोत याचा विचार करायचा आहे.
आपण हे वर्ष मानसिक आनंदाला देऊ या. आपल्या रोजच्या आयुष्यातील धावपळीनं आपल्या शरीरावर जितका ताण पडतोय त्याहीपेक्षा जास्त ताण आपल्या मनावर पडत असतो. आणि मनाचं स्वास्थ्य जर उत्तम नसेल तर शरीर स्वस्थ राहू शकत नाही. शरीर स्वस्थ नसेल तर मन आनंदी राहणार नाही. हे एक दुष्ट चक्र आहे. त्याचा भेद करायचा असेल तर मनावरचा हा ताण काढणं शिकायला हवं.
मानसिक ताण केवळ विचारांनी घालवता येऊ शकत नाही. त्यासाठी काही कृती आवश्यक असते. कृतीमुळे आपलं मन गुंतून राहतं आणि नको त्या गोष्टींचा विचार बाजूला पडतो. शरीर कामात गुंतून राहीलं की नको ते विचार करायला वेळ भेटत नाही. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक ठरतात आणि मनावरचा अनावश्यक आणि आरोग्यास अपायकारक ताण दूर होण्यास मदत होते.
यावर्षी निराशेला मनात भाडेकरू म्हणून ठेवू नका. आनंदाला ठेवा. तो तुम्हाला दररोज आनंदाचं भाडं देईल. आनंद असेल तर उत्साह येतो. उत्साह असेल तर मनात सकारात्मक विचार येतात. सकारात्मक विचार प्रयत्न करण्यासाठी आपल्याला प्रेरीत करतात. प्रयत्न असतील तर यशाची शक्यता निर्माण होते. जिथं शक्यता आहे तिथं जगण्यास वाव असतो. निराश मनानं शक्यतेपर्यंतचा प्रवास घडू शकत नाही. आनंदी मनच तुम्हाला या शक्यतेपर्यंत घेऊन जातं.
फार काही करण्याची गरज नाही. मनात निराशा असेल तेव्हा तुमच्या आवडीचं काम करा. थोडे स्वार्थी व्हा. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला आनंद वाटेल अशा गोष्टी करा. तग धरून राहा. परिस्थिती बदलत असते. संधीची वाट बघत राहा. कधीतरी ती मिळेल तेव्हा तिच्यासाठी आजच तयार राहा. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी याचा विचार करा की तुमच्या जाण्यानं जगाचं नुकसान होणार नाही, तुमचं होईल. पण तुमच्या असण्यानं तुमच्यासोबतच कदाचित जगाचंही भलं होण्याची शक्यता आहे. हे जग तुमच्या अवती भवतीच असतं. त्यातला कोणताही कोपरा निवडा आणि ते जग बदलण्यास सुरूवात करा. करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. गरज आहे ती चिकाटीची. धैर्याची. सहनशक्तिची. इन्स्टंट असं जगात काहीच मिळत नाही. इन्स्टंट कॉफीलाही काही वेळ लागतो तयार होण्यासाठी. जगणं तर फार कसोशिनं घडवावं लागतं. पण त्याचे फायदेही तुम्हालाच मिळत असतात.

तेव्हा हे नव वर्ष तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगा. निराशेला, हताशेला, नकारात्मक विचारांना गुडबाय करा आणि उत्साहाला, आनंदाला, सकारात्मकतेला घट्टी मिठी मारा. लेट्स डू इट!

Friday, December 29, 2017

नववर्षाच्या शुभेच्छा- एकमेकांना बळ देण्यासाठी




२०१७ आता संपत आलं आहे. सरत्या वर्षांत आपण काय केलं, काय नाही केलं, काय मिळवलं, काय गमावलं याचा ताळेबंद काही जणांनी आता मांडायला सुरूवात केली असेल. सुखाच्या क्षणांची जशी आठवण येऊन हुरहूर वाटत असेल त्याचप्रमाणे दुःखाचे क्षण आठवून डोळ्यांच्या कडाही ओलावत असतील. सन्मानाचे क्षण मनाला उभारी देतील आणि अपमानाचे क्षण अधिक चांगलं करता येण्यासाठी जिदद् देतील.
जे झालं ते बदलता येत नाही. त्याचे बरे-वाईट परिणाम मात्र न चूकता भोगावेच लागतात. त्यामुळे आपण जे करतो ते करण्याआधी थोडा वेळ थांबून विचार करा. तात्कालिक फायद्याच्या आधारे असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे नंतर तुम्हालाच नुकसान होईल. माणुसकीपेक्षा मोठं असं काही नाही, निसर्गापेक्षा मोठं काही नाही, त्यामुळे तुम्ही असं काहीही करू नका ज्यामुळे उद्या तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. भावनेच्या भरात आपण वाहून जातो आणि तो भर ओसरला की जे झालं त्यानं मन विषण्ण होतं. अशी परिस्थिती स्वतःवर ओढवून घेऊ नका.
आपण एकटे असलो तरी आपण कमकुवत आहोत असा विचार कधी करू नका. तुम्हाला जग बदलायची गरज नाही. स्वतःला बदललं तरी खूप झालं. तुमचं कुटुंब तुमच्याकडे बघून आपोआपच बदलेल. फार तर बाहेर जाऊन तुमच्या परीसरातील कोणत्या गोष्टी बदलता येतील त्याचा विचार करा पण तसं करताना स्वार्थाचा विचार करू नका. प्रसिद्धीसाठी काही करू नका. कच-याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, विजेची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, त्यावर संबंधित अधिका-यांना न घाबरता भेटा, चर्चा करा. तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुमचा मान सर्वोच्च असतो. निवडून दिलेले राजकीय नेतेही तुमच्यामुळेच नेते असतात हे विसरू नका. त्यामुळे त्यांच्याशी समान पातळीवरच वागा. तुम्ही स्वतःला लहान समजलात तर सारे तुम्हाला लहान समजून दाबून टाकतील. तसं होऊ देऊ नका. आपल्या नागरी अधिकारांबाबत कायम जागृत असा.
समाज म्हणून देश म्हणून आपली एकजूट टिकून राहीली तरच व्यक्ति म्हणून तुम्हीही टिकून राहाल. समाजाची देशाची प्रगती होते तेव्हाच व्यक्ति म्हणून तुमचीही प्रगती होते. त्यामुळे असं काहीही करू नका किंवा अशा कोणत्याही गोष्टीला पाठींबा देऊ नका जी समाज विघातक असेल, देशाला अडचणीत आणेल. धर्म, जात, देव या खासगी श्रद्धेच्या बाबी आहेत. त्यावरून एकमेकांचा द्वेष करू नका. त्यांतून काहीही साध्य होत नाही. तुमच्या धार्मिक श्रद्धा, तुमच्या जातीय अस्मिता या देशापेक्षा आणि माणुसकीपेक्षा मोठ्या नाहीत हे विसरू नका.
निसर्गाचा सांभाळ करा. तर निसर्ग तुमचा सांभाळ करेल. माणूस म्हणून एक समंजस विचारी प्राणी म्हणून आपली ही जबाबदारी आहे. निसर्गाची हानी होणार नाही, झालेलं नुकसान भरून येण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. पुढच्या पिढ्यांसाठी हा निसर्ग जपून ठेवा.
मनात आणलं तर खूप काही करता येतं. स्वार्थ सोडला तर मोठमोठ्या गोष्टी मिळवता येतात. एकदा प्रयत्न नक्की करा. इतरांची मदत करून खूप आनंद मिळतो. प्रामाणिकपणे वागून सुखाची झोप लागते. पैसा मिळवण्यासाठी फसवणूकच करावी लागते असा भ्रम मनातून काढून फेका. आयुष्य क्षणिक आहे, अनपेक्षित आहे त्यामुळे उद्याचा विचार करून कायमच आज चांगला जगण्याचा प्रयत्न करा. आपण सारे एकमेकांसाठी आहोत. नव्या वर्षांत या गोष्टी लक्षांत ठेवूया.

