Wednesday, May 31, 2017

#सीडबॉल्स

मॉन्सून आता काही दिवसांतच देशांत दाखल होणार आहे. महाराष्ट्रांतही तो जूनच्या पहिल्या आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. पाऊस येईल पण त्यासोबतच तो साठवण्याची आपली जबाबदारी आपणही विसरायला नको. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपण करू यात. पाऊस येण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका करत असत. या झाडांचं रक्षण करणं, संवर्धन करणं आपल्या सर्वांचच कर्तव्य आहे. त्यासाठी आणखी एक उपक्रम यावेळी काही लोक राबवत आहेत. तो आहे बीजचेंडू किंवा सीड बॉल्सचा. ओल्या मातीत वेगवेगळ्या झाडांच्या बीया टाकून हे गोळे तयार करण्यात येतात. हे गोळे मग ठिकठिकाणी फेकण्यात येतात जिथं पावसानंतर त्यांच्यातून झाडे निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या परिसरात जर कोणी असा उपक्रम करत असेल तर त्यात नक्की सहभाग घ्या. किंवा तुम्ही स्वतःच असा उपक्रम करण्यासाठी पुढाकार घ्या. तेव्हा या पावसाळ्यात पावसाचा आनंद घ्या आणि नवी झाडं तयार करण्यासाठी चढाओढीनं काम करा.

Sunday, May 28, 2017

#सेल्फी विद पाणी

मॉन्सून आता जवळच आहे. पाऊस याही वर्षी चांगला पडण्याची शक्यता आहे. पण हे पाणी वाया जाण्याची शक्यता त्याहूनही जास्त आहे. लोकांचा आजवरचा अनुभव बघता पाऊस चांगला झाला तर ते पाणी साठवून न ठेवण्याकडेच लोकांचा कल जास्त असू शकतो. आजवर आपण नाही तरी हेच करत आलोय. पण ही घाणेरडी व जीवघेणी सवय आता बदलूया. पाऊस पडणार नाही तेव्हा तर पाणी वाचवूच पण पाऊस जेव्हा पडेल तेव्हा तो वाचवूया म्हणजे पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी आपल्यावर येणार नाही. ज्यांना गरज आहे ते लोक पाणी वाचवतीलच पण ज्यांना तशी प्रत्यक्ष गरज नाही अशा शहरातील लोकांसाठी हे आवाहन आहे की त्यांनीही पाणी साठवण्यासाठी थोडे प्रयत्न तरी नक्कीच करावेत. गरजेपेक्षा जास्त पाणी न वापरणं, पाण्याची उधळपट्टी थांबवणं, इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करणं, सामाजिक माध्यमांवर पाणी-जागृती करणं यांतून पाणी संवर्धनाची मोहिम शहरी लोक नक्कीच चालवू शकतात. वाचवलेल्या पाण्यासोबत, पाणी वाचवण्यासाठी केलेल्या उपक्रमांसोबत स्वतःचा सेल्फी काढून तो पोस्ट करा. असा सेल्फी ही नक्कीच अभिमानाची व आनंदाची गोष्ट ठरेल. तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठीही ज्यांना तुम्ही वाचवलेल्या पाण्यामुळे दिलासा मिळेल. सो लेट्स डू इट. लेट्स क्लिक सेल्फी विद पाणी. 

Saturday, May 27, 2017

# मोफत सॅनिटरी नॅपकीन्स

सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त व्हावेत यासाठी अनेक महिला संघटना काम करीत आहेत. त्यांच्या कामाला आमचा पाठींबा आहेच पण याशिवाय ज्यांना ही नॅपकिन्स घेणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना ती मोफत पुरवली जावीत ही मागणीही आम्ही करतो आहोत. सबल राष्ट्र हवे असेल तर त्या राष्ट्राचे नागरिकही सबल असावे लागतात. सबल नागरिक हे समर्थ व्यक्तिंमधून तयार होत असतात. समर्थ व्यक्तिंना समर्थ आईवडील जन्म देत असतात. मुख्यतः आईचा यात मोठा सहभाग असतो. आई जर दूर्बळ असेल तर तिची संततीही दूर्बळच जन्माला येईल. या आईच्या, म्हणजेच या स्त्रीच्या आयुष्य़ातील प्रत्येक कालखंडात मासिक पाळी हा एक अविभाज्य भाग असतो. तो तिच्या केवळ शरिराशी नव्हे तर मनाशीही जोडलेला असतो. या काळात जर तिच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्याचे दीर्घ परिणाम तिला भोगावे लागतात. ही आपल्या सर्वांची जबाबदारी असायला हवी की प्रत्येक स्त्रीची तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान काळजी घेणं. तिच्याकडे आरोग्याकडे लक्ष देणं. समाज म्हणून, नातेवाईक म्हणून, मित्र म्हणून अन्य सर्व स्त्रीपुरुषांनी ही जबाबदारी घ्यायलाच हवी. स्त्रीचं आरोग्य तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान उत्तम राहिल तसेच तिला एक माणूस म्हणून सन्मानपूर्वक जीवन जगायला मिळेल ज्यात कोणत्याही लज्जेचा अंतर्भाव असणार नाही यासाठी या मागण्या आम्ही करीत आहोत. त्याला सर्वांचा पाठींबा मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. 

