माझा
पारंपरिक धर्मावर फारसा विश्वास नाही. देव-दानव या संकल्पनांवर तर मूळीच नाही. पण
मला उत्सव आवडतात. त्यांचं सध्याचं स्वरुप विकृत झालेलं असलं तरी त्यांच्या मूळ
स्वरुपात ते मला आवडतात. आता हे सारे सणोत्सव हे धार्मिक संकल्पनांवर आधारीत आहेत.
देवादिकांशी संबंधीत आहेत. त्यामुळे धर्म आणि देव नाकारायचा तर हे सणही नाकारावे
लागतील जे मला आवडत नाही. हे सणोत्सव आपल्या संस्कृतीचे, सामाजिक बदलांचे,
इतिहासाचे साक्षीदारही असतात. दुसरं म्हणजे त्यांना सरसकट नाकारलं तर आपला भारत
उत्सवहीन होऊन जाईल आणि हे सांस्कृतिक नुकसान आपल्याला परवडणार नाही. मग तो
कोणत्याही धर्माचा सण असो उत्सव असो, हा आपला वारसा आहे आणि तो जपून ठेवायलाच हवा.
पण त्याचं जे स्वरुप आहे ते मात्र बदलण्याची गरज आहे. ज्यामुळे धर्मही राहील,
ज्यांना तो हवा आहे आणि त्याचवेळी ज्यांना तो नको आहे त्यांनाही (म्हणजे माझ्यासारख्यांना)
कोणत्याही खंतीविना त्यात मनापासून सहभागी होता येईल.
आपल्या
इथे कालच वटपोर्णिमा साजरी झाली. वटपोर्णिमेची पारंपरिक कथा सर्वांनाच माहित आहे.
सावित्रीनं सत्यवानाचा जीव वाचवला आणि त्याच्या स्मरणार्थ साधारणपणे हा सण साजरा
करण्यात येतो. जन्मोजन्मी किंवा सात जन्मी आहे तोच नवरा मिळावा म्हणून बायका वडाच्या
झाडाची पूजा करतात. आता सध्याच्या काळात मला तरी हा प्रकार पसंत नाही. त्याची आधी
कारणं बघूयात.
- एक तर दुसरा जन्म नसतो. त्यामुळे पुढच्या जन्माची
तरतूद करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे.
- समजा दुसरा आणि त्यानंतरचेही जन्म असलेच तरीही
हाच नवरा दर जन्मात मिळावा असं किती बायकांना मनापासून वाटत असेल यात शंकाच आहे.
ब-याच जणी केवळ दबावाखाली ही पूजा करत असण्याची शक्यता जास्त आहे.
- बरं त्यांच्या नव-यांनाही हीच बायको हवी आहे का
याचा विचार यात करण्यात येत नाही. त्यांना गृहीतच धरण्यात येत असावं बहुधा.
- ही पूजा बायकांनीच का करायची हा त्याच्यापुढचा
मुद्दा. नव-यांनी का नको करायला ही पूजा?
- एकीकडे आपण वडाची आणि एकंदरीत सारी झाडं कापायची,
आहे ती राखायची नाही, नवी लावायची नाही आणि मग केवळ सण आहे म्हणून त्याची पूजा
करायची हा दांभिकपणा आहे.
आता ही सारी कारणं
लक्षात घेता मला व्यक्तिशः हा सण पसंत नाही. पण आधी म्हटल्याप्रमाणे म्हणून तो
नाहीसा व्हावं असंही मला वाटत नाही. कारण त्याचा मूलार्थ हा एका चांगल्या वैवाहिक
जीवनासाठी उपयुक्त असाच आहे. पती-पत्नीचं एकमेकांवरचं प्रेम, निष्ठा, विश्वास आणि
एकमेकांसाठी, आपल्या संसारासाठी कोणत्याही संकटाशी झुंझण्याची तयारी या गोष्टी
नाकारून चालणार नाही. आपण याची कितीतरी उदाहरणं बघत असतो. फक्त मी याला आदर्श
विवाह असं नाव देणार नाही. आदर्श असं जगात काहीच नसतं. असतो तो व्यवहार. व्यवहार
किती चांगला करतो येतो त्यावर आपलं जगणं आदर्शवत होत असतं. संसार यशस्वी करण्याची
जबाबदारी ही पती-पत्नींवरच नाही तर कुटुंबातील अन्य सदस्यांवरतीही असते. पण ही गोष्ट
आपण सहसा लक्षांत घेत नाही. त्यामुळे लग्नसंस्था, कुटुंब व्यवस्था टिकवण्याची
जबाबदारी सर्वांनी वाटून घ्यायला हवी. यातील महत्त्वाची जबाबदारी ही अर्थातच
पती-पत्नीची असते. आता या सर्व गोष्टी लक्षांत घेऊन जर आपण वटपोर्णिमा साजरी
करायची ठरवली तर मला वाटतं त्याला कोणाचा (म्हणजे माझ्यासारख्यांचा) विरोध
असण्याचं कारण नाही. मी जी ही वटपोर्णिमा साजरी करेन त्यात खालील गोष्टी असतील.