तुम्हा सर्वांना वर्ष २०१८ च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Wednesday, December 27, 2017

माणसं-प्राणीसृष्टी-निसर्ग जोपासूया

नवीन वर्ष यायला आता आणखी तीन दिवस बाकी आहेत. नववर्षाचे संकल्प काय असावेत यावर आपण मागे बोललो होतो त्यातला आणखी एक संकल्प मी आज सुचवतोय. या नवीन वर्षांत आपण माणसं जोडूयात, प्राणीसृष्टी जोपासूयात आणि निसर्ग वाढवूयात.
माणसाची खरी संपत्ती पैसा, जमीन, सोनंनाणं ही नसते. ते मूल्यवान असतातच पण माणसाची खरी संपत्ती त्याच्या आयुष्यात आलेली माणसं असतात. ही संपत्ती कधीच नष्ट होत नाही. माणसं जोडणं हे वाटतं तितकं अवघड काम नाही. पण अनेकांना ते अवघड वाटतं कारण साध्यासोप्या गोष्टी करणं ते टाळतात. ते प्रेम करत नाहीत. ते विश्वास ठेवत नाहीत. ते व्यवहार आणि भावना यांची गल्लत करतात. ते मैत्री निभावत नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते माणुसकी पाळत नाहीत. मान्य की आपलं प्रत्येकाशी काही जुळत नाही आणि त्याचा आग्रहही धरण्याची गरज नाही. पण आपण सर्वांशी ओळख तर नक्कीच ठेवू शकतो. इतरांचा सन्मान करा, आदरानं वागा बोला, प्रामाणिक रहा, मदतीला धावून जा, हसून भेटा, या गोष्टी करणं खरंच इतकं कठीण आहे का? मला नाही वाटत तसं. एक साधा नियम आहे की तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला परत मिळतं. तेव्हा काय द्यायचं ते तुम्ही ठरवा.

आपल्या सभोवतालची प्राणीसृष्टी जपण्यासाठीही आपण प्रयत्न करायला हवेत. पण त्याचबरोबर आपल्यापासून दूर राहणा-या प्राणीसृष्टीबद्दलही मनात प्रेमाची आपुलकीचीच भावना ठेवायला हवी. माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी अन्य प्राण्यांवर अत्याचार केले, करत आहेत, त्याची जमिन माणसानं बळकावली आणि जमेल तिथं हे प्राणी कसे आपल्याला त्रास दायक ठरतात याचा तो कांगावा करत राहतो. पण आपण त्यांच्यावर काय अन्याय करत असतो याचा त्याला सोयिस्कर विसर पडतो. ही प्राणीसृष्टी नष्ट झाली तर काय होईल याचा एकदा नक्की विचार करा. तुम्हाला आधी वाटेल की बरं आहे कटकट मिटली. पण या प्राण्यांमुळेच निसर्गाचं चक्र समतोल राहण्यास मदत होत असते. हे प्राणी नष्ट झाले तर हा समतोलही बिघडेल आणि त्याचे घातक परिणाम दिसतील. आपल्या हातानं आपला हा विनाश ओढवून घेऊ नका.
माणसं आहेत ती निसर्गामुळे. हवा. पाणी. सूर्यप्रकाश. आकाश. वनस्पती. जमिन. हे आपल्या जगण्याचे अत्यावश्यक घटक आहेत. ते प्रदुषित करू नका. त्याचे घातक परिणाम आपल्याला माहितच आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही. फार काही करायचं नाही त्यासाठी. फक्त तुम्ही निश्चय करा की मी माझा निसर्ग नष्ट करणार नाही, प्रदुषित करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. निसर्ग प्रदुषित झाला नष्ट झाला तर माणुसही नष्ट होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

आपल्या नव्या वर्षांचं स्वागत आपण या संकल्पानं करू यात. सो लेट्स डू इट!

Monday, December 25, 2017

त्यांना प्रेमाची उब द्या...


हिवाळा आता पूर्ण भरात आहे. पुढील महिन्यांत थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सकाळी उठून वाफाळता चहा कॉफी पिण्याची मजा वेगळीच असते. शिवाय याच दिवसांमध्ये व्यायाम करायचाही दांडगा उत्साह जागा होतो. दिवसभर स्वेटर, शॉल, जॅकेट्स, मफलर, कानटोपी घालून थंडी पळवायचे उपायही शोधायचे आणि रात्री मस्त दोनतीन दुलया, रजाई घेऊन झोपायचं.
पण हे सर्वांसाठीच शक्य असेल असं नाही. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारे लोकही संख्येनं बरेच आहेत ज्यांना घालायला गरम कपडे नाहीत. शेकोटीची उब नाही. वाफाळता चहा नाही. रात्री रजईत, ब्लँकेटमध्ये झोपण्याची त्यांची सोय नाही. या थंडीत त्यांचा विचार करायला विसरू नका. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात. आश्रमशाळा असतील, अनाथालयं असतील, झोपडपट्टीतील लोक असतील, बाहेरून कामासाठी आलेले आणि फुटपाथवर राहणारे लोक असतील, ज्यांच्यासाठी आपण नक्कीच काही करू शकतो. तुम्हाला शक्य असेल तर त्यांच्यासाठी गरम कपडे तुम्ही घेऊ शकता. ते शक्य नसतील तर तुमच्याकडचे वापरात नसलेले कपडे तुम्ही देऊ शकता. प्रेमाची ही उब त्यांना फार मोलाची ठरेल. कुठे वृद्धाश्रम असतील तर तिथल्या वृद्धांसाठी काय करता येईल याचा विचार करा. त्यांना तर कपड्यांसोबत सोबतीचीही उब हवी असते. त्यासाठी फार वेळ लागणार नाही.
समाजात राहताना आपण याचं भान कायम राखायला हवं की जर आपण सुस्थितीत असू तर जे तसे नाहीत त्यांच्यासाठी काही करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती माणुसकीची खूण आहे. त्याची सक्ती कोणावरच नाही पण आपल्या समाधानासाठीच हे सारं करायचं असतं. प्रसिद्धीसाठी नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कारण आपणही कदाचित त्यांच्या जागी असू शकलो असतो. ते झालं नाही याचा जसा आनंद आहे तसंच ज्यांना ते जमलं नाही त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातला सुखातला आनंदातला थोडा भाग वाटून घेणं ही आपली जबाबदारी आहे.

प्रेमाची ही उब देताना आम्ही तुमच्यासोबत आहोत इतका विश्वास जरी त्यांना मिळाला तरी ती मोठी गोष्ट ठरेल. आपण कोणाचंही जगणं बदलू शकत नाही पण आहे त्या जगण्यात काही आनंदाचे क्षण नक्कीच देऊ शकतो. हे आपण कराल, करावं अशी आशा आणि अपेक्षाही आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मावळत्या वर्षांला आपण या काही सुंदर आठवणी भेट म्हणून देऊयात. सो लेट्स डू इट!

Saturday, December 23, 2017

जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे





उद्या नाताळ आहे. त्याच्या सर्वांना शुभेच्छा. जरी मी ख्रिश्चन नाही आणि तुमच्यातले बहुसंख्यही ख्रिश्चन नसले तरीही नाताळच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आपल्या धर्माचा सण नाही उत्सव नाही म्हणून तो करायचा नाही, ज्यांचा तो सण आहे त्यांना त्याच्या शुभेच्छा द्यायच्या नाही ही काही सभ्यता नाही. तशी आपली संस्कृतीही नाही. पण अलिकडच्या काळात तथाकथित धार्मिकांनी तुम्ही जर अन्य धर्मांचं गुणगान कराल तर तुम्ही धर्मद्रोही असे फतवे काढणं सुरू केलं आहे. असले करंटे लोक सर्वंच धर्मांत आढळतात. मला अशा लोकांचा आताशा राग येत नाही. मला त्यांची दया येते. एखादा आजारी माणूस असतो ना तसे हे धर्मांध लोक असतात. आजारी माणूस आपल्या आजारपणामुळे त्रस्त असतो तसे हे त्यांच्या धार्मिक श्रेष्ठगंडानं आजारी असतात. आजारी माणूस चीडचीड करतो पण म्हणून आपण त्याच्यावर ओरडत नाही. तो आजारी आहे म्हणून त्याला सांभाळून घेतो तसंच या धर्मग्रस्त लोकांना सांभाळून घेण्याची गरज आहे. त्यांनी ज्यादा चीडचीड केलीच तर सरळ त्यांच्याकडे दूर्लक्षच करा मग.
या विचार-गरीबांना आपण इतर धर्मियांचा राग करून, हेटाळणी करून कोणत्या आनंदाला मुकतो आहोत याचं भान नसतं. वेगवेगळे धर्म आहेत, जाती आहेत, (आता ते आहेत त्याला नाईलाज आहे) त्यांच्या विविध संस्कृती आहेत त्याचा आनंद घ्यायला हवा. त्यांचे सण असतात, कपडे असतात, खाणं-पिणं असतं, संगित, नाच असतो या सर्वांचा आनंद घ्यायला हवा. पण ते सोडून काही मूर्ख हे आपल्या धर्मात बसत नाही, असल्या आरोळ्या ठोकत राहतात. अशावेळी हमखास त्या धर्मातल्या चूकीच्या गोष्टींचा दाखला देऊन आपलं मनं भडकवली जातात. चूकीच्या गोष्टी काय आपल्या धर्मांत नाहीत? खरं तर धर्म चुकीचे नसतात. माणसं चूकीचं वागत असतात व त्यामुळे धर्म बदनाम होतात.
एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी एकमेकांचा दुस्वास मत्सर करण्यात काही लोकांना जो आनंद मिळतो त्याला निव्वळ विकृती म्हणतात. मला खात्री आहे तुम्ही असे विकृत नाही आहात. तुम्ही उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघणारे आहात. त्यामुळेच प्रत्येक धर्मातील चूकीच्या गोष्टी जशा तुम्हाला दिसतात तशाच चांगल्या योग्य गोष्टीही तुम्हाला दिसतात. त्या चूकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि चांगल्या गोष्टी वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल याची मला आशा आहे.