Thursday, May 25, 2017

आपण देशासाठी कधी व काय करणार?

देश सरकार चालवत असलं तरी त्याला सर्वसामान्य लोकांचा जोवर पाठींबा मिळत नाही तोवर सरकारी निर्णयांचे हवे ते योग्य परीणाम होणं अश्यकच असतं. सरकार जे निर्णय घेतं त्याची योग्य ती कारणमीमांसा करून एकाचवेळी जरूर तिथे विरोध व जरूर तिथे पाठींबा देत या निर्णयांचा आदर व त्यावरची कृती करणं हे नागरीकांचंही कर्तव्य असतं. त्याशिवाय देश मोठा होत नाही. नागरीकशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याकडे अत्यंत दूर्लक्षित विषय आहे. त्यामुळे सामान्य व्यवहारात लोकांनी कसं वागायचं याचे कोणतेच धडे आपण गिरवत नाही. त्यापायी होणारे परीणाम आपण दररोज बघत असतो. आपल्याला साधी रांगेची शिस्त पाळता येत नाही, वाहतुकीचे नियम पाळता येत नाही, अपघातात आपण लोकांची मदत करत नाही, ही फक्त काही उदाहरणं आहेत. ही नेहमीची व वरकरणी छोटी व अर्थहीन उदाहरणं वाटली तरी या गोष्टी दररोज होत असतात त्यामुळे त्यांचा एकत्रित परीणाम हा प्रचंड असतो तरीही आपण त्याकडे दूर्लक्ष करतो.
नागरीक जर आपलं कर्तव्य विसरले तर देश कधीच मोठा होत नाही. आपल्या देशानं हे कायमच अनुभवलं आहे आणि तरीही आपण त्यातून काहीच शिकत नाही. कोणताही निर्णय झाला की त्याला आपल्या फुटकळ स्वार्थासाठी विरोध करणं हेच आपण करतो. आपण केवळ बालिश बडबडी करण्यात धन्यवाद मानतो व व्यवहारात फक्त कृतीशून्य आहोत.
मोदी सरकारनं गेल्या काही वर्षांत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
पहिला स्वच्छ भारताचा व दुसरा काळे धन रोखण्यासाठी जुन्या पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याचा. त्यावर आपली कशी प्रतिक्रिया आहे ते आपल्या रोगट भारतीय मानसिकतेचं लक्षणीय उदाहरण आहे. आधी सर्वांनी याचं स्वागत केलं. जे मोदी भक्त आहेत त्यांनी त्यांच्या अंध भक्तीत व जे मोदी विरोधक होते त्यांनी नाईलाजानं. नंतर काही दिवसांनी हे दोन्ही निर्णय कसे चुकीचे आहेत यावर मोदी विरोधकांनी मोठमोठे लेख लिहायला सुरूवात केली. प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत पण ते विचारण्याआधी आपण या निर्णयाबरहुकुम वागतोय का, आपण स्वतः यासाठी काय केलं होतं, पुढे काय करणार आहोत का हेही पहायला हवं. पण ते क्वचितच होताना दिसतं.
आणि मग येतं सामान्य जनतेचं वागणं ज्यांच्यामुळे हा देश बनला आहे. सरकार निर्णय घेईलच पण लोकांनीच त्याची अंमलबजावनी केली नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. स्वच्छ भारताची मोहिम चालवावी लागते हीच मूळात आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. बरं ती केल्यानंतर तरी तिला पाठींबा द्यायचा व आपलं वागणं सुधारायचं तर तेही नाही. कारण ती आपली मानसिकताच नाही, आपण फक्त बोलतो पण करत काही नाही. नोटा रद्द करण्याच्या गोष्टीलाही आपण असाच प्रतिसाद देत आहोत. एका चांगल्या निर्णयाचं स्वागत करण्याऐवजी त्यांतील पळवाटा दाखवणं, चुका शोधणं यावरच मोदी विरोधकांचा भर आहे. तर सामान्य जनता जणू काही आभाळ कोसळलं आहे अशा पद्धतीनं वागत आहे. वर्तमानपत्रांतून, टीव्हीवरून वारंवार सांगूनही लोक मुर्खासारखे बँक पोस्टात गर्दी करत आहेत. सोन्याची किंमत वाढल्याच्या बातम्या येत आहेत आणि लोक दुप्पट पैसा मोजून सोनं विकत घेण्याच्या बातम्याही. का घेत आहेत हे लोक सोनं? प्रामाणिकपणे कर भरून बँकेत का जमा करत नाही हा पैसा? मग इथे चुक कोणाची आहे? व्यापारी लुट करत आहे सामान्य जनता भरडली जात आहे, अरे पण तुमची काही जबाबदारी नाही का? याचा अर्थ तुम्ही स्वतःही भ्रष्टाचारच करत आहात. तुम्ही काही विजय मल्यापेक्षा कमी भ्रष्टाचारी नाही आणि भ्रष्टाचार हा शंभर रुपयाचा असो की हजार कोटींचा असो भ्रष्टाचारच असतो.
देशासाठी लोक काय करतात हा प्रश्न इथे आहे. आपण सारेच देशभक्तिच्या गप्पा मारतो. पण देशात सुरक्षित असताना अशा गप्पा मारायला काही लागत नाही. आज थोडी पैशांची अडचण होत आहे तर सारे हवालदील झाले आहेत. हीच आहे का आपली देशभक्ति? आपण काही दिवस थोडा त्रासही सोसू शकत नाही का? सीमेवर सैनिक आणि हजारो लोक रोज मरणाच्या छायेत जगत असतात आणि आपण काही दिवसांसाठीही अडचणी सहन करू शकत नाही. आणि हा काही मोदी भक्त असण्याचा, मोदी विरोधक असण्याचा मुद्दा नाही, हा निखळ तुम्ही या देशाचे जबाबदार नागरीक आहात की नाही आणि त्यानुसार तुम्ही वागणार की नाही याचा प्रश्न आहे. दूर्दैव्यानं ते होताना दिसत नाही. देशात सध्या अंध मोदी भक्तांची जशी गर्दी वाढली आहे तशीच अंध मोदी विरोधकांची गर्दीही वाढली आहे. या दोन्ही प्रवृत्ती आपल्यासाठी देशासाठी घातक आहेत.