- वटपोर्णिमा हा केवळ बायकांचा सण न होता तो
कुटुंबाचा सण म्हणून साजरा व्हावा.
- केवळ पत्नीनेच नाही तर पतीनेही या वटपुजनात सामील
व्हावं.
- अनेक बायकांना इच्छा नसतानाही तो साजरा करण्याची
सक्ती होते. त्यामुळे त्यांना तो साजरा करणं न करण्याचं स्वातंत्र्य व अधिकार हा
असायलाच हवा. मन मारून केलेल्या कामाला यश मिळत नसतं.
- पारंपरिक पद्धतीनं पुजा करण्यासोबतच आपण
वर्षभरांत एकमेकांशी कसे वागलो याचा आढावा घ्यावा. झालेल्या चुकांची कबुली द्यावी,
आपली वागणूक चुकली असल्यास क्षमा मागावी, कोणी चांगलं काम केलं असेल तर मनापासून
कौतुक करावं आणि पुढच्या वर्षांत चुका टाळून अधिक चांगला संसार कसा करता येईल
याविषयी एकमेकांच्या भावना समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करावा.
- वट पुजन हा पर्यायाने पर्यावरण रक्षणाचाही अप्रत्यक्ष
संदेश देत असतो त्यामुळे यावेळी काही झाडं लावूनही तो साजरा करता येऊ शकतो. आणखी
काही नाही करता आलं तरी आपल्या हातून निदान वृक्षहानी होणार नाही याची तरी काळजी
घ्यावी.
- दुसरं असं की केवळ वडच पुजला पाहिजे अशी सक्ती
करण्यात आता अर्थ नाही. प्रत्येक ठिकाणी वडाचं झाड असेलच असं नाही. त्यामुळे जो वृक्ष
असेल तो पुजला तरी चालू शकतं, चालावं. कारण त्यामागची भावना महत्त्वाची आहे.
- धर्माची व्याख्या ही धारयती इती धर्मः म्हणजेच जे
धारण केले जाते तो धर्म अशी केली आहे. त्यामुळे यात धारण करण्याची जबाबदारी ही
एकट्या व्यक्तिवर सोपवलेली आहे. तुम्ही जे धारण कराल, ज्याचं आचरण कराल, जे तुमचे
विचार, कृती असतील तो तुमचा धर्म होतो. त्यामुळे चांगलं धारण करायचं की वाईट धारण
करायचं हा तुमचा निर्णय आहे. तुमचा धर्मही त्याप्रमाणे बरा-वाईट होतो. आपण जर
चांगल्या निरोगी भावनेनं, परंपरांची जोखडं झुगारून, कोणत्याही दबावाविना जर हा सण
साजरा करू तरच त्याला महत्त्व येईल अन्यथा तो हळूहळू नष्ट होईल. कारण आताही हा सण
प्रत्येक बाई साजरी करत नाही. त्याचं प्रमाण घटत चाललय. पण त्याचा नवा अर्थ
लक्षांत घेतला तर कदाचित हा सण पुढेही टिकून राहिल.
आधुनिकतेचा अर्थ अनेक लोक फार चूकीचा घेतात. आधुनिकता म्हणजे जुन्याशी
फारकत घ्यायची, जुन्या सा-या गोष्टी मोडीत काढायच्या असं लोकांना वाटतं. आधुनिकता
म्हणजे जे आहे त्यात सुधारणा करणं होय. त्यामुळे जुन्या गोष्टी टिकवून त्यांत नवीन
काय करता येईल व काल सुसंगत असे कोणते बदल त्यात करता येईल हे बघणं म्हणजे
आधुनिकता होय. सरसकट जुनं ते वाईट, गावंढळ असा शिक्का लावून सारं नाकारत गेलो तर
आपली संस्कृतीच नष्ट होईल. समाज अशा पद्धतीनं टिकून राहू शकत नाही. तो मग एकसूरी,
निरस, रटाळ, निरर्थक होतो. जगण्याच्या प्रेरणा नष्ट होतात. त्यांतला गोडवा नाहीसा
होतो. पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी, वारसा म्हणून देण्यासाठी आपल्या हाती मग काही
शिल्लक राहत नाही परिणामी एक आधारहीन, रिक्त पिढी तयार होते. जिच्याकडून कोणत्याच
सखोल कामांची आपण अपेक्षा करू शकत नाही. हे टाळायचं असेल तर डोळसपणे आपण आपल्या
संस्कृतीकडे बघायला हवं. हा अर्थात एक विचार आहे. तो अंमलात आणायचा की नाही हे
ज्यानं त्यानं ठरवायचं आहे.
No comments:
Post a Comment