मॉन्सून सुरू झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही
वर्षी तो वेळेत सुरू झाला आहे. निसर्गाची ही कृपा आहे तिचा योग्य उपयोग आपण करून
घ्यायला हवा. मागील महिन्यांत महाराष्ट्रांत अनेक गावांमध्ये पाणी फाउंडेशनच्या
माध्यमातून वॉटर कप स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यात शेकडो गावांनी सहभाग नोंदवला
आणि जल संधारणाची कामे केली. गाव एकत्र येतो तेव्हा अनेक कामं लिलया घडतात हे
पुन्हा एकदा त्यांतून सिद्ध झालं आहे. प्रश्न आहे तो फक्त एकत्र येण्याचा.
सुदैवाची बाब म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी या स्पर्धेत सहभागी होणा-या
गावांची संख्या अधिक होती. पुढील वर्षी ती आणखी जास्त असेल यात शंका नाही. आमीर
खान, किरण राव, सत्यजीत भटकळ, जितेंद्र जोशी या सांरखे लोक मनापासून काम करत आहेत
हे पाहून खरोखरच खूप आनंद होतोय. तुम्ही जर या स्पर्धेत भाग घेतला असेल तर तुमचं
अभिनंदन. नसेल घेतला तर पुढील वर्षी नक्कीच तुमच्या गावासाठी एवढं नक्कीच करा. ही
आपल्या पुढच्या पिढीला दिलेली सर्वोत्तम भेट ठरेल.
आणखी अशीच एक भेट असेल वृक्षांची. पाऊस सुरू
झाल्यानंतर नव्या बीजांना धुमारे फुटतील. निसर्ग त्याचं हे काम करणार आहेच पण
शहरात आणि गावांत जिथे माणसांमुळे निसर्गाची हानी झालेली आहे. तिथं ती भरून
काढण्यासाठी आपणही स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी बीजगोळ्यांचा एक
उपक्रम आपल्याला राबवता येऊ शकतो. विविध देशी झाडांच्या बिया, उदा. कडूनिंब, आंबा,
पिंपळ, वड, चिंच, बोर, फणस, पेरू, इत्यादींच्या बिया एकत्र करून त्यांचा मातीचा
गोळा तयार करायचा आणि तो पडीक मोकळ्या जागी फेकायचा. पावसाच्या पाण्यात हा गोळा
मातीत विरघळतो आणि त्यांतील बिजं जमिनीत रोवली जातात आणि रुजतात आणि अंकुरतात.
याला फारसा खर्च येत नाही. अनेक संस्था असे उपक्रम राबवत असतात. त्यांचा शोध घ्या
आणि त्यांची मदत घ्या.
या मॉन्सुनचं स्वागत आपण अशा प्रकारे करूयात. याच
नव्हे तर पुढच्या प्रत्येक मॉन्सुनच्या स्वागताची तयारी आपण अशा पद्धतीने केली तर
त्यानं आपला निसर्ग भरून पावेल. ज्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे.