Sunday, June 18, 2017

#कचराबंदी

मोहम्मद अली पाशा (थोर) जेव्हा राज्यकारभार बघू लागला तेव्हा सबंध कैरो शहर गलिच्छ उकिरड्यांनी भरलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने हुकूम काढून प्रत्येक घरमालकाला त्याच्या त्याच्या घरासमोरच्या रस्त्याच्या स्वच्छतेबद्दल जबाबदार धरावे असे फर्मावले. या हुकूमाचा भंग करणा-यांच्या घरावर जप्ती आणण्यात येईल ही शिक्षाही हुकूमात होती. काही जणांना अशा शिक्षा झाल्यानंतर कैरो शहर अगदी लख्ख झाले. आणि त्याचा एक फायदा म्हणजे त्या शहरी कधीही प्लेगची साथ आलेली नाही. ही टीप मी तांजिए येथून लिहित आहे. येथे एखाद्या मोहम्मद अली पाशाची फारच गरज आहे.
अरेबियन नाईट्स – रिचर्ड बर्टन , अनुवाद गौरी देशपांडे, खंड १२

महान भटक्या प्रवासी आणि धाडसी संशोधक सर रिचर्ज एफ. बर्टन यांनी लिहिलेली ही टीप आहे तेराव्या शतकातील एका पाशाच्या काळातली. शेवटास बर्टन जी अपेक्षा करतात ती आपणही करायला हरकत नाही. मोदींनी नोटाबंदी आणली तशीच कचराबंदी आणली (पण योग्य ती पूर्वतयारी करूनच) तर तो एक अतिशय चांगला निर्णय ठरेल. फक्त स्वच्छ भारताचं आवाहन करून आणि साफसफाईची नाटकं करून भारत स्वच्छ होणार नाही. आपल्या देशातले लोक कमालीचे दांभिक आहेत. वैयक्तिक स्वच्छता पाळण्यात अगदी पवित्रतेचा कळस ते गाठतात पण सार्वजनिक आयुष्यात याच्या अगदी उलट टोक गाठतात. रस्ता, सार्वजनिक जागा या आपल्या बापानं आपल्यासाठी वंशपरंपरागत सोडलेल्या मालकीच्या उकिरड्याच्या जागा असल्यासारख्या सारे त्यांचा कचरा फेकण्यासाठी उपयोग करतात. थुंकण्यासाठी उपयोग करतात. हगण्यासाठी, मुतण्यासाठी, आणि कुत्रे हगवण्यासाठीही रस्त्यांचा आणि मिळेल त्या जागेचा उपयोग केला जातो. कोणतीही जागा स्वच्छ राहता कामा नये अशी जणू काही प्रतिज्ञा घेतल्याप्रमाणे काही लोक आख्खं शहर घाणेरडं करीत हिंडत असतात. या लोकांना आपल्या कच-याचा मोबदला द्यायची इच्छा नसते. त्यांचा हा कचरा साफ करणा-या लोकांबद्दल यांच्या मनात आदर नसतो. कोणी त्यांना हटकलं तर ते लगेच मारामारीवर येतात. रस्ता असो, मैदानं असो, पदपथ असो, सार्वजनिक बागा, इमारती, गच्ची, जिने, गॅलरी, छतं, आवार, चौक, कुठलीही जागा यांना वर्ज्य नाही. अशा लोकांना आळा घालायचा असेल तर आता मोहम्मद अली पाशाप्रमाणेच व्यवस्था करायला हवी. ज्यानं त्यानं आपला परिसर स्वच्छ ठेवायचा, कचरा करायचा नाही, होऊ द्यायचा नाही. त्यात जी मदत लागेल ती शासकिय संस्थांनी करावी. जे हे करणार नाहीत त्यांच्याकडून जबरी दंड वसूल करण्यात यावा. आपले लोक इतके निर्लज्ज आहेत की त्यांना फटके आणि तेही सतत, बसल्याशिवाय ते काही सुधारणार नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. विदेशांत गेल्यावर जे लोक तिथली स्वच्छता पाळतात आणि त्याविषयी इथं आल्यावर कौतुकानं सांगतात तेच लोक इथं मात्र पुन्हा घाण करण्यात व्यस्त होतात. या मानसिकतेचं काय करायचं हा प्रश्नच आहे. स्वच्छता हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसतो तर तो शहर सौंदर्याचाही असतो. त्यावरून इतरांना आपल्या राष्ट्रीय चारित्र्याविषयी कळतं. शिस्तीविषयी समजतं आणि देशाप्रती आपण किती जबाबदार आहोत हेही दिसतं. पण आपल्या इथं या सर्वांचा अभाव आहे. शासनानं कचराबंदी लागू करण्याची वाट न बघता आपणच आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यासाठी खालील गोष्टी करता येईल. त्यात यश कितपत मिळेल याचा विचार न करता त्याविषयी प्रयत्न सुरू करणं महत्त्वाचं. आपण आशा करूयात की लोक स्वतःहून या गोष्टीला प्राधान्य देतील. यात लोकांशिवाय लोक प्रतिनिधींनाही सामावून घेता येतील.
-    घरातला कचरा कचराकुंडीतच टाका, सोसायटीच्या आवारात, आपल्या खाली राहणा-या लोकांच्या घराच्या छतावर टाकू नका.
-    शक्य असेल तर सोसायटीत कचरा जिरवण्याचा प्रकल्प सुरू करा.
-    तुम्ही जिथं राहता तिथला रस्ता साफ राहील याची काळजी घ्या.
-    कुत्रे फिरवणा-या लोकांना भेटून त्यांना त्यांच्या कुत्र्यांना रस्तावर हगवण्यापासून थोपवा.
-    दुकानदार, इतर व्यापारी मंडळी यांना भेटून त्यांना त्यांच्या कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता कर्मचा-यांना मदत करण्यासाठी आवाहन करा. दुकानाच्या समोर कच-याचे डबे राहतील व ते कुत्र्यांपासून सुरक्षित राहतील याचीही काळजी घ्या.
-    लोक प्रतिनिधींना, स्थानिक नगरसेवकाला भेटून त्याची काही मदत मिळेल यासाठी प्रयत्न करा.

एकदा सुरूवात करूयात आणि लोकांना त्याची सवय लागली की हळूहळू बदल नक्कीच घडतो यावर माझा विश्वास आहे. आपण आपल्यापासून याची सुरूवात करूयात. त्याचे अनुभव इथे तुम्ही शेअर केलेत तर इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल. सो लेट्स डू इट!

Thursday, June 15, 2017

#जातपंचायत

जात पंचायत आणि आनंदाची बातमी या परस्परविरोधी गोष्टी आहेत असा समज या पंचायतींनीच आपल्याला त्यांच्या निर्णयांतून करून दिला आहे. खाप पंचायत असो किंवा आपल्या जात पंचायती असोत किंवा फतवे देणारे इमाम असो चूकीचे निर्णय कसे द्यायचे याचा आदर्शच ते दरवेळी घालून देतात. त्याची आपल्याला माहिती आहे कारण वर्तमानपत्रांतून त्याची प्रसिद्धी होत असते. पण जेव्हा एखादी चांगली गोष्ट चांगला निर्णय यांच्याकडून घेतला जातो तेव्हा मात्र आपल्याला सहसा त्याची माहिती होत नाही कारण त्याला तेवढी प्रसिद्धी मिळत नाही दिली जात नाही. वर्तमानपत्रे एरव्ही जे जात पंचायतीवर तुटून पडतात ते त्यांच्या चांगल्या कामाच्यावेळी मात्र मागेच राहतात. त्याला नकारात्मक बातम्यांना दिली जाणारी पहिल्या पानाची जागा मिळत नाही. हे बदलावं ही अपेक्षा. हे सारं ज्यासाठी लिहितोय त्याबद्दल आता.
महाराष्ट्र टाईम्समध्ये १३ जून २०१७ रोजी १३ व्या पानावर एक बातमी आली होती. अगदी छोटीशी. उत्तर प्रदेशातील संभळ गावात तूर्क जातपंचायतीने तिहेरी तलाकच्या बाबतीत आदर्शवत निर्णय घेतला आहे. तूर्क जातीतील एका माणसानं लग्न केल्यानंतर १० दिवसांच्या आतच तिहेरी तलाक देत आपल्या पत्नीला माहेरी पाठवलं आणि तिची मेहरची रक्कमही दिली नाही. तिच्या घरच्यांनी त्याविरोधात न्यायालयात न जाता जात पंचायतीकडे धाव घेतली. कारण काही दिवसांपूर्वीच तूर्क जात पंचायतीने तलाकच्या अशा पद्धतीवर बंदी घातली होती. त्यांनी या माणसाला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला शिवाय तिच्या मेहरची रक्कमही तिला परत करण्यास सांगितलं. या निर्णयासाठी आधी या जात पंचायतीचं अभिनंदन. त्या मुलीच्या घरच्यांचंही अभिनंदन ज्यांनी तिची बाजू उचलून धरली.

