हिवाळा
आता पूर्ण भरात आहे. पुढील महिन्यांत थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. यावेळेस
थंडीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सकाळी उठून वाफाळता चहा कॉफी पिण्याची मजा
वेगळीच असते. शिवाय याच दिवसांमध्ये व्यायाम करायचाही दांडगा उत्साह जागा होतो.
दिवसभर स्वेटर, शॉल, जॅकेट्स, मफलर, कानटोपी घालून थंडी पळवायचे उपायही शोधायचे
आणि रात्री मस्त दोनतीन दुलया, रजाई घेऊन झोपायचं.
पण
हे सर्वांसाठीच शक्य असेल असं नाही. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारे लोकही
संख्येनं बरेच आहेत ज्यांना घालायला गरम कपडे नाहीत. शेकोटीची उब नाही. वाफाळता
चहा नाही. रात्री रजईत, ब्लँकेटमध्ये झोपण्याची त्यांची सोय नाही. या थंडीत
त्यांचा विचार करायला विसरू नका. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात. आश्रमशाळा
असतील, अनाथालयं असतील, झोपडपट्टीतील लोक असतील, बाहेरून कामासाठी आलेले आणि
फुटपाथवर राहणारे लोक असतील, ज्यांच्यासाठी आपण नक्कीच काही करू शकतो. तुम्हाला
शक्य असेल तर त्यांच्यासाठी गरम कपडे तुम्ही घेऊ शकता. ते शक्य नसतील तर
तुमच्याकडचे वापरात नसलेले कपडे तुम्ही देऊ शकता. प्रेमाची ही उब त्यांना फार
मोलाची ठरेल. कुठे वृद्धाश्रम असतील तर तिथल्या वृद्धांसाठी काय करता येईल याचा
विचार करा. त्यांना तर कपड्यांसोबत सोबतीचीही उब हवी असते. त्यासाठी फार वेळ
लागणार नाही.
समाजात
राहताना आपण याचं भान कायम राखायला हवं की जर आपण सुस्थितीत असू तर जे तसे नाहीत
त्यांच्यासाठी काही करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती माणुसकीची खूण आहे.
त्याची सक्ती कोणावरच नाही पण आपल्या समाधानासाठीच हे सारं करायचं असतं.
प्रसिद्धीसाठी नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कारण आपणही कदाचित त्यांच्या
जागी असू शकलो असतो. ते झालं नाही याचा जसा आनंद आहे तसंच ज्यांना ते जमलं नाही
त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातला सुखातला आनंदातला थोडा भाग वाटून घेणं ही आपली
जबाबदारी आहे.
प्रेमाची
ही उब देताना आम्ही तुमच्यासोबत आहोत इतका विश्वास जरी त्यांना मिळाला तरी ती मोठी
गोष्ट ठरेल. आपण कोणाचंही जगणं बदलू शकत नाही पण आहे त्या जगण्यात काही आनंदाचे
क्षण नक्कीच देऊ शकतो. हे आपण कराल, करावं अशी आशा आणि अपेक्षाही आहे.
नववर्षांच्या पूर्वसंध्येला मावळत्या वर्षांला आपण या काही सुंदर आठवणी भेट म्हणून
देऊयात. सो लेट्स डू इट!

No comments:
Post a Comment