Monday, June 4, 2018

स्वागत मॉन्सुनचे


मॉन्सून सुरू झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी तो वेळेत सुरू झाला आहे. निसर्गाची ही कृपा आहे तिचा योग्य उपयोग आपण करून घ्यायला हवा. मागील महिन्यांत महाराष्ट्रांत अनेक गावांमध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यात शेकडो गावांनी सहभाग नोंदवला आणि जल संधारणाची कामे केली. गाव एकत्र येतो तेव्हा अनेक कामं लिलया घडतात हे पुन्हा एकदा त्यांतून सिद्ध झालं आहे. प्रश्न आहे तो फक्त एकत्र येण्याचा. सुदैवाची बाब म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी या स्पर्धेत सहभागी होणा-या गावांची संख्या अधिक होती. पुढील वर्षी ती आणखी जास्त असेल यात शंका नाही. आमीर खान, किरण राव, सत्यजीत भटकळ, जितेंद्र जोशी या सांरखे लोक मनापासून काम करत आहेत हे पाहून खरोखरच खूप आनंद होतोय. तुम्ही जर या स्पर्धेत भाग घेतला असेल तर तुमचं अभिनंदन. नसेल घेतला तर पुढील वर्षी नक्कीच तुमच्या गावासाठी एवढं नक्कीच करा. ही आपल्या पुढच्या पिढीला दिलेली सर्वोत्तम भेट ठरेल.
आणखी अशीच एक भेट असेल वृक्षांची. पाऊस सुरू झाल्यानंतर नव्या बीजांना धुमारे फुटतील. निसर्ग त्याचं हे काम करणार आहेच पण शहरात आणि गावांत जिथे माणसांमुळे निसर्गाची हानी झालेली आहे. तिथं ती भरून काढण्यासाठी आपणही स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी बीजगोळ्यांचा एक उपक्रम आपल्याला राबवता येऊ शकतो. विविध देशी झाडांच्या बिया, उदा. कडूनिंब, आंबा, पिंपळ, वड, चिंच, बोर, फणस, पेरू, इत्यादींच्या बिया एकत्र करून त्यांचा मातीचा गोळा तयार करायचा आणि तो पडीक मोकळ्या जागी फेकायचा. पावसाच्या पाण्यात हा गोळा मातीत विरघळतो आणि त्यांतील बिजं जमिनीत रोवली जातात आणि रुजतात आणि अंकुरतात. याला फारसा खर्च येत नाही. अनेक संस्था असे उपक्रम राबवत असतात. त्यांचा शोध घ्या आणि त्यांची मदत घ्या.
या मॉन्सुनचं स्वागत आपण अशा प्रकारे करूयात. याच नव्हे तर पुढच्या प्रत्येक मॉन्सुनच्या स्वागताची तयारी आपण अशा पद्धतीने केली तर त्यानं आपला निसर्ग भरून पावेल. ज्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे.