तिहेरी तलाकचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयांत आहे. त्यावर जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल. पण तूर्क जात पंचायतीमध्ये यावर एक योग्य निर्णय घेण्यात आला. त्यात पैसा वेळ खर्च झाला नसेल अशी आशा आहे. न्यायालयीन प्रक्रियेत हे कधी झालं असतं याची कल्पना करणं कठीण नाही. समंजसपणाची भूमिका घेतली तर न्यायालयापर्यंत अशा गोष्टी जाणारच नाहीत. पूर्वी गावांमध्ये अशा पंचायती होत्या आजही आहेत आणि त्यांच्यातच न्यायनिवाडा केला जायचा ज्यामुळे न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ यायची नाही. पण ही एक चांगली व्यवस्था काळाच्या ओघात किडली सडली. त्यात सुधारणा करावी असंही कोणाला वाटत नाही. त्यामुळे जात पंचायत आज बदनाम झाली आहे आणि त्याला तेच लोक जबाबदार आहेत. पण हेच लोक तिला पुन्हा तिची प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात. त्यासाठी त्यांनी कालसुसंगत माणुसकीचा गौरव वाढवणारे बदल करायला हवेत व तसे निर्णय घ्यायला हवेत. त्यामुळे लोकांचा न्यायालयांत खर्च होणार पैसा, वेळ खर्च होणार नाही आणि मानसिक व शारिरीक त्रासही कमी होईल. आपण फक्त आशा करू शकतो की अन्य जातपंचायतीही याचा आदर्श घेतील. 

Monday, June 12, 2017

#लग्नाआधी...