नाताळच्या निमित्तानं आपण या धर्मांधांना पुन्हा सांगूयात की आमचा प्रेमावर विश्वास आहे. द्वेषावर नाही. सो लेट्स जिंगल द बेल अँड से लेट्स डु इट!

Friday, December 22, 2017

संकल्प नव वर्षांचे


२०१७ संपायला आता अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. लवकरच २०१८ साल सुरू होणार आहे. वर्षाच्या शेवटी आपण सारे जसे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतो तसंच नवीन वर्षांसाठी कोणता संकल्प करायचा यासाठीही विचार करत असतो. मागच्या वर्षी मी २०१७ मध्ये एक कोटी रुपये कमवेन असा संकल्प केला होता. पण तो काही पूर्ण झाला नाही. म्हणून यावर्षीही मी त्याला मुदतवाढ देणार आहे. पण एक आहे की हा संकल्प काही माझ्या आवाक्यातला नाही. म्हणजे एका वर्षांत पूर्ण होईल असा तो नाही. त्यासाठी त्याहून बराच काळ लागेल. ते होत राहील. पण संकल्प करण्यामागे एक स्वतःला प्रोत्साहनं देणं, स्वतःला काही करण्यासाठी प्रेरीत करणं, जे एरव्ही जमत नाही आणि त्यांतून आनंद मिळवणं हा एक भाग असतो. त्यामुळे आपण अशाच काही गोष्टींचा विचार करूयात की ज्या सहज करणं शक्य होतील. मी काही गोष्टी सुचवतोय त्यासाठी. तुम्हीही त्या आवडल्या तर नक्की करा किंवा तुमच्यासाठी नवीन काही संकल्प शोधून काढा. तुमच्या मित्रांसोबत ते वाटून घ्या.
तर या नवीन वर्षासाठी माझे जे संकल्प आहेत ते म्हणजे –
पुस्तकं वाचण्याचा संकल्प. आपण असा संकल्प करूयात की दर महिन्याला किमान ५०० ते १००० रुपयांची पुस्तके मी विकत घेईन. वर्षभरात मी किमान १०० पुस्तके तरी वाचण्याचा प्रयत्न करेन. मग ती वाचनालयातली असतील, मित्रांकडून उधार घेतली असतील किंवा नेटवर ऑनलाईन वाचलेली असोत. या वर्षी मी किमान एका मराठी मासिकाचा वर्गणीदार होईन. मी माझ्या घरीही मराठी वाचनाची आवड वाढेल यासाठी प्रयत्न करेन. मुख्य म्हणजे नव्या पिढीला मराठीची गोडी लागेल यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. मी ज्या कोणत्या समारंभाला उपस्थिती राहीन, वाढदिवस, लग्न, इत्यादी, तिथं पुस्तकांची भेट देईन. वाचलेल्या पुस्तकासोबतची सेल्फी मी सोशल मीडियावर वेळोवेळी टाकत राहीन. किमान पाच लेखकांना भेटून त्यांच्याशी त्यांच्या मी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करेन. इतरत्रही जेव्हा शक्य असेल तेव्हा आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाला मी तसं नक्कीच कळवेन. सोशल मीडियावर माझ्या आवडत्या लेखकांना प्रकाशकांना मी फॉलो करेन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जायचा प्रयत्न करेन. ते शक्य झालं नाही तरी स्थानिक पातळीवरील एखाद्या संमेलनाला तरी नक्कीच उपस्थिती राहीन. साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहिन. माझ्या गावांत शहरांत कोणी मित्र पाहुणा आला तर त्याला इथल्या साहित्य संस्था, पुस्तकांची चांगली दुकानं, गॅलरी, वाचनालयं यांना भेटी द्यायला घेऊन जाईन. कोणी ओळखिचा लेखक असेल तर त्याच्याशीही भेट घडवून देईन.
वाचनसंस्कृती किती खालावली आहे, किती वाईट परिस्थिती आहे पुस्तक विक्रीची, यावर चर्चा करण्यापेक्षा (मी ती करतोच तरीही) मी वरील गोष्टींपैकी जास्तीतजास्त गोष्टी प्रत्यक्षात करण्यासाठी प्रयत्न करेन, अगदी प्रामाणिकपणे मनापासून.

तर हे काही माझे लहान लहान संकल्प आहेत. तुम्हीही तुमचे काही संकल्प ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करा. तर आपली मराठी भाषा वाढवण्यासाठी जोपासण्यासाठी लेट्स डू इट! (शेवटचे तीन शब्द फार मनावर घेऊ नकाः)

Wednesday, December 20, 2017

कंडोम्स बंदी आणि कंडम सरकार

सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यानं नुकताच एक फतवा काढून टीव्हीवर सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत कंडोम्सच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातली. त्यांचं असं म्हणणं आहे की यामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. आपल्या देशात काही वर्षांपासून संस्काराच्या नावाखाली जो अतिशयोक्त विनोद सुरू आहे त्यांतला हा आणखी एक ताजा विनोद आहे. पण त्यावर हसण्याचं धाडस मात्र होत नाही. कारण हा विषय वाटतो तितका गंमतीचा नसून ही गंमत अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे.

मूळात सरकारनं लोकांना संस्कार देण्याचं काम करू नये. पालक आणि त्यांची मुलं यांचा हा खासगी प्रश्न आहे. पण सरकार सध्या सर्वांनाच संस्कारी करण्याच्या मागे लागली आहे. संस्काराच्या या वावटळीत लैंगिकतेचा कायमच पहिला बळी जात असतो. ज्या शारिरीक कृतीमुळे आपण अस्तित्त्वात आहोत त्या कृतीबद्दल आपल्या मनात इतकी लाज, संकोच, भिती, न्यूनगंड जर असेल तर आधी आपण आपली मानसिक तपासनी करून घेणं योग्य राहील. एका नैसर्गिक आरोग्यदायी घटनेवर या ना त्या कारणानं बंदी टाकून आपण अनेक नव्या समस्यांना जन्म देत असतो यावर विचार करण्याची गरज आहे.
भारताची प्रचंड लोकसंख्या हा काही छाती ठोकून अभिमानानं मिरवण्याचा विषय नाही. ती एक अत्यंत मूलभूत, गंभीर, जीवघेणी नागरी समस्या आहे जिला खरं तर सर्वोच्च प्राधान्य असायला हवं. पण आपल्या या तथाकथित संस्कारांच्या नावावर तिच्याकडे कायम हेटाळणी, चेष्टा, आणि आता संस्कार घातकी म्हणून पाहिलं जात आहे. हा निव्वळ बालीशपणा आहे की कंडोम्सच्या जाहिराती पाहिल्यामुळे मुलांवर कुसंस्कार होतात. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की सरकारला माणसाच्या जैविक, शारिरीक, मानसिक, भावनिक अवस्थांविषयी, वर्तणुकींविषयी काडीचीही माहिती नाही. एरव्ही त्यांनी असली मूर्खपणाची विधानं केलीं नसती. त्यांच्या या तर्काचा आधार घ्यायचा तर पूर्वी जगात सारं काही सुरळीत होतं आणि मुलं आभाळातून टपकायची आणि लोक त्यांना घरी घेऊन यायचे असा होईल. मुलांनी काही पाहिलं नाही तर त्यांच्यात लैंगिक भावना निर्माण होणार नाहीत असा त्यांचा समज आहे असं जाणवतं. निसर्ग काहीच करत नाही केवळ यांचे संस्कारच सारं काही करतं किंवा करत नाही अशी यांची खात्री आहे. कोणी किती अतार्कीक वागू शकतो याचं हे उत्तम उदाहरण सांगता येईल.

आपल्या देशात लैंगिक शिक्षणाची प्रचंड गरज आहे पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी, कंडोम्सच्या जाहिरातींवर बंदी घालणं म्हणजे तोंड वेडंवाकडं दिसतं म्हणून जेवणच करायचं नाही असा काहीसा प्रकार आहे. या जाहिराती पाहून दहा टक्के मुलांनी जरी कंडोम्स वापरले तरी कुमारी मातांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, सेक्ससाठी कंडोम्स आवश्यक आहे हे समजलं तर त्यांतून उद्भवणारे अनेक रोग वेळीच रोखले जातील. सरकारला जर अशी भिती असेल की यामुळे मुलं मुक्तपणे सेक्सकडे वळतील तर त्यानं घाबरण्याची गरज नाही. मुक्त लैंगिकतेमुळे कोणताही समाज लयास गेला नाही. त्याची कारणं वेगळी असतात. त्यामुळे अशा भंपक कृती करणं सरकारनं टाळावं हे योग्य. 

कापडी पिशव्या आणि पर्यावरण रक्षण

एका साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी आपण आज बोलूयात. पर्यावरण हा आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अत्यावश्यक असा महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय माणूस आणि अन्य कोणतीही सजीव सृष्टी जगूच शकणार नाही. पण असं दिसतंय की या पर्यावरणाचं नुकसान करण्यांत आपण खूपच आघाडी घेतली आहे. आपण त्यात आता इतके अनुभवी झालो आहोत की या गोष्टींचं आपल्याला आता काही वाटेनासं झालंय. कित्येकदा कळत आणि बहुतेकदा नकळतच आपण या गोष्टी करतो. त्यामुळे आपण पर्यावरणाची हानी करतोय ही जाणीवही आपल्याला होत नाही. ही यातली सर्वांत भयानक गोष्ट आहे. जर आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय ही जाणीवच आपल्याला होत नसेल तर मग आपण पर्यावरणाचं रक्षण करण्याचं मनात आणणार तरी कसं?

ही जाणीव मग पर्यावरणच आपल्याला करून देते. मुंबईत नुकताच मुसळधार पाऊस झाला होता. ज्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं. हे सारं पाणी जे समुद्रात जाणं अपेक्षीत होतं तसं मात्र ते गेलं नाही. कारण ज्या गटारींतून ते पाणी वाहणं अपेक्षित होत्या त्या तुंबल्या होत्या. त्या तुंबल्या होत्या त्यांत साठलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे. प्लास्टिक सडत नाही त्यामुळे ते नाश पावत नाही. त्यामुळे ते जिथं कुठे असेल तिथं केवळ नुकसान करण्यापलीकडे काहीच करत नाही. ते उकीरड्यावर राहीलं तर गाई-म्हशी-शेळ्या ते प्लास्टिक खातात आणि त्याचे गोळे त्यांच्या पोटात साठत राहतात. प्लास्टिक गटारात गेलं की पाणी अडून राहतं. ते समुद्रात गेलं की मासे त्यात अडकून राहतात. जेव्हा वादळं येतात तेव्हा समुद्रातला हा प्लास्टिक कचरा पुन्हा आपल्याकडेच फेकला जातो. जमिनीत प्लास्टिक मुरलं की जमिनीचा कस निघून जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाचं केवळ आणि केवळ नुकसानच होतं आणि वर्षानुवर्षँ ते तसंच होत राहतं कारण ते सडत नाही. कारण आपण प्लास्टिक पिशव्या वापरत राहतो म्हणून.
पर्यावरण रक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे आपण सामान्य गोष्टीच करायच्या आहेत. मोठ्या गोष्टी आपण सरकार आणि निसर्ग यांच्यावर सोपवूयात. आपण काय करू शकतो –
१-       आजपासून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या वापरणं पूर्णपणे बंद करू शकतो. त्याऐवजी कापडी आणि कागदी पिशव्या वापरू शकतो.
२-       प्लास्टिकचा कचरा कमीतकमी होईल याची काळजी घेऊ शकतो.
३-       प्लास्टिकच्या पिशव्या आपण गटारं, समुद्र, नद्या, तळी, विहीरीत टाकण्यापासून स्वतःला आणि इतरांना थांबवू शकतो.

सुरूवात म्हणून आपण या तीन साध्या गोष्टी करू शकतो. तेवढं केलं तरी विश्वास ठेवा की आपण पर्यावरण रक्षणात एक मोठी मजल मारू शकतो. तेव्हा लेट्स डू इट!

Tuesday, October 31, 2017

वाद राष्ट्रगीताचा आणि देशभक्ती सिद्ध करण्याचा...

सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी एका याचिकेवर निकाल देताना असं म्हटलं की चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असतांना उभं राहण्याची आवश्यकता नाही. तशी सक्ती कोणावर करता येणार नाही. राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहीलं नाही म्हणून अनेक लोकांना मारहाण झाली होती. स्वतःला देशभक्त समजणा-यांनी या तथाकथित देशद्रोह्यांना मारलं होतं. पण असं करताना संबंधीत व्यक्ति का उभी राहिली नाही याचा विचार करण्याची त्यांना गरज वाटली नव्हती. अर्थात हा सर्व सध्याच्या निर्लज्ज देशभक्तीपर राजकारणाचा एक भाग आहे हे सांगायलाच नको. त्यामुळे या अतिरेकी देशभक्तांना न्यायालयानं चांगली तोंडात मारली ते बरंच झालं.
पण तरीही या विषयावर आपण थोडी चर्चा करणं गरजेचं आहे. राष्ट्रगीत सुरू असताना आपल्यापैकी सारेच उभे राहतात यात मला शंका नाही. जे उभे राहू शकत नाहीत त्यांना तशी कारणंही असतील. ते आजारी असतील, दिव्यांग असतील. पण तेही सावध असतील. शांत असतील. राष्ट्रगीताचा आदर करणं हा महत्त्वाचा भाग असतो जो या कृतींतून दिसून येतो जसा तो उभं राहण्यांतून दिसू येतो. आदर दाखवणं महत्त्वाचं त्यासाठी उभंच राहावं हे काही गरजेचं नसतं. हा आदर आपण सारेच भारतीय दाखवतो.
दुसरा मुद्दा असतो प्रेमाचा. देशावर आपलं प्रेम असतं. हे प्रेम व्यक्त करताना दरवेळी सावधान स्थितीत राहणं गरजेचं नसतं. खेळात जेव्हा आपण जिंकतो आणि राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा खेळाडू, त्यांचे समर्थक भारावून आनंदानं मैदानात फे-या मारतात तेव्हा त्यात राष्ट्रगीताचा अनादर होत नाही. ते प्रेम असतं. ही गोष्ट कोणी विसरायला नको. तसं करणं चूकीचं नाही. घरी टीव्ही बघताना एखाद्या कार्यक्रमांत राष्ट्रगीत सुरू असतं, तेव्हाही ताडकन उभं राहण्याची गरज नसते. आपण आपल्या कामांत असतो. अशावेळी आपण सावध झालो नाही म्हणून आपण राष्ट्रगीताचा अनादर करतो असं नसतं. आदर व प्रेम मनात असला की तो कृतीतून येतोच पण जेव्हा तो तसा येत नाही तेव्हा तो आदर व प्रेम नसतो असं मानायचं काही कारण नाही.

राष्ट्रगीताचं गांभीर्य राहायला हवं म्हणून काही नियम आहेत आणि त्यासाठी काही खास प्रसंग असतात जिथे ते पाळते जातात आणि पाळले गेलेच पाहिजेत. उदा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी किंवा एखाद्या कार्यक्रमांत. राष्ट्रगीतासोबतच वंदे मातरम् म्हणतानाही हा आदर दाखवायला हवा. तो दाखवतोही आपण. काही मुसलमानांना जरी धार्मिक कारणावरून वंदे मातरम् म्हणायला आक्षेप असला तरीही त्यांची संख्या अत्यल्प आहे. आपण त्यांच्याही मताचा आदर करायला हवा. कारण केवळ वंदे मातरम् म्हणत नाही म्हणून ते देशद्रोही होत नाहीत. सर्वसामान्य मुसलमानाला तर त्याविषयी काही आपत्ती नसते. त्याचं या देशावरचं प्रेम, आदर इतरांच्या तुलनेत कधीच कमी नसतं. पण जेव्हा यात राजकारण व धर्म शिरतो तेव्हा अडचणी सुरु होतात. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे हा प्रकार सुरू झाला आहे. पण सुजाण लोक त्याला विरोध करतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. सर्वोच्च न्यायालयानंही ही बाब अधोरेखित केली आहे. 

Wednesday, September 27, 2017

बेटी पढाओ और फिर उसकी पिटो...

उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठात एका मुलीवर मागिल आठवड्यात काही गुंडांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत तक्रार केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं काही कारवाई करण्याऐवजी त्या मुलींवरच तुम्हीच या प्रकाराला जबाबदार कसे आहात हे सांगितलं. त्यानंतर या मुलींनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांतून आपल्या तथाकथित उच्च संस्कृतीचा बुरखा पुन्हा एकदा फाडला गेला. आपली मनोवृत्ती अजूनही किती कोती आहे, आपला समाज अजूनही किती पुरुषी आहे आणि स्त्रियांबाबत घडलेल्या कोणत्याही अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरच कशी शिताफिनं ढकलण्यात येते हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एकीकडे मुलींना शिकवा, वाढवा, त्यांना मोकळं जगू द्या अशा घोषणांचा पाऊस पडतो तर दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली त्यांच्यावर भेदभाव करण्यात येतो. त्यांच्यावर या ना त्या कारणानं वेगवेगळी बंधनं टाकण्यात येतात. काही अनुचित गोष्टी घडल्या तर त्यासाठी पुन्हा त्यांनाच जबाबदार धरण्यात येतं. हे आपण कितीकाळ सहन करणार हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. स्त्रियांच्या सहनशक्तिची परिक्षा बघू नका. त्यांनी जर आपली मर्यादा ओलांडली तर त्यांच्यापुढे सारा समाज वाहून जाईल. आपल्या समाजाची जी काही चांगली सभ्यता, संस्कृती, परंपरा आहे ती टिकवण्यात या स्त्रियांचाच मोठा सहभाग आहे. पण त्यांनाच त्यांचा सर्वांत मोठा फटका बसत आला आहे. त्यामुळे स्त्रियांनी जर हे सभ्यता-संस्कृतीचं जोखड फेकून दिलं तर सारा समाजच रसातळाला जाईल. ही वेळ त्यांच्यावर येणार नाही यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. स्वातंत्र्य हे विनाशर्त द्यायला हवं. जबाबदारीचं भान ठेवणं योग्यच आहे पण त्यासाठी आपणही आपली जबाबदारी पूर्ण करण्याची गरज आहे. ही जबाबदारी आहे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान ठेवण्याची. त्यांना स्वातंत्र्य देऊन आपण त्यांच्यावर नाही तर स्वतःवर उपकार करत आहोत हे लक्षात ठेवा. कारण स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व हे पुरुषालाही सहाय्यक ठरतं. तिचं सक्षम असणं म्हणजे समाजाची शक्ति वाढणं. याचा विसर पडू देऊ नका. 

Monday, September 18, 2017

चला आनंद वाटूया...

लोकांना आनंद देण्याचे अनेक प्रकार आहेत. पण एक वाचक आणि लेखक म्हणून मला इतरांना आनंदी करण्याचा मार्ग त्यांच्याशी पुस्तकांबदद्ल बोलणं हा वाटतो. मी ज्यांना भेटतो त्यांना मी वाचलेल्या पुस्तकांची माहिती देतो, त्यांनी काय वाचन केलं ते जाणून घेतो, माझ्या लिखाणाची चर्चा करतो, त्यांच्याकडून त्यावर मतं मागवतो. माझ्यासाठी पुस्तकांसंबंधीचं कसलंही बोलणं आनंदाचं असतं. दुर्देव्यावं आपल्याकडे हा आनंद देणारे आणि घेणारे यांची संख्या फारच कमी आहे. वाचनाची अभिरूची असणं हे मानवतेचंही एक दृष्य लक्षण असतं. ते केवळ मनोरंजन नाही तर माणूस घडवण्याचं माध्यम आहे त्यामुळे वाचन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असायलाच हवा. त्यासाठी जमेल ते सर्व प्रयत्न आपण करायलाच हवेत.
हाच उद्देश मनात घेऊन पुण्यात काही उत्साही लोकांनी बिईंग फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली आहे. लोकांना पुस्तकं वाटून त्यांना आनंदी करायचं हा त्यामागचा उद्देश. आणि आनंदी करण्यासाठी लहान मुलांइतकं पात्र कोण असणार बरं? त्यामुळे लहान मुलांना आनंदी करण्याचा वसा या लोकांनी उचलला आहे. पुस्तकं देऊन या मुलांच्या चेह-यावर हसू फुलवण्याचं काम ही मंडळी करत आहे. त्यासाठी त्यांनी वन बुक वन स्माईल नावाची मस्त योजना सुरू केली आहे. यात तुम्ही काय करायचं तर तुमच्या जवळचे इकडे तिकडे उगाच खर्च होणारे जे पैसे आहेत त्यांतले फक्त थोडेच (तुम्ही जास्तही देऊ शकता – त्यावर काही बंधन नाही J)  तुम्ही या मंडळींना द्यायचे. त्यांतून काही सुंदर पुस्तकं विकत घेऊन ते काही गरजू मुलांना देतील. त्यांची तुम्हाला भेटही घडवून आणतील. तुम्हाला पुस्तकं द्यायची असतील तर तुम्ही पुस्तकंही देऊ शकता. मी खाली संस्थेची माहिती दिली आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तिथं जाऊन हे आनंदाचं काम नक्की करावं.
Being Foundation
A-3/4, Nimbaj Nagar, Nr. Nirmal Township,
Sinhagad Road, Pune, Maharshtra. India
Reg. No.: Maha./377/2016/PUNE
Account Name: Being Foundation
Account Number: 60246701066
Bank: Bank of Maharashtra
Branch: Pimplesaudagar (1443)
IFSC Code: MAHB0001443
MICR Code: 411014110
CREATE A SMILE: +919075091815  Pune 411027. (Maharashtra)

IMP Note: Once you gift the amount through net banking it is kind request to all of you to
please share your details on below email ID. Name, PAN, Mobile, NEFT Details.


1book1smile@gmail.com

Thursday, September 14, 2017

कृतिशील श्राद्धाची गरज

सध्या सगळीकडे श्राद्धाची धुमशान सुरू आहे. त्यामुळे कावळ्यांना आणि स्मशान पंडितांना चांगले दिवस आले आहेत. कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी एकीकडे निसर्गाची हानी करायची, कावळ्यांची घरटी असणारी झाडं तोडून टाकायचीं आणि मग वर्षातले काही दिवस याच कावळ्यांनी पिंडाला शिवायचं म्हणून त्याची वाट बघायची हा निव्वळ निर्लज्जपणा आहे. माणूस मेला की संपतो व त्याच्या आठवणी तेवढ्या मागे राहतात. त्याची आठवण टिकवून ठेवण्याच्या अनेक विधायक गोष्टी करता येत असताना असले काही उद्योग करायचे आणि वर स्वतःला विज्ञानवादी, सुशिक्षित, सुसंस्कृत समजायचं हा दुटप्पीपणा आपल्या लोकांना फार चांगला जमतो. त्यांना कितीही सांगितलं तरी ते सुधारणार नाहीत पण तरीही त्यांना सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून सांगतो. गेलेल्या माणसाची स्मृती टिकवून ठेवणं, त्याच्या चांगल्या कृत्याची आठवण ठेवणं, त्याच्याप्रती कृतज्ञता बाळगणं हा श्राद्धामागचा एक हेतू आहे. त्यासाठी आपण काळानुरूप काही चांगले बदल केले तर त्याचा खरंच समाजाला उपयोग होईल, तुम्हाला समाधान लाभेल आणि गेलेल्या माणसाचं नाव चांगल्या गोष्टीसाठी टिकून राहील.


श्राद्धाच्या निमित्तानं कोणाला पुजा करायची असलीच तर जरूर करा पण त्यासोबत मृताच्या नावानं काही चांगला उपक्रम राबवलात तर त्याला अधिक चांगला अर्थ लाभेल आणि ख-या अर्थानं त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. मृताच्या नावानं झाडं लावली किंवा ज्या संस्था झाडं लावतात त्यांना आर्थिक मदत केली तर तुम्हाला निसर्ग वाढवण्याचं पुण्य मिळेल. मृताच्या नावानं गरजू मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा. त्यामुळे कोणा पात्र माणसाला मदत केल्याचं पुण्य लाभेल. मृताच्या नावानं काही सामाजिक संस्थांना तुम्ही शक्य असेल तितकी आर्थिक मदत करू शकता. त्यामुळे मृताचं नाव टिकून राहिल. आपल्या श्रद्धांना आधुनिकतेची जोड दिली आणि काळानुरूप योग्य ते बदल केलेत तर परंपराही टिकून राहते आणि कर्मकांडांतलं थोतांडही दूर होण्यास मदत होते. सो लेट्स डू इट!

Sunday, June 18, 2017

#कचराबंदी

मोहम्मद अली पाशा (थोर) जेव्हा राज्यकारभार बघू लागला तेव्हा सबंध कैरो शहर गलिच्छ उकिरड्यांनी भरलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने हुकूम काढून प्रत्येक घरमालकाला त्याच्या त्याच्या घरासमोरच्या रस्त्याच्या स्वच्छतेबद्दल जबाबदार धरावे असे फर्मावले. या हुकूमाचा भंग करणा-यांच्या घरावर जप्ती आणण्यात येईल ही शिक्षाही हुकूमात होती. काही जणांना अशा शिक्षा झाल्यानंतर कैरो शहर अगदी लख्ख झाले. आणि त्याचा एक फायदा म्हणजे त्या शहरी कधीही प्लेगची साथ आलेली नाही. ही टीप मी तांजिए येथून लिहित आहे. येथे एखाद्या मोहम्मद अली पाशाची फारच गरज आहे.
अरेबियन नाईट्स – रिचर्ड बर्टन , अनुवाद गौरी देशपांडे, खंड १२

महान भटक्या प्रवासी आणि धाडसी संशोधक सर रिचर्ज एफ. बर्टन यांनी लिहिलेली ही टीप आहे तेराव्या शतकातील एका पाशाच्या काळातली. शेवटास बर्टन जी अपेक्षा करतात ती आपणही करायला हरकत नाही. मोदींनी नोटाबंदी आणली तशीच कचराबंदी आणली (पण योग्य ती पूर्वतयारी करूनच) तर तो एक अतिशय चांगला निर्णय ठरेल. फक्त स्वच्छ भारताचं आवाहन करून आणि साफसफाईची नाटकं करून भारत स्वच्छ होणार नाही. आपल्या देशातले लोक कमालीचे दांभिक आहेत. वैयक्तिक स्वच्छता पाळण्यात अगदी पवित्रतेचा कळस ते गाठतात पण सार्वजनिक आयुष्यात याच्या अगदी उलट टोक गाठतात. रस्ता, सार्वजनिक जागा या आपल्या बापानं आपल्यासाठी वंशपरंपरागत सोडलेल्या मालकीच्या उकिरड्याच्या जागा असल्यासारख्या सारे त्यांचा कचरा फेकण्यासाठी उपयोग करतात. थुंकण्यासाठी उपयोग करतात. हगण्यासाठी, मुतण्यासाठी, आणि कुत्रे हगवण्यासाठीही रस्त्यांचा आणि मिळेल त्या जागेचा उपयोग केला जातो. कोणतीही जागा स्वच्छ राहता कामा नये अशी जणू काही प्रतिज्ञा घेतल्याप्रमाणे काही लोक आख्खं शहर घाणेरडं करीत हिंडत असतात. या लोकांना आपल्या कच-याचा मोबदला द्यायची इच्छा नसते. त्यांचा हा कचरा साफ करणा-या लोकांबद्दल यांच्या मनात आदर नसतो. कोणी त्यांना हटकलं तर ते लगेच मारामारीवर येतात. रस्ता असो, मैदानं असो, पदपथ असो, सार्वजनिक बागा, इमारती, गच्ची, जिने, गॅलरी, छतं, आवार, चौक, कुठलीही जागा यांना वर्ज्य नाही. अशा लोकांना आळा घालायचा असेल तर आता मोहम्मद अली पाशाप्रमाणेच व्यवस्था करायला हवी. ज्यानं त्यानं आपला परिसर स्वच्छ ठेवायचा, कचरा करायचा नाही, होऊ द्यायचा नाही. त्यात जी मदत लागेल ती शासकिय संस्थांनी करावी. जे हे करणार नाहीत त्यांच्याकडून जबरी दंड वसूल करण्यात यावा. आपले लोक इतके निर्लज्ज आहेत की त्यांना फटके आणि तेही सतत, बसल्याशिवाय ते काही सुधारणार नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. विदेशांत गेल्यावर जे लोक तिथली स्वच्छता पाळतात आणि त्याविषयी इथं आल्यावर कौतुकानं सांगतात तेच लोक इथं मात्र पुन्हा घाण करण्यात व्यस्त होतात. या मानसिकतेचं काय करायचं हा प्रश्नच आहे. स्वच्छता हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसतो तर तो शहर सौंदर्याचाही असतो. त्यावरून इतरांना आपल्या राष्ट्रीय चारित्र्याविषयी कळतं. शिस्तीविषयी समजतं आणि देशाप्रती आपण किती जबाबदार आहोत हेही दिसतं. पण आपल्या इथं या सर्वांचा अभाव आहे. शासनानं कचराबंदी लागू करण्याची वाट न बघता आपणच आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यासाठी खालील गोष्टी करता येईल. त्यात यश कितपत मिळेल याचा विचार न करता त्याविषयी प्रयत्न सुरू करणं महत्त्वाचं. आपण आशा करूयात की लोक स्वतःहून या गोष्टीला प्राधान्य देतील. यात लोकांशिवाय लोक प्रतिनिधींनाही सामावून घेता येतील.
-    घरातला कचरा कचराकुंडीतच टाका, सोसायटीच्या आवारात, आपल्या खाली राहणा-या लोकांच्या घराच्या छतावर टाकू नका.
-    शक्य असेल तर सोसायटीत कचरा जिरवण्याचा प्रकल्प सुरू करा.
-    तुम्ही जिथं राहता तिथला रस्ता साफ राहील याची काळजी घ्या.
-    कुत्रे फिरवणा-या लोकांना भेटून त्यांना त्यांच्या कुत्र्यांना रस्तावर हगवण्यापासून थोपवा.
-    दुकानदार, इतर व्यापारी मंडळी यांना भेटून त्यांना त्यांच्या कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता कर्मचा-यांना मदत करण्यासाठी आवाहन करा. दुकानाच्या समोर कच-याचे डबे राहतील व ते कुत्र्यांपासून सुरक्षित राहतील याचीही काळजी घ्या.
-    लोक प्रतिनिधींना, स्थानिक नगरसेवकाला भेटून त्याची काही मदत मिळेल यासाठी प्रयत्न करा.

एकदा सुरूवात करूयात आणि लोकांना त्याची सवय लागली की हळूहळू बदल नक्कीच घडतो यावर माझा विश्वास आहे. आपण आपल्यापासून याची सुरूवात करूयात. त्याचे अनुभव इथे तुम्ही शेअर केलेत तर इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल. सो लेट्स डू इट!

Thursday, June 15, 2017

#जातपंचायत

जात पंचायत आणि आनंदाची बातमी या परस्परविरोधी गोष्टी आहेत असा समज या पंचायतींनीच आपल्याला त्यांच्या निर्णयांतून करून दिला आहे. खाप पंचायत असो किंवा आपल्या जात पंचायती असोत किंवा फतवे देणारे इमाम असो चूकीचे निर्णय कसे द्यायचे याचा आदर्शच ते दरवेळी घालून देतात. त्याची आपल्याला माहिती आहे कारण वर्तमानपत्रांतून त्याची प्रसिद्धी होत असते. पण जेव्हा एखादी चांगली गोष्ट चांगला निर्णय यांच्याकडून घेतला जातो तेव्हा मात्र आपल्याला सहसा त्याची माहिती होत नाही कारण त्याला तेवढी प्रसिद्धी मिळत नाही दिली जात नाही. वर्तमानपत्रे एरव्ही जे जात पंचायतीवर तुटून पडतात ते त्यांच्या चांगल्या कामाच्यावेळी मात्र मागेच राहतात. त्याला नकारात्मक बातम्यांना दिली जाणारी पहिल्या पानाची जागा मिळत नाही. हे बदलावं ही अपेक्षा. हे सारं ज्यासाठी लिहितोय त्याबद्दल आता.
महाराष्ट्र टाईम्समध्ये १३ जून २०१७ रोजी १३ व्या पानावर एक बातमी आली होती. अगदी छोटीशी. उत्तर प्रदेशातील संभळ गावात तूर्क जातपंचायतीने तिहेरी तलाकच्या बाबतीत आदर्शवत निर्णय घेतला आहे. तूर्क जातीतील एका माणसानं लग्न केल्यानंतर १० दिवसांच्या आतच तिहेरी तलाक देत आपल्या पत्नीला माहेरी पाठवलं आणि तिची मेहरची रक्कमही दिली नाही. तिच्या घरच्यांनी त्याविरोधात न्यायालयात न जाता जात पंचायतीकडे धाव घेतली. कारण काही दिवसांपूर्वीच तूर्क जात पंचायतीने तलाकच्या अशा पद्धतीवर बंदी घातली होती. त्यांनी या माणसाला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला शिवाय तिच्या मेहरची रक्कमही तिला परत करण्यास सांगितलं. या निर्णयासाठी आधी या जात पंचायतीचं अभिनंदन. त्या मुलीच्या घरच्यांचंही अभिनंदन ज्यांनी तिची बाजू उचलून धरली.