Sunday, February 4, 2018

देवाशिवाय माणसं जगू शकतात

  देवाशिवाय, त्याच्या विश्वासाशिवाय, माणसं जगू शकतात. कारण जगण्याची कारणं ही पूर्णतः व्यावहारीक असतात. देवावर विश्वास ठेवून जगणारी माणसंही मरतात कारण मरण्याची कारणं देखील पूर्णतः व्यावहारीकच असतात. देवाच्या असण्या-नसण्याचा माणसाच्या जगण्या-मरण्याशी काहीही संबंध नाही. तो एक निर्विकार व्यवहार आहे, अटळ असा निसर्गक्रम आहे. त्यामुळे देवाशिवाय माणसाचं अस्तित्त्व पूर्वीही होतं आणि यापुढेही राहणार आहे जर त्यानं स्वतःच स्वतःचा नाश ओढवून घेतला नाही तर. पण माणसांशिवाय देवाचं अस्तित्त्व क्षणभरही टिकणार नाही. करोडो मानवेतर प्राणी देवाच्या अस्तित्त्वाशिवाय, जाती-धर्माशिवाय जगत आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत. नवस करीत नाहीत. उपवास पाळत नाहीत. व्रत-उत्सव साजरे करत नाहीत. त्यांचं काहीच बिघडलेलं नाही. पण म्हणूनच ते प्राण्यांच्या जन्माला आले आहेत आणि आपण माणसांच्या जन्माला, असा युक्तिवाद कोणी करत असेल तर तो मला पटत नाही. आपण सर्वश्रेष्ठ आहोत, हा माणसांचा भ्रम आहे. माणसांची एकंदर वागणूक बघता ते नसतील तर हे जग अधिक सुंदर होईल यावर माझा विश्वास आहे. माणूस नसेल तर देवही नसेल. कारण मूळात देव आहे तो माणूस आहे म्हणूनच.
तर हा देव! देवाच्या उत्पत्तीविषयी सांगायचं तर माणसांचे सुरुवातीचे देव म्हणजे नैसर्गिक शक्तिच होत्या. सूर्य, चंद्र, आकाश, पृथ्वी, वारा, पाणी, इत्यादी इत्यादी. पुढे माणसांमधून काही अचाट कामं करणारी माणसं निर्माण झाल्यावर लोकांनी त्यांना देवत्त्व बहाल केलं. पुढच्या पिढ्यांनीही परंपरांच्या ओझ्याखाली दबून, खरेखोटेपणाची कोणतीही चिकित्सा न करताच त्यांना मान्यता दिली. खरं तर ज्या माणसाशी, किंवा नंतर परावर्तीत झालेल्या देवाशी माझा थेट संबंध आला नाही त्याला मी काही कारण नसताना देव म्हणून का मान्यता द्यावी? अचाट कृत्ये करणारी ही मूळात माणसंच होती. त्यांच्या संपर्कातील लोकांना त्यांच्यामुळे काही फायदा झाला म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या लोकांनी त्या माणसांचा गौरव करणं हे समजण्यासारखं आहे. काळाच्या ओघात त्यांना देवत्त्व मिळालं हेही समजण्यासारखं आहे. पण त्याचं ओझं किती काळ वागवत राहायचं आपण?
मला हे असे प्रश्न कायम पडत आले आहेत. देवाच्या भ्रामक जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला त्यांचा उपयोग झाला. तुम्हीही हे प्रश्न विचारू शकता. विचारा स्वतःला की जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा त्याला माणसंच जबाबदार असतात ना? त्या संकटांतून आपली सुटका करणारीही माणसंच असतात ना? हाच प्रश्न देवांच्या संदर्भातही विचारा. तुम्ही हे करायला लागलात की कळेल की तुमच्या सुखाला तुमच्या अवतीभवतीची माणसंच बहुधा कारणीभूत असतात. तुम्ही त्यांना देवमाणूस म्हणून मान्यता द्यालच पण त्यांना देव म्हणणार का? तुम्ही जरी त्यांचा देव म्हणून स्वीकार केला तरी इतर लोक त्याला मान्यता देतील का? नाही देणार. कारण त्यांचे वेगळे देव असतील. आता तुमच्या दुःखांना कारणीभूत असलेल्यांची यादी करा. ती माणसंदेखिल तुमच्या अवतीभवतीचीच असतात. त्यांना तुम्ही राक्षस म्हणून मान्यता देणार की नाही? नक्कीच द्याल. पण इतरांना कदाचीत त्यावर आक्षेप असेल. मान्यता देण्या न देण्याच्या या खेळांत ज्यांची बाजू मजबूत होती त्यांचे देव अस्तित्त्वात आले आणि ज्यांची बाजू कमकूवत होती त्यांचे राक्षस अस्तित्त्वात आले. देव-राक्षसांची निर्मिती सुरूवातीच्या काळात अशी झाली आहे. प्रत्येक मानवी समुहांतील प्रतिभावंत कवींनी मग याच काही असामान्य माणसांचं व त्यांच्या लोकहीतकारी घटनांचं उदात्तीकरण करून देवांमध्ये आणि चमत्कारांमध्ये रुपांतर केलं. त्यांच्या आड आलेल्या व्यक्तिंना राक्षस म्हणून अपमानीत केलं.
माणसांनी देवांची निर्मिती केली आहे त्याचे असंख्य पुरावे आहेत. पण देवांनी आपली निर्मिती केली आहे याचे किती पुरावे आहेत? सहा दिवसांत जग तयार केलं आणि सातव्या दिवशी माणसांना जन्म दिला किंवा डोक्यापासून, हातापायांपासून माणसांची निर्मिती झाली अशा गोष्टींवर कोणी विश्वास ठेवणार असेल तर त्यानं आधी आपलं डोकं तपासून घेतलेलं बरं. कारण देव काही तुमच्या मदतीला धावून येणार नाही पण तुमचं डोकं, त्यांतला मेंदू कायम तुमच्या मदतीसाठी तयार असेल. म्हणून देवापेक्षा जास्त काळजी मेंदूची घेतलेली कधीही चांगलं!
माझा जर देवावर विश्वास नाही तर कोणावर आहे? माझा निसर्गावर विश्वास आहे. माझा माणसांवर विश्वास आहे. देव म्हणून ज्यांना आज मान्यता देण्यात आली त्यांच्यावरही माझा विश्वास आहे पण केवळ माणूस म्हणून. देव म्हणून नाही. त्यांच्या बुध्दीला पटणा-या गोष्टींवरही माझा विश्वास आहे. पण त्यांच्या कोणत्याच बाष्कळ चमत्कारांवर माझा विश्वास नाही. ती माणसं आजही मला अगदी जवळची वाटतात ती त्यांच्या मानवोपयोगी कृत्यांमुळे. त्यांच्या जातीधर्मामुळे नाही. देशामुळे नाही. लिंगामुळे नाही. माझा त्यांनी कोणता फायदा केला आहे म्हणून नाही. तर ती माझ्या सारखीच माणसं होती आणि माझ्यातही त्यांच्यासारखीच कर्तृत्त्वाची उत्तूंग झेप घेण्याची शक्यता आहे, याची जाणीव व प्रेरणा मला त्यांच्यामुळे मिळते म्हणून.
हिंदू धर्मियांनी वेदांमध्ये संपूर्ण विश्व म्हणजे एक कुटुंब आहे अशी सुंदर संकल्पना प्राचीन काळात मांडली होती. वेद हे आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी लिहिलेले प्रार्थना ग्रंथ. त्यांनाच पुढे धर्मग्रंथांची मान्यता मिळाली आणि मग सारी गडबड झाली. या ग्रंथांमध्ये अनेक सुंदर विचार मांडले आहेत. ते कृतींमध्ये फारसे उतरले नाहीत हा भाग निराळा. संपूर्ण हिंदू धर्मियांसाठी ते धर्मग्रंथ व त्यातील विचार आहेत हाही तद्दन खोटा दावा. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले हे ग्रंथ होते. त्यातील विचारही त्यांच्यासाठीच लागू होते. त्यामुळे कोणी जर ते अखिल मानवतेसाठी व्यक्त केलेले विचार होते वगैरे दावे करू लागले की मला हसायला येतं. पण अर्थात आता परिस्थिती बदलली आहे कारण काळ बदलला आहे. त्यामुळे या धर्मग्रंथातील काही सुंदर विचारांचा अवलंब ब्राह्मणेतरांनी केला तर त्याला कोणी काही हरकत घेणार नाही. दुसरं असं की असे विचार स्वतंत्रपणे देखील कोणाच्याही मनात जन्माला येऊ शकतात. त्यासाठी ब्राह्मण असण्याची पूर्व अट नाही.

