उद्या
नाताळ आहे. त्याच्या सर्वांना शुभेच्छा. जरी मी ख्रिश्चन नाही आणि तुमच्यातले
बहुसंख्यही ख्रिश्चन नसले तरीही नाताळच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आपल्या
धर्माचा सण नाही उत्सव नाही म्हणून तो करायचा नाही, ज्यांचा तो सण आहे त्यांना
त्याच्या शुभेच्छा द्यायच्या नाही ही काही सभ्यता नाही. तशी आपली संस्कृतीही नाही.
पण अलिकडच्या काळात तथाकथित धार्मिकांनी तुम्ही जर अन्य धर्मांचं गुणगान कराल तर
तुम्ही धर्मद्रोही असे फतवे काढणं सुरू केलं आहे. असले करंटे लोक सर्वंच धर्मांत
आढळतात. मला अशा लोकांचा आताशा राग येत नाही. मला त्यांची दया येते. एखादा आजारी
माणूस असतो ना तसे हे धर्मांध लोक असतात. आजारी माणूस आपल्या आजारपणामुळे त्रस्त
असतो तसे हे त्यांच्या धार्मिक श्रेष्ठगंडानं आजारी असतात. आजारी माणूस चीडचीड
करतो पण म्हणून आपण त्याच्यावर ओरडत नाही. तो आजारी आहे म्हणून त्याला सांभाळून
घेतो तसंच या धर्मग्रस्त लोकांना सांभाळून घेण्याची गरज आहे. त्यांनी ज्यादा
चीडचीड केलीच तर सरळ त्यांच्याकडे दूर्लक्षच करा मग.
या
विचार-गरीबांना आपण इतर धर्मियांचा राग करून, हेटाळणी करून कोणत्या आनंदाला मुकतो
आहोत याचं भान नसतं. वेगवेगळे धर्म आहेत, जाती आहेत, (आता ते आहेत त्याला नाईलाज
आहे) त्यांच्या विविध संस्कृती आहेत त्याचा आनंद घ्यायला हवा. त्यांचे सण असतात,
कपडे असतात, खाणं-पिणं असतं, संगित, नाच असतो या सर्वांचा आनंद घ्यायला हवा. पण ते
सोडून काही मूर्ख ‘हे आपल्या धर्मात बसत नाही,’ असल्या आरोळ्या ठोकत राहतात. अशावेळी हमखास त्या धर्मातल्या
चूकीच्या गोष्टींचा दाखला देऊन आपलं मनं भडकवली जातात. चूकीच्या गोष्टी काय आपल्या
धर्मांत नाहीत? खरं तर धर्म चुकीचे नसतात. माणसं
चूकीचं वागत असतात व त्यामुळे धर्म बदनाम होतात.
एकमेकांवर
प्रेम करण्याऐवजी एकमेकांचा दुस्वास मत्सर करण्यात काही लोकांना जो आनंद मिळतो
त्याला निव्वळ विकृती म्हणतात. मला खात्री आहे तुम्ही असे विकृत नाही आहात. तुम्ही
उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघणारे आहात. त्यामुळेच प्रत्येक धर्मातील चूकीच्या
गोष्टी जशा तुम्हाला दिसतात तशाच चांगल्या योग्य गोष्टीही तुम्हाला दिसतात. त्या
चूकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि चांगल्या गोष्टी
वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल याची मला आशा आहे.
नाताळच्या
निमित्तानं आपण या धर्मांधांना पुन्हा सांगूयात की आमचा प्रेमावर विश्वास आहे.
द्वेषावर नाही. सो लेट्स जिंगल द बेल अँड से लेट्स डु इट!
No comments:
Post a Comment