तिहेरी तलाकचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयांत आहे. त्यावर जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल. पण तूर्क जात पंचायतीमध्ये यावर एक योग्य निर्णय घेण्यात आला. त्यात पैसा वेळ खर्च झाला नसेल अशी आशा आहे. न्यायालयीन प्रक्रियेत हे कधी झालं असतं याची कल्पना करणं कठीण नाही. समंजसपणाची भूमिका घेतली तर न्यायालयापर्यंत अशा गोष्टी जाणारच नाहीत. पूर्वी गावांमध्ये अशा पंचायती होत्या आजही आहेत आणि त्यांच्यातच न्यायनिवाडा केला जायचा ज्यामुळे न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ यायची नाही. पण ही एक चांगली व्यवस्था काळाच्या ओघात किडली सडली. त्यात सुधारणा करावी असंही कोणाला वाटत नाही. त्यामुळे जात पंचायत आज बदनाम झाली आहे आणि त्याला तेच लोक जबाबदार आहेत. पण हेच लोक तिला पुन्हा तिची प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात. त्यासाठी त्यांनी कालसुसंगत माणुसकीचा गौरव वाढवणारे बदल करायला हवेत व तसे निर्णय घ्यायला हवेत. त्यामुळे लोकांचा न्यायालयांत खर्च होणार पैसा, वेळ खर्च होणार नाही आणि मानसिक व शारिरीक त्रासही कमी होईल. आपण फक्त आशा करू शकतो की अन्य जातपंचायतीही याचा आदर्श घेतील. 

Monday, June 12, 2017

#लग्नाआधी...

लग्नाची एक व्याख्या ही, लग्न हा एक सामाजिक करार आहे, अशी आहे. जिथं करार असतो तिथं काही कलमं असतात, नियम असतात आणि लग्न झाल्यानंतर संसार करताना त्या नियमांचं कलमांचं पालन व्हावं अशी अपेक्षा असते. आपल्या हिंदू संस्कृतीत सप्तपदीच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्यांत उत्तम पद्धतीनं या अपेक्षांची माहिती वधुवरांना करून दिली जाते. अर्थात हे मंत्र संस्कृतमध्ये आहेत व ते समजावून सांगण्याची जबाबदारी ना पंडित घेत ना ते समजून घेण्याची काळजी वधुवर घेत. असो. आजचा विषय आहे लग्नाआधी काय काळजी घ्यावी यासंबंधीचा. आपल्याकडे लग्नाआधी ज्या गोष्टी केल्या जातात त्यात मुलाची चौकशी, त्याच्या घरच्यांची चौकशी केली जाते. मुलाला नोकरी आहे का, पगार काय, नोकरी टिकावू आहे का, त्याचं वय काय, त्याला व्यसनं आहेत का, त्याच्या घरी शेती आहे का, स्वतःचं घर आहे का, अशा साधारण चौकशा केल्या जातात. तर मुलीकडे ती गोरी आहे का, तिचा बाप श्रीमंत आहे का या दोन गोष्टींची बहुधा चौकशी केली जाते. यातही लोक भरपूर खोटं बोलतात. आपल्या इथली जवळपास सारी लग्नं खोट्यावर बेतलेली असतात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. या खोट्या गोष्टींमध्ये मुलांच्या बाजूनं, त्यांची नोकरी, पगार, व्यसनं, आरोग्य इत्यादी गोष्टी लपवल्या जातात तर मुलीच्या बाजूने तिचं वय, आरोग्याची स्थिती, तिची लफडी, शिक्षण अशा गोष्टी साधारणपणे लपवण्यात येतात. यात दोन्ही बाजूंचा एकच विचार असतो की आधी लग्न होऊ द्या, ते झालं की जी काय समस्या असेल ती ते लोक बघून घेतील. आधीच जर सा-या गोष्टी सांगितल्या तर लग्न होणंच कठीण होऊन बसेल. पण या मानसिकतेमुळे असंख्य संसार नंतर उध्वस्त होतात.
आता काळ बदलत आहे त्यामुळे लग्नाआधी करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यात काही बदल होणं आवश्यक आहे.
१-       आपण लग्नासाठी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम आहोत का हे आधी बघणं व त्याची माहिती समोरच्या पक्षाला देणं. शारिरीक गोष्टींमध्ये तुम्हाला काही रोग आहेत का, घरी काही अनुवंशीक रोग आहेत का याबरोबरच काही महत्त्वाच्या चाचण्या करणंही गरजेचं आहे. यातली सर्वांत महत्त्वाची चाचणी आहे एडस् या रोगाची. सिकलसेल हा आणखी एक रोग आहे. थॅलसिमियाही. हे दोन्ही रोग टाळण्यासाठी मुलामुलींचे रक्तगट एकमेकांना पुरक आहेत ना हे बघणं गरजेचं असतं. आणखी एक बाब म्हणजे मुलगी मुलगी एकमेकांनी लैंगिक सुख देण्यास सक्षम आहेत की नाही हे बघणं.  पुरुष असतील तर त्यांनी त्यांचा स्पर्म काउंट घेणं गरजेचं आहे. स्त्रीयांनी त्या मूल धारण करण्यास सक्षम आहेत का ते पहाणं गरजेचं आहे. मानसिक बाबींमध्ये अनुवंशीक मानसिक रोग आहेत का याची चौकशी करणं महत्त्वाचं ठरेल. या सर्व गोष्टी तपासून एकमेकांना शेअर करायला हव्यात.
२-       दुसरी गोष्टी आहे तुमची आर्थिक परिस्थिती जशी आहे तशी ती सांगणं.
३-       तुमचं शिक्षण वय याची खरी माहिती देणं.
४-       घरासंबंधीची खरी माहिती देणं.
५-       तुमच्या भविष्यातील योजनांची माहिती देणं.
अलीकडेच परेश मोकाशी यांचा चि. व चि. सौ. कां. हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात लग्नाआधी मुलगी आपल्या भावी सासरी राहायला जाते. माझ्या मनात हीच कल्पना होती आणि त्यावर चित्रपट काढला म्हणून परेशजींचं अभिनंदन. मुलींना लग्नानंतर एकदम हजारो गोष्टींशी तडजोड करत जगावं लागतं त्याचे किती भयानक परिणाम त्यांच्यावर होतात याची कल्पनाही करवत नाही. आपण दुस-याच्या घरी कधी गेलो तर तिथं रात्री झोपही लागत नाही. कारण वातावरण बदललेलं असतं. त्यामुळे मुलींना लग्नाआधी त्यांच्या सासरी जर महिनाभर राहता आलं तर त्यांची मानसिक तयारी होऊ शकते आणि एकमेकांशी मोकळा संवाद साधता येऊन अधिक गोष्टी समजून घेता येतात. यात अर्थात दोन्ही पक्ष किती समंजस आहेत यावरच अशा गोष्टींचं यशापयश ठरतं. पण हे व्हायला हरकत नाही.

आता वर सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे फार लोक अंमलात आणणार नाहीत हे उघड सत्य आहे. तशा गोष्टी सांगितल्या तर होऊ घातलेली साठसत्तर टक्के लग्नं मोडतील यात शंका नाही. पण नंतर संसार मोडून आयुष्य उध्वस्त होण्यापेक्षा लग्न मोडणं कधीही चांगलं. हाही मुद्दा लक्षांत घ्यायला हवा की कोणीही परिपूर्ण नसतो त्यामुळे त्याचा हव्यास धरू नये पण किमान प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं चूकीचं ठरणार नाहीत. प्रश्न सांगितले तर त्यावर काही उपाय करता येऊ शकतात, मुख्य म्हणजे फसवणूक अपेक्षाभंग टळतो. त्यामुळे नवीन पिढीनं यावर जरा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आशा करणं चूकीचं होणार नाही. काही विवाहसंस्थांमध्ये अशा गोष्टींवर भर दिला जातोय ही चांगली गोष्ट आहे पण त्याचं प्रमाण अत्यल्प आहे ते वाढीस लागावं आणि एकंदरीतच लग्नाआधीच्या काही महत्त्वाच्या बाबींची पूर्णता केली जावी हे कधीही चांगलं. पुढचे अनेक संघर्ष यामुळे कमी होण्यास मदत होईल. 