 तर या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशी कल्पना आहे की संपूर्ण जगत हे चैतन्यमयी आहे. सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये वसणारं हे चैतन्य सजीव व निर्जीव चैतन्य आहे जे एकच आहे. आता ही अतिशय सुरेख अशी कल्पना आहे. मनुष्य व मनुष्येतर जीवांमध्ये आणि इतकंच नाहीतर अचेतन वस्तूंमध्येही एकत्वाचा धागा जोडणारी ही संकल्पना आहे. त्यामुळेच हिंदूंमध्ये निसर्गाची, प्राणीमात्रांची, वनस्पतींची पुजा करण्याची पद्धती आहे. दगडांना, शस्त्रांना, दागिण्यांनाही इथे पुजलं जातं. या संकल्पनेचा पुढचा टप्पा म्हणजे हे संपूर्ण जगत हे एकच एकक आहे. त्याला एकच अस्तित्त्व आहे आणि एकच मन आहे. यालाच आपण वैश्विक मन म्हणूया. या वैश्विक मनात कोणताही भेदाभेद नसतो. याला काळाचे नियम लागू होतात पण इतर कोणत्याही मानवी परिमाणांमध्ये याचं मोजमाप करता येत नाही. आपण जीवंत आहोत तोवर या वैश्विक अस्तित्त्वाचे आणि या वैश्विक मनाचे भाग असतो. आपलं काही कर्तृत्त्व असेल तर आपण गेल्यानंतरही आपल्या कर्तृत्त्वाचा काही एक भाग या वैश्विक अस्तित्त्वात कायमस्वरूपी टिकून राहू शकतो. ही सारी प्रस्तावना यासाठी कारण मी स्वतःला या वैश्विक अस्तित्त्वाचा एक भाग मानतो.

Sunday, December 31, 2017

शुभ नव वर्ष २०१८

माझ्या सर्व वाचकांना वर्ष २०१८ च्या आभाळभर शुभेच्छा! काळ आपण बांधून ठेवू शकत नाही. काळाचे असे दिवस, महिना, वर्षांचे तुकडे माणसानं आपल्या सोयीसाठी पाडलेले आहेत. त्यांतून माणसाचा हिशेबीपणा दिसतो. पण त्याचबरोबर आपण किती जगतो हेही कळतं. याच किती जगण्यात आपण कसं जगतो यालाही महत्त्व आहे. खरंतर सर्वांत जास्त महत्त्व त्यालाच आहे. त्यामुळे मागील वर्षभरांत आपण कसे जगलो याची स्वतःशीच उजळणी करत यावर्षी आपण कसे जगणार आहोत याचा विचार करायचा आहे.
आपण हे वर्ष मानसिक आनंदाला देऊ या. आपल्या रोजच्या आयुष्यातील धावपळीनं आपल्या शरीरावर जितका ताण पडतोय त्याहीपेक्षा जास्त ताण आपल्या मनावर पडत असतो. आणि मनाचं स्वास्थ्य जर उत्तम नसेल तर शरीर स्वस्थ राहू शकत नाही. शरीर स्वस्थ नसेल तर मन आनंदी राहणार नाही. हे एक दुष्ट चक्र आहे. त्याचा भेद करायचा असेल तर मनावरचा हा ताण काढणं शिकायला हवं.
मानसिक ताण केवळ विचारांनी घालवता येऊ शकत नाही. त्यासाठी काही कृती आवश्यक असते. कृतीमुळे आपलं मन गुंतून राहतं आणि नको त्या गोष्टींचा विचार बाजूला पडतो. शरीर कामात गुंतून राहीलं की नको ते विचार करायला वेळ भेटत नाही. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक ठरतात आणि मनावरचा अनावश्यक आणि आरोग्यास अपायकारक ताण दूर होण्यास मदत होते.
यावर्षी निराशेला मनात भाडेकरू म्हणून ठेवू नका. आनंदाला ठेवा. तो तुम्हाला दररोज आनंदाचं भाडं देईल. आनंद असेल तर उत्साह येतो. उत्साह असेल तर मनात सकारात्मक विचार येतात. सकारात्मक विचार प्रयत्न करण्यासाठी आपल्याला प्रेरीत करतात. प्रयत्न असतील तर यशाची शक्यता निर्माण होते. जिथं शक्यता आहे तिथं जगण्यास वाव असतो. निराश मनानं शक्यतेपर्यंतचा प्रवास घडू शकत नाही. आनंदी मनच तुम्हाला या शक्यतेपर्यंत घेऊन जातं.
फार काही करण्याची गरज नाही. मनात निराशा असेल तेव्हा तुमच्या आवडीचं काम करा. थोडे स्वार्थी व्हा. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला आनंद वाटेल अशा गोष्टी करा. तग धरून राहा. परिस्थिती बदलत असते. संधीची वाट बघत राहा. कधीतरी ती मिळेल तेव्हा तिच्यासाठी आजच तयार राहा. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी याचा विचार करा की तुमच्या जाण्यानं जगाचं नुकसान होणार नाही, तुमचं होईल. पण तुमच्या असण्यानं तुमच्यासोबतच कदाचित जगाचंही भलं होण्याची शक्यता आहे. हे जग तुमच्या अवती भवतीच असतं. त्यातला कोणताही कोपरा निवडा आणि ते जग बदलण्यास सुरूवात करा. करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. गरज आहे ती चिकाटीची. धैर्याची. सहनशक्तिची. इन्स्टंट असं जगात काहीच मिळत नाही. इन्स्टंट कॉफीलाही काही वेळ लागतो तयार होण्यासाठी. जगणं तर फार कसोशिनं घडवावं लागतं. पण त्याचे फायदेही तुम्हालाच मिळत असतात.

तेव्हा हे नव वर्ष तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगा. निराशेला, हताशेला, नकारात्मक विचारांना गुडबाय करा आणि उत्साहाला, आनंदाला, सकारात्मकतेला घट्टी मिठी मारा. लेट्स डू इट!

Friday, December 29, 2017

नववर्षाच्या शुभेच्छा- एकमेकांना बळ देण्यासाठी




२०१७ आता संपत आलं आहे. सरत्या वर्षांत आपण काय केलं, काय नाही केलं, काय मिळवलं, काय गमावलं याचा ताळेबंद काही जणांनी आता मांडायला सुरूवात केली असेल. सुखाच्या क्षणांची जशी आठवण येऊन हुरहूर वाटत असेल त्याचप्रमाणे दुःखाचे क्षण आठवून डोळ्यांच्या कडाही ओलावत असतील. सन्मानाचे क्षण मनाला उभारी देतील आणि अपमानाचे क्षण अधिक चांगलं करता येण्यासाठी जिदद् देतील.
जे झालं ते बदलता येत नाही. त्याचे बरे-वाईट परिणाम मात्र न चूकता भोगावेच लागतात. त्यामुळे आपण जे करतो ते करण्याआधी थोडा वेळ थांबून विचार करा. तात्कालिक फायद्याच्या आधारे असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे नंतर तुम्हालाच नुकसान होईल. माणुसकीपेक्षा मोठं असं काही नाही, निसर्गापेक्षा मोठं काही नाही, त्यामुळे तुम्ही असं काहीही करू नका ज्यामुळे उद्या तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. भावनेच्या भरात आपण वाहून जातो आणि तो भर ओसरला की जे झालं त्यानं मन विषण्ण होतं. अशी परिस्थिती स्वतःवर ओढवून घेऊ नका.
आपण एकटे असलो तरी आपण कमकुवत आहोत असा विचार कधी करू नका. तुम्हाला जग बदलायची गरज नाही. स्वतःला बदललं तरी खूप झालं. तुमचं कुटुंब तुमच्याकडे बघून आपोआपच बदलेल. फार तर बाहेर जाऊन तुमच्या परीसरातील कोणत्या गोष्टी बदलता येतील त्याचा विचार करा पण तसं करताना स्वार्थाचा विचार करू नका. प्रसिद्धीसाठी काही करू नका. कच-याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, विजेची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, त्यावर संबंधित अधिका-यांना न घाबरता भेटा, चर्चा करा. तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुमचा मान सर्वोच्च असतो. निवडून दिलेले राजकीय नेतेही तुमच्यामुळेच नेते असतात हे विसरू नका. त्यामुळे त्यांच्याशी समान पातळीवरच वागा. तुम्ही स्वतःला लहान समजलात तर सारे तुम्हाला लहान समजून दाबून टाकतील. तसं होऊ देऊ नका. आपल्या नागरी अधिकारांबाबत कायम जागृत असा.
समाज म्हणून देश म्हणून आपली एकजूट टिकून राहीली तरच व्यक्ति म्हणून तुम्हीही टिकून राहाल. समाजाची देशाची प्रगती होते तेव्हाच व्यक्ति म्हणून तुमचीही प्रगती होते. त्यामुळे असं काहीही करू नका किंवा अशा कोणत्याही गोष्टीला पाठींबा देऊ नका जी समाज विघातक असेल, देशाला अडचणीत आणेल. धर्म, जात, देव या खासगी श्रद्धेच्या बाबी आहेत. त्यावरून एकमेकांचा द्वेष करू नका. त्यांतून काहीही साध्य होत नाही. तुमच्या धार्मिक श्रद्धा, तुमच्या जातीय अस्मिता या देशापेक्षा आणि माणुसकीपेक्षा मोठ्या नाहीत हे विसरू नका.
निसर्गाचा सांभाळ करा. तर निसर्ग तुमचा सांभाळ करेल. माणूस म्हणून एक समंजस विचारी प्राणी म्हणून आपली ही जबाबदारी आहे. निसर्गाची हानी होणार नाही, झालेलं नुकसान भरून येण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. पुढच्या पिढ्यांसाठी हा निसर्ग जपून ठेवा.
मनात आणलं तर खूप काही करता येतं. स्वार्थ सोडला तर मोठमोठ्या गोष्टी मिळवता येतात. एकदा प्रयत्न नक्की करा. इतरांची मदत करून खूप आनंद मिळतो. प्रामाणिकपणे वागून सुखाची झोप लागते. पैसा मिळवण्यासाठी फसवणूकच करावी लागते असा भ्रम मनातून काढून फेका. आयुष्य क्षणिक आहे, अनपेक्षित आहे त्यामुळे उद्याचा विचार करून कायमच आज चांगला जगण्याचा प्रयत्न करा. आपण सारे एकमेकांसाठी आहोत. नव्या वर्षांत या गोष्टी लक्षांत ठेवूया.

