२०१७
आता संपत आलं आहे. सरत्या वर्षांत आपण काय केलं, काय नाही केलं, काय मिळवलं, काय
गमावलं याचा ताळेबंद काही जणांनी आता मांडायला सुरूवात केली असेल. सुखाच्या
क्षणांची जशी आठवण येऊन हुरहूर वाटत असेल त्याचप्रमाणे दुःखाचे क्षण आठवून
डोळ्यांच्या कडाही ओलावत असतील. सन्मानाचे क्षण मनाला उभारी देतील आणि अपमानाचे क्षण
अधिक चांगलं करता येण्यासाठी जिदद् देतील.
जे
झालं ते बदलता येत नाही. त्याचे बरे-वाईट परिणाम मात्र न चूकता भोगावेच लागतात.
त्यामुळे आपण जे करतो ते करण्याआधी थोडा वेळ थांबून विचार करा. तात्कालिक
फायद्याच्या आधारे असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे नंतर तुम्हालाच नुकसान होईल. माणुसकीपेक्षा
मोठं असं काही नाही, निसर्गापेक्षा मोठं काही नाही, त्यामुळे तुम्ही असं काहीही
करू नका ज्यामुळे उद्या तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. भावनेच्या भरात आपण वाहून
जातो आणि तो भर ओसरला की जे झालं त्यानं मन विषण्ण होतं. अशी परिस्थिती स्वतःवर
ओढवून घेऊ नका.
आपण
एकटे असलो तरी आपण कमकुवत आहोत असा विचार कधी करू नका. तुम्हाला जग बदलायची गरज
नाही. स्वतःला बदललं तरी खूप झालं. तुमचं कुटुंब तुमच्याकडे बघून आपोआपच बदलेल.
फार तर बाहेर जाऊन तुमच्या परीसरातील कोणत्या गोष्टी बदलता येतील त्याचा विचार करा
पण तसं करताना स्वार्थाचा विचार करू नका. प्रसिद्धीसाठी काही करू नका. कच-याची
समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, विजेची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल,
त्यावर संबंधित अधिका-यांना न घाबरता भेटा, चर्चा करा. तुम्ही या देशाचे नागरिक
आहात आणि तुमचा मान सर्वोच्च असतो. निवडून दिलेले राजकीय नेतेही तुमच्यामुळेच नेते
असतात हे विसरू नका. त्यामुळे त्यांच्याशी समान पातळीवरच वागा. तुम्ही स्वतःला
लहान समजलात तर सारे तुम्हाला लहान समजून दाबून टाकतील. तसं होऊ देऊ नका. आपल्या
नागरी अधिकारांबाबत कायम जागृत असा.
समाज
म्हणून देश म्हणून आपली एकजूट टिकून राहीली तरच व्यक्ति म्हणून तुम्हीही टिकून
राहाल. समाजाची देशाची प्रगती होते तेव्हाच व्यक्ति म्हणून तुमचीही प्रगती होते.
त्यामुळे असं काहीही करू नका किंवा अशा कोणत्याही गोष्टीला पाठींबा देऊ नका जी
समाज विघातक असेल, देशाला अडचणीत आणेल. धर्म, जात, देव या खासगी श्रद्धेच्या बाबी
आहेत. त्यावरून एकमेकांचा द्वेष करू नका. त्यांतून काहीही साध्य होत नाही. तुमच्या
धार्मिक श्रद्धा, तुमच्या जातीय अस्मिता या देशापेक्षा आणि माणुसकीपेक्षा मोठ्या
नाहीत हे विसरू नका.
निसर्गाचा
सांभाळ करा. तर निसर्ग तुमचा सांभाळ करेल. माणूस म्हणून एक समंजस विचारी प्राणी
म्हणून आपली ही जबाबदारी आहे. निसर्गाची हानी होणार नाही, झालेलं नुकसान भरून
येण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. पुढच्या पिढ्यांसाठी हा निसर्ग जपून ठेवा.
मनात
आणलं तर खूप काही करता येतं. स्वार्थ सोडला तर मोठमोठ्या गोष्टी मिळवता येतात.
एकदा प्रयत्न नक्की करा. इतरांची मदत करून खूप आनंद मिळतो. प्रामाणिकपणे वागून
सुखाची झोप लागते. पैसा मिळवण्यासाठी फसवणूकच करावी लागते असा भ्रम मनातून काढून
फेका. आयुष्य क्षणिक आहे, अनपेक्षित आहे त्यामुळे उद्याचा विचार करून कायमच आज
चांगला जगण्याचा प्रयत्न करा. आपण सारे एकमेकांसाठी आहोत. नव्या वर्षांत या गोष्टी
लक्षांत ठेवूया.
तुम्हा
सर्वांना वर्ष २०१८ च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

No comments:
Post a Comment