लग्नाची एक व्याख्या ही, लग्न हा एक सामाजिक करार आहे, अशी आहे. जिथं करार असतो तिथं काही कलमं असतात, नियम असतात आणि लग्न झाल्यानंतर संसार करताना त्या नियमांचं कलमांचं पालन व्हावं अशी अपेक्षा असते. आपल्या हिंदू संस्कृतीत सप्तपदीच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्यांत उत्तम पद्धतीनं या अपेक्षांची माहिती वधुवरांना करून दिली जाते. अर्थात हे मंत्र संस्कृतमध्ये आहेत व ते समजावून सांगण्याची जबाबदारी ना पंडित घेत ना ते समजून घेण्याची काळजी वधुवर घेत. असो. आजचा विषय आहे लग्नाआधी काय काळजी घ्यावी यासंबंधीचा. आपल्याकडे लग्नाआधी ज्या गोष्टी केल्या जातात त्यात मुलाची चौकशी, त्याच्या घरच्यांची चौकशी केली जाते. मुलाला नोकरी आहे का, पगार काय, नोकरी टिकावू आहे का, त्याचं वय काय, त्याला व्यसनं आहेत का, त्याच्या घरी शेती आहे का, स्वतःचं घर आहे का, अशा साधारण चौकशा केल्या जातात. तर मुलीकडे ती गोरी आहे का, तिचा बाप श्रीमंत आहे का या दोन गोष्टींची बहुधा चौकशी केली जाते. यातही लोक भरपूर खोटं बोलतात. आपल्या इथली जवळपास सारी लग्नं खोट्यावर बेतलेली असतात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. या खोट्या गोष्टींमध्ये मुलांच्या बाजूनं, त्यांची नोकरी, पगार, व्यसनं, आरोग्य इत्यादी गोष्टी लपवल्या जातात तर मुलीच्या बाजूने तिचं वय, आरोग्याची स्थिती, तिची लफडी, शिक्षण अशा गोष्टी साधारणपणे लपवण्यात येतात. यात दोन्ही बाजूंचा एकच विचार असतो की आधी लग्न होऊ द्या, ते झालं की जी काय समस्या असेल ती ते लोक बघून घेतील. आधीच जर सा-या गोष्टी सांगितल्या तर लग्न होणंच कठीण होऊन बसेल. पण या मानसिकतेमुळे असंख्य संसार नंतर उध्वस्त होतात.
आता काळ बदलत आहे त्यामुळे लग्नाआधी करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यात काही बदल होणं आवश्यक आहे.
१-       आपण लग्नासाठी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम आहोत का हे आधी बघणं व त्याची माहिती समोरच्या पक्षाला देणं. शारिरीक गोष्टींमध्ये तुम्हाला काही रोग आहेत का, घरी काही अनुवंशीक रोग आहेत का याबरोबरच काही महत्त्वाच्या चाचण्या करणंही गरजेचं आहे. यातली सर्वांत महत्त्वाची चाचणी आहे एडस् या रोगाची. सिकलसेल हा आणखी एक रोग आहे. थॅलसिमियाही. हे दोन्ही रोग टाळण्यासाठी मुलामुलींचे रक्तगट एकमेकांना पुरक आहेत ना हे बघणं गरजेचं असतं. आणखी एक बाब म्हणजे मुलगी मुलगी एकमेकांनी लैंगिक सुख देण्यास सक्षम आहेत की नाही हे बघणं.  पुरुष असतील तर त्यांनी त्यांचा स्पर्म काउंट घेणं गरजेचं आहे. स्त्रीयांनी त्या मूल धारण करण्यास सक्षम आहेत का ते पहाणं गरजेचं आहे. मानसिक बाबींमध्ये अनुवंशीक मानसिक रोग आहेत का याची चौकशी करणं महत्त्वाचं ठरेल. या सर्व गोष्टी तपासून एकमेकांना शेअर करायला हव्यात.
२-       दुसरी गोष्टी आहे तुमची आर्थिक परिस्थिती जशी आहे तशी ती सांगणं.
३-       तुमचं शिक्षण वय याची खरी माहिती देणं.
४-       घरासंबंधीची खरी माहिती देणं.
५-       तुमच्या भविष्यातील योजनांची माहिती देणं.
अलीकडेच परेश मोकाशी यांचा चि. व चि. सौ. कां. हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात लग्नाआधी मुलगी आपल्या भावी सासरी राहायला जाते. माझ्या मनात हीच कल्पना होती आणि त्यावर चित्रपट काढला म्हणून परेशजींचं अभिनंदन. मुलींना लग्नानंतर एकदम हजारो गोष्टींशी तडजोड करत जगावं लागतं त्याचे किती भयानक परिणाम त्यांच्यावर होतात याची कल्पनाही करवत नाही. आपण दुस-याच्या घरी कधी गेलो तर तिथं रात्री झोपही लागत नाही. कारण वातावरण बदललेलं असतं. त्यामुळे मुलींना लग्नाआधी त्यांच्या सासरी जर महिनाभर राहता आलं तर त्यांची मानसिक तयारी होऊ शकते आणि एकमेकांशी मोकळा संवाद साधता येऊन अधिक गोष्टी समजून घेता येतात. यात अर्थात दोन्ही पक्ष किती समंजस आहेत यावरच अशा गोष्टींचं यशापयश ठरतं. पण हे व्हायला हरकत नाही.

आता वर सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे फार लोक अंमलात आणणार नाहीत हे उघड सत्य आहे. तशा गोष्टी सांगितल्या तर होऊ घातलेली साठसत्तर टक्के लग्नं मोडतील यात शंका नाही. पण नंतर संसार मोडून आयुष्य उध्वस्त होण्यापेक्षा लग्न मोडणं कधीही चांगलं. हाही मुद्दा लक्षांत घ्यायला हवा की कोणीही परिपूर्ण नसतो त्यामुळे त्याचा हव्यास धरू नये पण किमान प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं चूकीचं ठरणार नाहीत. प्रश्न सांगितले तर त्यावर काही उपाय करता येऊ शकतात, मुख्य म्हणजे फसवणूक अपेक्षाभंग टळतो. त्यामुळे नवीन पिढीनं यावर जरा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आशा करणं चूकीचं होणार नाही. काही विवाहसंस्थांमध्ये अशा गोष्टींवर भर दिला जातोय ही चांगली गोष्ट आहे पण त्याचं प्रमाण अत्यल्प आहे ते वाढीस लागावं आणि एकंदरीतच लग्नाआधीच्या काही महत्त्वाच्या बाबींची पूर्णता केली जावी हे कधीही चांगलं. पुढचे अनेक संघर्ष यामुळे कमी होण्यास मदत होईल. 