Thursday, June 8, 2017

#वटपोर्णिमेचे आधुनिक आख्यान

माझा पारंपरिक धर्मावर फारसा विश्वास नाही. देव-दानव या संकल्पनांवर तर मूळीच नाही. पण मला उत्सव आवडतात. त्यांचं सध्याचं स्वरुप विकृत झालेलं असलं तरी त्यांच्या मूळ स्वरुपात ते मला आवडतात. आता हे सारे सणोत्सव हे धार्मिक संकल्पनांवर आधारीत आहेत. देवादिकांशी संबंधीत आहेत. त्यामुळे धर्म आणि देव नाकारायचा तर हे सणही नाकारावे लागतील जे मला आवडत नाही. हे सणोत्सव आपल्या संस्कृतीचे, सामाजिक बदलांचे, इतिहासाचे साक्षीदारही असतात. दुसरं म्हणजे त्यांना सरसकट नाकारलं तर आपला भारत उत्सवहीन होऊन जाईल आणि हे सांस्कृतिक नुकसान आपल्याला परवडणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा सण असो उत्सव असो, हा आपला वारसा आहे आणि तो जपून ठेवायलाच हवा. पण त्याचं जे स्वरुप आहे ते मात्र बदलण्याची गरज आहे. ज्यामुळे धर्मही राहील, ज्यांना तो हवा आहे आणि त्याचवेळी ज्यांना तो नको आहे त्यांनाही (म्हणजे माझ्यासारख्यांना) कोणत्याही खंतीविना त्यात मनापासून सहभागी होता येईल.
आपल्या इथे कालच वटपोर्णिमा साजरी झाली. वटपोर्णिमेची पारंपरिक कथा सर्वांनाच माहित आहे. सावित्रीनं सत्यवानाचा जीव वाचवला आणि त्याच्या स्मरणार्थ साधारणपणे हा सण साजरा करण्यात येतो. जन्मोजन्मी किंवा सात जन्मी आहे तोच नवरा मिळावा म्हणून बायका वडाच्या झाडाची पूजा करतात. आता सध्याच्या काळात मला तरी हा प्रकार पसंत नाही. त्याची आधी कारणं बघूयात.
-    एक तर दुसरा जन्म नसतो. त्यामुळे पुढच्या जन्माची तरतूद करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे.
-    समजा दुसरा आणि त्यानंतरचेही जन्म असलेच तरीही हाच नवरा दर जन्मात मिळावा असं किती बायकांना मनापासून वाटत असेल यात शंकाच आहे. ब-याच जणी केवळ दबावाखाली ही पूजा करत असण्याची शक्यता जास्त आहे.
-    बरं त्यांच्या नव-यांनाही हीच बायको हवी आहे का याचा विचार यात करण्यात येत नाही. त्यांना गृहीतच धरण्यात येत असावं बहुधा.
-    ही पूजा बायकांनीच का करायची हा त्याच्यापुढचा मुद्दा. नव-यांनी का नको करायला ही पूजा?
-    एकीकडे आपण वडाची आणि एकंदरीत सारी झाडं कापायची, आहे ती राखायची नाही, नवी लावायची नाही आणि मग केवळ सण आहे म्हणून त्याची पूजा करायची हा दांभिकपणा आहे.
आता ही सारी कारणं लक्षात घेता मला व्यक्तिशः हा सण पसंत नाही. पण आधी म्हटल्याप्रमाणे म्हणून तो नाहीसा व्हावं असंही मला वाटत नाही. कारण त्याचा मूलार्थ हा एका चांगल्या वैवाहिक जीवनासाठी उपयुक्त असाच आहे. पती-पत्नीचं एकमेकांवरचं प्रेम, निष्ठा, विश्वास आणि एकमेकांसाठी, आपल्या संसारासाठी कोणत्याही संकटाशी झुंझण्याची तयारी या गोष्टी नाकारून चालणार नाही. आपण याची कितीतरी उदाहरणं बघत असतो. फक्त मी याला आदर्श विवाह असं नाव देणार नाही. आदर्श असं जगात काहीच नसतं. असतो तो व्यवहार. व्यवहार किती चांगला करतो येतो त्यावर आपलं जगणं आदर्शवत होत असतं. संसार यशस्वी करण्याची जबाबदारी ही पती-पत्नींवरच नाही तर कुटुंबातील अन्य सदस्यांवरतीही असते. पण ही गोष्ट आपण सहसा लक्षांत घेत नाही. त्यामुळे लग्नसंस्था, कुटुंब व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी सर्वांनी वाटून घ्यायला हवी. यातील महत्त्वाची जबाबदारी ही अर्थातच पती-पत्नीची असते. आता या सर्व गोष्टी लक्षांत घेऊन जर आपण वटपोर्णिमा साजरी करायची ठरवली तर मला वाटतं त्याला कोणाचा (म्हणजे माझ्यासारख्यांचा) विरोध असण्याचं कारण नाही. मी जी ही वटपोर्णिमा साजरी करेन त्यात खालील गोष्टी असतील.
-    वटपोर्णिमा हा केवळ बायकांचा सण न होता तो कुटुंबाचा सण म्हणून साजरा व्हावा.
-    केवळ पत्नीनेच नाही तर पतीनेही या वटपुजनात सामील व्हावं.
-    अनेक बायकांना इच्छा नसतानाही तो साजरा करण्याची सक्ती होते. त्यामुळे त्यांना तो साजरा करणं न करण्याचं स्वातंत्र्य व अधिकार हा असायलाच हवा. मन मारून केलेल्या कामाला यश मिळत नसतं.
-    पारंपरिक पद्धतीनं पुजा करण्यासोबतच आपण वर्षभरांत एकमेकांशी कसे वागलो याचा आढावा घ्यावा. झालेल्या चुकांची कबुली द्यावी, आपली वागणूक चुकली असल्यास क्षमा मागावी, कोणी चांगलं काम केलं असेल तर मनापासून कौतुक करावं आणि पुढच्या वर्षांत चुका टाळून अधिक चांगला संसार कसा करता येईल याविषयी एकमेकांच्या भावना समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करावा.
-    वट पुजन हा पर्यायाने पर्यावरण रक्षणाचाही अप्रत्यक्ष संदेश देत असतो त्यामुळे यावेळी काही झाडं लावूनही तो साजरा करता येऊ शकतो. आणखी काही नाही करता आलं तरी आपल्या हातून निदान वृक्षहानी होणार नाही याची तरी काळजी घ्यावी.
-    दुसरं असं की केवळ वडच पुजला पाहिजे अशी सक्ती करण्यात आता अर्थ नाही. प्रत्येक ठिकाणी वडाचं झाड असेलच असं नाही. त्यामुळे जो वृक्ष असेल तो पुजला तरी चालू शकतं, चालावं. कारण त्यामागची भावना महत्त्वाची आहे.
-    धर्माची व्याख्या ही धारयती इती धर्मः म्हणजेच जे धारण केले जाते तो धर्म अशी केली आहे. त्यामुळे यात धारण करण्याची जबाबदारी ही एकट्या व्यक्तिवर सोपवलेली आहे. तुम्ही जे धारण कराल, ज्याचं आचरण कराल, जे तुमचे विचार, कृती असतील तो तुमचा धर्म होतो. त्यामुळे चांगलं धारण करायचं की वाईट धारण करायचं हा तुमचा निर्णय आहे. तुमचा धर्मही त्याप्रमाणे बरा-वाईट होतो. आपण जर चांगल्या निरोगी भावनेनं, परंपरांची जोखडं झुगारून, कोणत्याही दबावाविना जर हा सण साजरा करू तरच त्याला महत्त्व येईल अन्यथा तो हळूहळू नष्ट होईल. कारण आताही हा सण प्रत्येक बाई साजरी करत नाही. त्याचं प्रमाण घटत चाललय. पण त्याचा नवा अर्थ लक्षांत घेतला तर कदाचित हा सण पुढेही टिकून राहिल.

आधुनिकतेचा अर्थ अनेक लोक फार चूकीचा घेतात. आधुनिकता म्हणजे जुन्याशी फारकत घ्यायची, जुन्या सा-या गोष्टी मोडीत काढायच्या असं लोकांना वाटतं. आधुनिकता म्हणजे जे आहे त्यात सुधारणा करणं होय. त्यामुळे जुन्या गोष्टी टिकवून त्यांत नवीन काय करता येईल व काल सुसंगत असे कोणते बदल त्यात करता येईल हे बघणं म्हणजे आधुनिकता होय. सरसकट जुनं ते वाईट, गावंढळ असा शिक्का लावून सारं नाकारत गेलो तर आपली संस्कृतीच नष्ट होईल. समाज अशा पद्धतीनं टिकून राहू शकत नाही. तो मग एकसूरी, निरस, रटाळ, निरर्थक होतो. जगण्याच्या प्रेरणा नष्ट होतात. त्यांतला गोडवा नाहीसा होतो. पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी, वारसा म्हणून देण्यासाठी आपल्या हाती मग काही शिल्लक राहत नाही परिणामी एक आधारहीन, रिक्त पिढी तयार होते. जिच्याकडून कोणत्याच सखोल कामांची आपण अपेक्षा करू शकत नाही. हे टाळायचं असेल तर डोळसपणे आपण आपल्या संस्कृतीकडे बघायला हवं. हा अर्थात एक विचार आहे. तो अंमलात आणायचा की नाही हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे.