२०१७
संपायला आता अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. लवकरच २०१८ साल सुरू होणार आहे.
वर्षाच्या शेवटी आपण सारे जसे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतो तसंच नवीन
वर्षांसाठी कोणता संकल्प करायचा यासाठीही विचार करत असतो. मागच्या वर्षी मी २०१७
मध्ये एक कोटी रुपये कमवेन असा संकल्प केला होता. पण तो काही पूर्ण झाला नाही.
म्हणून यावर्षीही मी त्याला मुदतवाढ देणार आहे. पण एक आहे की हा संकल्प काही
माझ्या आवाक्यातला नाही. म्हणजे एका वर्षांत पूर्ण होईल असा तो नाही. त्यासाठी त्याहून
बराच काळ लागेल. ते होत राहील. पण संकल्प करण्यामागे एक स्वतःला प्रोत्साहनं देणं,
स्वतःला काही करण्यासाठी प्रेरीत करणं, जे एरव्ही जमत नाही आणि त्यांतून आनंद
मिळवणं हा एक भाग असतो. त्यामुळे आपण अशाच काही गोष्टींचा विचार करूयात की ज्या
सहज करणं शक्य होतील. मी काही गोष्टी सुचवतोय त्यासाठी. तुम्हीही त्या आवडल्या तर
नक्की करा किंवा तुमच्यासाठी नवीन काही संकल्प शोधून काढा. तुमच्या मित्रांसोबत ते
वाटून घ्या.
तर
या नवीन वर्षासाठी माझे जे संकल्प आहेत ते म्हणजे –
पुस्तकं वाचण्याचा संकल्प. आपण असा संकल्प करूयात की दर
महिन्याला किमान ५०० ते १००० रुपयांची पुस्तके मी विकत घेईन. वर्षभरात मी किमान
१०० पुस्तके तरी वाचण्याचा प्रयत्न करेन. मग ती वाचनालयातली असतील, मित्रांकडून
उधार घेतली असतील किंवा नेटवर ऑनलाईन वाचलेली असोत. या वर्षी मी किमान एका मराठी
मासिकाचा वर्गणीदार होईन. मी माझ्या घरीही मराठी वाचनाची आवड वाढेल यासाठी प्रयत्न
करेन. मुख्य म्हणजे नव्या पिढीला मराठीची गोडी लागेल यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. मी
ज्या कोणत्या समारंभाला उपस्थिती राहीन, वाढदिवस, लग्न, इत्यादी, तिथं पुस्तकांची
भेट देईन. वाचलेल्या पुस्तकासोबतची सेल्फी मी सोशल मीडियावर वेळोवेळी टाकत राहीन.
किमान पाच लेखकांना भेटून त्यांच्याशी त्यांच्या मी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा
करेन. इतरत्रही जेव्हा शक्य असेल तेव्हा आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाला मी तसं
नक्कीच कळवेन. सोशल मीडियावर माझ्या आवडत्या लेखकांना प्रकाशकांना मी फॉलो करेन. अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जायचा प्रयत्न करेन. ते शक्य झालं नाही तरी
स्थानिक पातळीवरील एखाद्या संमेलनाला तरी नक्कीच उपस्थिती राहीन. साहित्यिक
कार्यक्रमांना उपस्थित राहिन. माझ्या गावांत शहरांत कोणी मित्र पाहुणा आला तर
त्याला इथल्या साहित्य संस्था, पुस्तकांची चांगली दुकानं, गॅलरी, वाचनालयं यांना
भेटी द्यायला घेऊन जाईन. कोणी ओळखिचा लेखक असेल तर त्याच्याशीही भेट घडवून देईन.
वाचनसंस्कृती किती खालावली आहे, किती वाईट परिस्थिती आहे
पुस्तक विक्रीची, यावर चर्चा करण्यापेक्षा (मी ती करतोच तरीही) मी वरील
गोष्टींपैकी जास्तीतजास्त गोष्टी प्रत्यक्षात करण्यासाठी प्रयत्न करेन, अगदी प्रामाणिकपणे
मनापासून.
तर हे काही माझे लहान लहान संकल्प आहेत. तुम्हीही तुमचे
काही संकल्प ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करा. तर आपली मराठी
भाषा वाढवण्यासाठी जोपासण्यासाठी लेट्स डू इट!
(शेवटचे
तीन शब्द फार मनावर घेऊ नकाः)

No comments:
Post a Comment