Thursday, June 8, 2017

#वटपोर्णिमेचे आधुनिक आख्यान

माझा पारंपरिक धर्मावर फारसा विश्वास नाही. देव-दानव या संकल्पनांवर तर मूळीच नाही. पण मला उत्सव आवडतात. त्यांचं सध्याचं स्वरुप विकृत झालेलं असलं तरी त्यांच्या मूळ स्वरुपात ते मला आवडतात. आता हे सारे सणोत्सव हे धार्मिक संकल्पनांवर आधारीत आहेत. देवादिकांशी संबंधीत आहेत. त्यामुळे धर्म आणि देव नाकारायचा तर हे सणही नाकारावे लागतील जे मला आवडत नाही. हे सणोत्सव आपल्या संस्कृतीचे, सामाजिक बदलांचे, इतिहासाचे साक्षीदारही असतात. दुसरं म्हणजे त्यांना सरसकट नाकारलं तर आपला भारत उत्सवहीन होऊन जाईल आणि हे सांस्कृतिक नुकसान आपल्याला परवडणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा सण असो उत्सव असो, हा आपला वारसा आहे आणि तो जपून ठेवायलाच हवा. पण त्याचं जे स्वरुप आहे ते मात्र बदलण्याची गरज आहे. ज्यामुळे धर्मही राहील, ज्यांना तो हवा आहे आणि त्याचवेळी ज्यांना तो नको आहे त्यांनाही (म्हणजे माझ्यासारख्यांना) कोणत्याही खंतीविना त्यात मनापासून सहभागी होता येईल.
आपल्या इथे कालच वटपोर्णिमा साजरी झाली. वटपोर्णिमेची पारंपरिक कथा सर्वांनाच माहित आहे. सावित्रीनं सत्यवानाचा जीव वाचवला आणि त्याच्या स्मरणार्थ साधारणपणे हा सण साजरा करण्यात येतो. जन्मोजन्मी किंवा सात जन्मी आहे तोच नवरा मिळावा म्हणून बायका वडाच्या झाडाची पूजा करतात. आता सध्याच्या काळात मला तरी हा प्रकार पसंत नाही. त्याची आधी कारणं बघूयात.
-    एक तर दुसरा जन्म नसतो. त्यामुळे पुढच्या जन्माची तरतूद करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे.
-    समजा दुसरा आणि त्यानंतरचेही जन्म असलेच तरीही हाच नवरा दर जन्मात मिळावा असं किती बायकांना मनापासून वाटत असेल यात शंकाच आहे. ब-याच जणी केवळ दबावाखाली ही पूजा करत असण्याची शक्यता जास्त आहे.
-    बरं त्यांच्या नव-यांनाही हीच बायको हवी आहे का याचा विचार यात करण्यात येत नाही. त्यांना गृहीतच धरण्यात येत असावं बहुधा.
-    ही पूजा बायकांनीच का करायची हा त्याच्यापुढचा मुद्दा. नव-यांनी का नको करायला ही पूजा?
-    एकीकडे आपण वडाची आणि एकंदरीत सारी झाडं कापायची, आहे ती राखायची नाही, नवी लावायची नाही आणि मग केवळ सण आहे म्हणून त्याची पूजा करायची हा दांभिकपणा आहे.
आता ही सारी कारणं लक्षात घेता मला व्यक्तिशः हा सण पसंत नाही. पण आधी म्हटल्याप्रमाणे म्हणून तो नाहीसा व्हावं असंही मला वाटत नाही. कारण त्याचा मूलार्थ हा एका चांगल्या वैवाहिक जीवनासाठी उपयुक्त असाच आहे. पती-पत्नीचं एकमेकांवरचं प्रेम, निष्ठा, विश्वास आणि एकमेकांसाठी, आपल्या संसारासाठी कोणत्याही संकटाशी झुंझण्याची तयारी या गोष्टी नाकारून चालणार नाही. आपण याची कितीतरी उदाहरणं बघत असतो. फक्त मी याला आदर्श विवाह असं नाव देणार नाही. आदर्श असं जगात काहीच नसतं. असतो तो व्यवहार. व्यवहार किती चांगला करतो येतो त्यावर आपलं जगणं आदर्शवत होत असतं. संसार यशस्वी करण्याची जबाबदारी ही पती-पत्नींवरच नाही तर कुटुंबातील अन्य सदस्यांवरतीही असते. पण ही गोष्ट आपण सहसा लक्षांत घेत नाही. त्यामुळे लग्नसंस्था, कुटुंब व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी सर्वांनी वाटून घ्यायला हवी. यातील महत्त्वाची जबाबदारी ही अर्थातच पती-पत्नीची असते. आता या सर्व गोष्टी लक्षांत घेऊन जर आपण वटपोर्णिमा साजरी करायची ठरवली तर मला वाटतं त्याला कोणाचा (म्हणजे माझ्यासारख्यांचा) विरोध असण्याचं कारण नाही. मी जी ही वटपोर्णिमा साजरी करेन त्यात खालील गोष्टी असतील.
-    वटपोर्णिमा हा केवळ बायकांचा सण न होता तो कुटुंबाचा सण म्हणून साजरा व्हावा.
-    केवळ पत्नीनेच नाही तर पतीनेही या वटपुजनात सामील व्हावं.
-    अनेक बायकांना इच्छा नसतानाही तो साजरा करण्याची सक्ती होते. त्यामुळे त्यांना तो साजरा करणं न करण्याचं स्वातंत्र्य व अधिकार हा असायलाच हवा. मन मारून केलेल्या कामाला यश मिळत नसतं.
-    पारंपरिक पद्धतीनं पुजा करण्यासोबतच आपण वर्षभरांत एकमेकांशी कसे वागलो याचा आढावा घ्यावा. झालेल्या चुकांची कबुली द्यावी, आपली वागणूक चुकली असल्यास क्षमा मागावी, कोणी चांगलं काम केलं असेल तर मनापासून कौतुक करावं आणि पुढच्या वर्षांत चुका टाळून अधिक चांगला संसार कसा करता येईल याविषयी एकमेकांच्या भावना समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करावा.
-    वट पुजन हा पर्यायाने पर्यावरण रक्षणाचाही अप्रत्यक्ष संदेश देत असतो त्यामुळे यावेळी काही झाडं लावूनही तो साजरा करता येऊ शकतो. आणखी काही नाही करता आलं तरी आपल्या हातून निदान वृक्षहानी होणार नाही याची तरी काळजी घ्यावी.
-    दुसरं असं की केवळ वडच पुजला पाहिजे अशी सक्ती करण्यात आता अर्थ नाही. प्रत्येक ठिकाणी वडाचं झाड असेलच असं नाही. त्यामुळे जो वृक्ष असेल तो पुजला तरी चालू शकतं, चालावं. कारण त्यामागची भावना महत्त्वाची आहे.
-    धर्माची व्याख्या ही धारयती इती धर्मः म्हणजेच जे धारण केले जाते तो धर्म अशी केली आहे. त्यामुळे यात धारण करण्याची जबाबदारी ही एकट्या व्यक्तिवर सोपवलेली आहे. तुम्ही जे धारण कराल, ज्याचं आचरण कराल, जे तुमचे विचार, कृती असतील तो तुमचा धर्म होतो. त्यामुळे चांगलं धारण करायचं की वाईट धारण करायचं हा तुमचा निर्णय आहे. तुमचा धर्मही त्याप्रमाणे बरा-वाईट होतो. आपण जर चांगल्या निरोगी भावनेनं, परंपरांची जोखडं झुगारून, कोणत्याही दबावाविना जर हा सण साजरा करू तरच त्याला महत्त्व येईल अन्यथा तो हळूहळू नष्ट होईल. कारण आताही हा सण प्रत्येक बाई साजरी करत नाही. त्याचं प्रमाण घटत चाललय. पण त्याचा नवा अर्थ लक्षांत घेतला तर कदाचित हा सण पुढेही टिकून राहिल.

आधुनिकतेचा अर्थ अनेक लोक फार चूकीचा घेतात. आधुनिकता म्हणजे जुन्याशी फारकत घ्यायची, जुन्या सा-या गोष्टी मोडीत काढायच्या असं लोकांना वाटतं. आधुनिकता म्हणजे जे आहे त्यात सुधारणा करणं होय. त्यामुळे जुन्या गोष्टी टिकवून त्यांत नवीन काय करता येईल व काल सुसंगत असे कोणते बदल त्यात करता येईल हे बघणं म्हणजे आधुनिकता होय. सरसकट जुनं ते वाईट, गावंढळ असा शिक्का लावून सारं नाकारत गेलो तर आपली संस्कृतीच नष्ट होईल. समाज अशा पद्धतीनं टिकून राहू शकत नाही. तो मग एकसूरी, निरस, रटाळ, निरर्थक होतो. जगण्याच्या प्रेरणा नष्ट होतात. त्यांतला गोडवा नाहीसा होतो. पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी, वारसा म्हणून देण्यासाठी आपल्या हाती मग काही शिल्लक राहत नाही परिणामी एक आधारहीन, रिक्त पिढी तयार होते. जिच्याकडून कोणत्याच सखोल कामांची आपण अपेक्षा करू शकत नाही. हे टाळायचं असेल तर डोळसपणे आपण आपल्या संस्कृतीकडे बघायला हवं. हा अर्थात एक विचार आहे. तो अंमलात आणायचा की नाही हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे. 

Sunday, June 4, 2017

#लेट्सबॅनफेअरनेसक्रिम्स

सरकार आता गोरेपणा वाढवण्याचा दावा करणा-या क्रिम्सवर आणि त्यांच्या जाहिरातींवरही बंदी आणणार आहे अशी बातमी आहे. तसं झालं तर ती एक महत्त्वाची गोष्ट ठरेल. पण आपल्या वृत्तीतला गोरेपणा जर गेला नाही तर अशा बंदीला काही अर्थ उरणार नाही. गोरपणाची आपली हाव संपली नाही तर ही बंदी निरर्थक ठरेल. शरीराचा रंग ही नैसर्गिक गोष्ट असते. त्यामुळे त्याबाबत लाज वाटण्याचं किंवा अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही. पण आपण सारे मात्र गोरेपणा चांगला आणि काळेपणा वाईट यातच अडकून पडलोय. त्याला अनेक सांस्कृतिक कारणं आहेत. प्रश्न आहे तो ही घातक प्रवृत्ती बदलण्याचा. तुमचा रंग काय आहे यापेक्षाही तो कसा आहे याला महत्त्व असायला हवं. त्यामुळे गोरा रंग आहे पण त्यात तेज नसेल तर माणूस आजारी दिसू शकतो. याउलट काळा रंग असेल पण त्वचा तजेलदार असेल तर हा रंग खुलून दिसतो. त्यामुळे रंगापेक्षा आपल्या त्वचेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि कोणतीही रासायनिक घटक असलेली क्रिम ही गोष्ट करू शकत नाही. त्यामुळं त्वचा कालांतरानं खराबच होते. त्वचेचा रंग नाही तर तिचा पोत सुधारण्यासाठी, व ती सशक्त आणि निरोगी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ते झाले तर रंग कोणताही असो तुम्ही सुंदरच दिसता. आणि तुमचा स्वभाव आणि कर्तृत्व यांमुळेही हा रंग अधिक खुलतो. तेव्हा त्याच्याकडेही लक्ष द्या. हे खरं शाश्वत सौंदर्य आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी क्रिम लावण्याची नाही तर मेहनत करून घाम गाळण्याची तयारी लागते. ते झालं तर तुमचं सौंदर्य वाढेल यात शंकाच नाही.