मोदी आज आहेत उद्या नसतील. त्यांच्या जागी आणखी कोणीतरी येईल. पण आपण सामान्य जनता कायमच असणार आहो. प्रश्न हा आहे की आपण कधी आपली वागणूक सुधारणार आहोत की नाही याचा. शेवटी ज्याची जशी लायकी असते तेच त्याला मिळतं. आपणच जर भिकारचोट असू तर आपल्याला नेतेही तसेच मिळणार आणि कोणी काही चांगले निर्णय घेतलेच तर त्याचीही आपण मातीच करणार. मग तो कोणताही नेता असो वा कोणतंही सरकार असो. देश एका निर्णयानं मोठा होत नाही. देश एका रात्रीतून मोठा होत नाही आणि देश केवळ सत्ताधारी नेत्यांमुळे मोठा होत नाही. तो सामान्य नागरीकांच्या दररोजच्या शेकडो लहान सहान गोष्टींनी मोठा होत असतो. पण गेली कित्येक वर्षं ती जबाबदारी आपण विसरलो आहोत. जोवर आपण ते करणार नाही तोवर हा देश मोठा होणार नाही.

१- मौन सोडा

आपल्या समाजात, कुटूंबात वावरताना काही गोष्टींबद्दल बोलताना आपण अती बोलतो आणि काही गोष्टींबाबत विशेषतः ज्यांच्याविषयी बोलायलाच हवं अशा गोष्टींविषयी मात्र आपण सोयिस्कर मौन बाळगतो. या अशा काही गोष्टींपैकी ब-याच गोष्टी या महिलांशी संबंधीत असतात. महिलांशी संबंधीत या गोष्टींविषयी बोलणं तर सोडाच पण त्या शब्दांचा उच्चार करणंही अनेक लोक टाळतात. इतर कोणी याविषयी बोलत असतील तर त्यांनाही ते अडवतात. पण असं करून आपण या महिलांची प्रगती अडवत आहोत, त्यांच्या आयुष्यात अधिक अडथळे तयार करत आहोत याची त्यांना जाणीव नसते. ज्यांना ती असते तेही संकोचास्तव बोलत नाहीत. या महिला म्हणजे आपली आई असेल, बहिण असेल, मुलगी असेल, मैत्रिण असेल याचाही विसर पडतो आपल्याला. इतर कोणी त्याविषयी काही करतील तेव्हा करतील पण आपण आपल्या पातळीवर तरी हे मौन सोडूयात. महिलांशी संबंधीत जे प्रश्न आहेत त्या मासिक पाळी, योनी, गर्भनिरोधक, गर्भपात, तांबी, लैंगिक संबंध, बहुलिंगी, या शब्दांचा कोणताही संकोच किंवा लाज न बाळगता त्याविषयी मोकळेपणानं बोलूयात. त्यावर चर्चा करूयात. त्यांच्या समस्या समजावून घेऊयात.