तुम्हा सर्वांना वर्ष २०१८ च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Wednesday, December 27, 2017

माणसं-प्राणीसृष्टी-निसर्ग जोपासूया

नवीन वर्ष यायला आता आणखी तीन दिवस बाकी आहेत. नववर्षाचे संकल्प काय असावेत यावर आपण मागे बोललो होतो त्यातला आणखी एक संकल्प मी आज सुचवतोय. या नवीन वर्षांत आपण माणसं जोडूयात, प्राणीसृष्टी जोपासूयात आणि निसर्ग वाढवूयात.
माणसाची खरी संपत्ती पैसा, जमीन, सोनंनाणं ही नसते. ते मूल्यवान असतातच पण माणसाची खरी संपत्ती त्याच्या आयुष्यात आलेली माणसं असतात. ही संपत्ती कधीच नष्ट होत नाही. माणसं जोडणं हे वाटतं तितकं अवघड काम नाही. पण अनेकांना ते अवघड वाटतं कारण साध्यासोप्या गोष्टी करणं ते टाळतात. ते प्रेम करत नाहीत. ते विश्वास ठेवत नाहीत. ते व्यवहार आणि भावना यांची गल्लत करतात. ते मैत्री निभावत नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते माणुसकी पाळत नाहीत. मान्य की आपलं प्रत्येकाशी काही जुळत नाही आणि त्याचा आग्रहही धरण्याची गरज नाही. पण आपण सर्वांशी ओळख तर नक्कीच ठेवू शकतो. इतरांचा सन्मान करा, आदरानं वागा बोला, प्रामाणिक रहा, मदतीला धावून जा, हसून भेटा, या गोष्टी करणं खरंच इतकं कठीण आहे का? मला नाही वाटत तसं. एक साधा नियम आहे की तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला परत मिळतं. तेव्हा काय द्यायचं ते तुम्ही ठरवा.

आपल्या सभोवतालची प्राणीसृष्टी जपण्यासाठीही आपण प्रयत्न करायला हवेत. पण त्याचबरोबर आपल्यापासून दूर राहणा-या प्राणीसृष्टीबद्दलही मनात प्रेमाची आपुलकीचीच भावना ठेवायला हवी. माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी अन्य प्राण्यांवर अत्याचार केले, करत आहेत, त्याची जमिन माणसानं बळकावली आणि जमेल तिथं हे प्राणी कसे आपल्याला त्रास दायक ठरतात याचा तो कांगावा करत राहतो. पण आपण त्यांच्यावर काय अन्याय करत असतो याचा त्याला सोयिस्कर विसर पडतो. ही प्राणीसृष्टी नष्ट झाली तर काय होईल याचा एकदा नक्की विचार करा. तुम्हाला आधी वाटेल की बरं आहे कटकट मिटली. पण या प्राण्यांमुळेच निसर्गाचं चक्र समतोल राहण्यास मदत होत असते. हे प्राणी नष्ट झाले तर हा समतोलही बिघडेल आणि त्याचे घातक परिणाम दिसतील. आपल्या हातानं आपला हा विनाश ओढवून घेऊ नका.
माणसं आहेत ती निसर्गामुळे. हवा. पाणी. सूर्यप्रकाश. आकाश. वनस्पती. जमिन. हे आपल्या जगण्याचे अत्यावश्यक घटक आहेत. ते प्रदुषित करू नका. त्याचे घातक परिणाम आपल्याला माहितच आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही. फार काही करायचं नाही त्यासाठी. फक्त तुम्ही निश्चय करा की मी माझा निसर्ग नष्ट करणार नाही, प्रदुषित करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. निसर्ग प्रदुषित झाला नष्ट झाला तर माणुसही नष्ट होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

आपल्या नव्या वर्षांचं स्वागत आपण या संकल्पानं करू यात. सो लेट्स डू इट!

Monday, December 25, 2017

त्यांना प्रेमाची उब द्या...


हिवाळा आता पूर्ण भरात आहे. पुढील महिन्यांत थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सकाळी उठून वाफाळता चहा कॉफी पिण्याची मजा वेगळीच असते. शिवाय याच दिवसांमध्ये व्यायाम करायचाही दांडगा उत्साह जागा होतो. दिवसभर स्वेटर, शॉल, जॅकेट्स, मफलर, कानटोपी घालून थंडी पळवायचे उपायही शोधायचे आणि रात्री मस्त दोनतीन दुलया, रजाई घेऊन झोपायचं.
पण हे सर्वांसाठीच शक्य असेल असं नाही. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारे लोकही संख्येनं बरेच आहेत ज्यांना घालायला गरम कपडे नाहीत. शेकोटीची उब नाही. वाफाळता चहा नाही. रात्री रजईत, ब्लँकेटमध्ये झोपण्याची त्यांची सोय नाही. या थंडीत त्यांचा विचार करायला विसरू नका. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात. आश्रमशाळा असतील, अनाथालयं असतील, झोपडपट्टीतील लोक असतील, बाहेरून कामासाठी आलेले आणि फुटपाथवर राहणारे लोक असतील, ज्यांच्यासाठी आपण नक्कीच काही करू शकतो. तुम्हाला शक्य असेल तर त्यांच्यासाठी गरम कपडे तुम्ही घेऊ शकता. ते शक्य नसतील तर तुमच्याकडचे वापरात नसलेले कपडे तुम्ही देऊ शकता. प्रेमाची ही उब त्यांना फार मोलाची ठरेल. कुठे वृद्धाश्रम असतील तर तिथल्या वृद्धांसाठी काय करता येईल याचा विचार करा. त्यांना तर कपड्यांसोबत सोबतीचीही उब हवी असते. त्यासाठी फार वेळ लागणार नाही.
समाजात राहताना आपण याचं भान कायम राखायला हवं की जर आपण सुस्थितीत असू तर जे तसे नाहीत त्यांच्यासाठी काही करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती माणुसकीची खूण आहे. त्याची सक्ती कोणावरच नाही पण आपल्या समाधानासाठीच हे सारं करायचं असतं. प्रसिद्धीसाठी नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कारण आपणही कदाचित त्यांच्या जागी असू शकलो असतो. ते झालं नाही याचा जसा आनंद आहे तसंच ज्यांना ते जमलं नाही त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातला सुखातला आनंदातला थोडा भाग वाटून घेणं ही आपली जबाबदारी आहे.

प्रेमाची ही उब देताना आम्ही तुमच्यासोबत आहोत इतका विश्वास जरी त्यांना मिळाला तरी ती मोठी गोष्ट ठरेल. आपण कोणाचंही जगणं बदलू शकत नाही पण आहे त्या जगण्यात काही आनंदाचे क्षण नक्कीच देऊ शकतो. हे आपण कराल, करावं अशी आशा आणि अपेक्षाही आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मावळत्या वर्षांला आपण या काही सुंदर आठवणी भेट म्हणून देऊयात. सो लेट्स डू इट!

Saturday, December 23, 2017

जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे





उद्या नाताळ आहे. त्याच्या सर्वांना शुभेच्छा. जरी मी ख्रिश्चन नाही आणि तुमच्यातले बहुसंख्यही ख्रिश्चन नसले तरीही नाताळच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आपल्या धर्माचा सण नाही उत्सव नाही म्हणून तो करायचा नाही, ज्यांचा तो सण आहे त्यांना त्याच्या शुभेच्छा द्यायच्या नाही ही काही सभ्यता नाही. तशी आपली संस्कृतीही नाही. पण अलिकडच्या काळात तथाकथित धार्मिकांनी तुम्ही जर अन्य धर्मांचं गुणगान कराल तर तुम्ही धर्मद्रोही असे फतवे काढणं सुरू केलं आहे. असले करंटे लोक सर्वंच धर्मांत आढळतात. मला अशा लोकांचा आताशा राग येत नाही. मला त्यांची दया येते. एखादा आजारी माणूस असतो ना तसे हे धर्मांध लोक असतात. आजारी माणूस आपल्या आजारपणामुळे त्रस्त असतो तसे हे त्यांच्या धार्मिक श्रेष्ठगंडानं आजारी असतात. आजारी माणूस चीडचीड करतो पण म्हणून आपण त्याच्यावर ओरडत नाही. तो आजारी आहे म्हणून त्याला सांभाळून घेतो तसंच या धर्मग्रस्त लोकांना सांभाळून घेण्याची गरज आहे. त्यांनी ज्यादा चीडचीड केलीच तर सरळ त्यांच्याकडे दूर्लक्षच करा मग.
या विचार-गरीबांना आपण इतर धर्मियांचा राग करून, हेटाळणी करून कोणत्या आनंदाला मुकतो आहोत याचं भान नसतं. वेगवेगळे धर्म आहेत, जाती आहेत, (आता ते आहेत त्याला नाईलाज आहे) त्यांच्या विविध संस्कृती आहेत त्याचा आनंद घ्यायला हवा. त्यांचे सण असतात, कपडे असतात, खाणं-पिणं असतं, संगित, नाच असतो या सर्वांचा आनंद घ्यायला हवा. पण ते सोडून काही मूर्ख हे आपल्या धर्मात बसत नाही, असल्या आरोळ्या ठोकत राहतात. अशावेळी हमखास त्या धर्मातल्या चूकीच्या गोष्टींचा दाखला देऊन आपलं मनं भडकवली जातात. चूकीच्या गोष्टी काय आपल्या धर्मांत नाहीत? खरं तर धर्म चुकीचे नसतात. माणसं चूकीचं वागत असतात व त्यामुळे धर्म बदनाम होतात.
एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी एकमेकांचा दुस्वास मत्सर करण्यात काही लोकांना जो आनंद मिळतो त्याला निव्वळ विकृती म्हणतात. मला खात्री आहे तुम्ही असे विकृत नाही आहात. तुम्ही उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघणारे आहात. त्यामुळेच प्रत्येक धर्मातील चूकीच्या गोष्टी जशा तुम्हाला दिसतात तशाच चांगल्या योग्य गोष्टीही तुम्हाला दिसतात. त्या चूकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि चांगल्या गोष्टी वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल याची मला आशा आहे.

नाताळच्या निमित्तानं आपण या धर्मांधांना पुन्हा सांगूयात की आमचा प्रेमावर विश्वास आहे. द्वेषावर नाही. सो लेट्स जिंगल द बेल अँड से लेट्स डु इट!