Sunday, December 31, 2017

शुभ नव वर्ष २०१८

माझ्या सर्व वाचकांना वर्ष २०१८ च्या आभाळभर शुभेच्छा! काळ आपण बांधून ठेवू शकत नाही. काळाचे असे दिवस, महिना, वर्षांचे तुकडे माणसानं आपल्या सोयीसाठी पाडलेले आहेत. त्यांतून माणसाचा हिशेबीपणा दिसतो. पण त्याचबरोबर आपण किती जगतो हेही कळतं. याच किती जगण्यात आपण कसं जगतो यालाही महत्त्व आहे. खरंतर सर्वांत जास्त महत्त्व त्यालाच आहे. त्यामुळे मागील वर्षभरांत आपण कसे जगलो याची स्वतःशीच उजळणी करत यावर्षी आपण कसे जगणार आहोत याचा विचार करायचा आहे.
आपण हे वर्ष मानसिक आनंदाला देऊ या. आपल्या रोजच्या आयुष्यातील धावपळीनं आपल्या शरीरावर जितका ताण पडतोय त्याहीपेक्षा जास्त ताण आपल्या मनावर पडत असतो. आणि मनाचं स्वास्थ्य जर उत्तम नसेल तर शरीर स्वस्थ राहू शकत नाही. शरीर स्वस्थ नसेल तर मन आनंदी राहणार नाही. हे एक दुष्ट चक्र आहे. त्याचा भेद करायचा असेल तर मनावरचा हा ताण काढणं शिकायला हवं.
मानसिक ताण केवळ विचारांनी घालवता येऊ शकत नाही. त्यासाठी काही कृती आवश्यक असते. कृतीमुळे आपलं मन गुंतून राहतं आणि नको त्या गोष्टींचा विचार बाजूला पडतो. शरीर कामात गुंतून राहीलं की नको ते विचार करायला वेळ भेटत नाही. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक ठरतात आणि मनावरचा अनावश्यक आणि आरोग्यास अपायकारक ताण दूर होण्यास मदत होते.
यावर्षी निराशेला मनात भाडेकरू म्हणून ठेवू नका. आनंदाला ठेवा. तो तुम्हाला दररोज आनंदाचं भाडं देईल. आनंद असेल तर उत्साह येतो. उत्साह असेल तर मनात सकारात्मक विचार येतात. सकारात्मक विचार प्रयत्न करण्यासाठी आपल्याला प्रेरीत करतात. प्रयत्न असतील तर यशाची शक्यता निर्माण होते. जिथं शक्यता आहे तिथं जगण्यास वाव असतो. निराश मनानं शक्यतेपर्यंतचा प्रवास घडू शकत नाही. आनंदी मनच तुम्हाला या शक्यतेपर्यंत घेऊन जातं.
फार काही करण्याची गरज नाही. मनात निराशा असेल तेव्हा तुमच्या आवडीचं काम करा. थोडे स्वार्थी व्हा. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला आनंद वाटेल अशा गोष्टी करा. तग धरून राहा. परिस्थिती बदलत असते. संधीची वाट बघत राहा. कधीतरी ती मिळेल तेव्हा तिच्यासाठी आजच तयार राहा. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी याचा विचार करा की तुमच्या जाण्यानं जगाचं नुकसान होणार नाही, तुमचं होईल. पण तुमच्या असण्यानं तुमच्यासोबतच कदाचित जगाचंही भलं होण्याची शक्यता आहे. हे जग तुमच्या अवती भवतीच असतं. त्यातला कोणताही कोपरा निवडा आणि ते जग बदलण्यास सुरूवात करा. करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. गरज आहे ती चिकाटीची. धैर्याची. सहनशक्तिची. इन्स्टंट असं जगात काहीच मिळत नाही. इन्स्टंट कॉफीलाही काही वेळ लागतो तयार होण्यासाठी. जगणं तर फार कसोशिनं घडवावं लागतं. पण त्याचे फायदेही तुम्हालाच मिळत असतात.

तेव्हा हे नव वर्ष तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगा. निराशेला, हताशेला, नकारात्मक विचारांना गुडबाय करा आणि उत्साहाला, आनंदाला, सकारात्मकतेला घट्टी मिठी मारा. लेट्स डू इट!

Friday, December 29, 2017

नववर्षाच्या शुभेच्छा- एकमेकांना बळ देण्यासाठी




२०१७ आता संपत आलं आहे. सरत्या वर्षांत आपण काय केलं, काय नाही केलं, काय मिळवलं, काय गमावलं याचा ताळेबंद काही जणांनी आता मांडायला सुरूवात केली असेल. सुखाच्या क्षणांची जशी आठवण येऊन हुरहूर वाटत असेल त्याचप्रमाणे दुःखाचे क्षण आठवून डोळ्यांच्या कडाही ओलावत असतील. सन्मानाचे क्षण मनाला उभारी देतील आणि अपमानाचे क्षण अधिक चांगलं करता येण्यासाठी जिदद् देतील.
जे झालं ते बदलता येत नाही. त्याचे बरे-वाईट परिणाम मात्र न चूकता भोगावेच लागतात. त्यामुळे आपण जे करतो ते करण्याआधी थोडा वेळ थांबून विचार करा. तात्कालिक फायद्याच्या आधारे असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे नंतर तुम्हालाच नुकसान होईल. माणुसकीपेक्षा मोठं असं काही नाही, निसर्गापेक्षा मोठं काही नाही, त्यामुळे तुम्ही असं काहीही करू नका ज्यामुळे उद्या तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. भावनेच्या भरात आपण वाहून जातो आणि तो भर ओसरला की जे झालं त्यानं मन विषण्ण होतं. अशी परिस्थिती स्वतःवर ओढवून घेऊ नका.
आपण एकटे असलो तरी आपण कमकुवत आहोत असा विचार कधी करू नका. तुम्हाला जग बदलायची गरज नाही. स्वतःला बदललं तरी खूप झालं. तुमचं कुटुंब तुमच्याकडे बघून आपोआपच बदलेल. फार तर बाहेर जाऊन तुमच्या परीसरातील कोणत्या गोष्टी बदलता येतील त्याचा विचार करा पण तसं करताना स्वार्थाचा विचार करू नका. प्रसिद्धीसाठी काही करू नका. कच-याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, विजेची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, त्यावर संबंधित अधिका-यांना न घाबरता भेटा, चर्चा करा. तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुमचा मान सर्वोच्च असतो. निवडून दिलेले राजकीय नेतेही तुमच्यामुळेच नेते असतात हे विसरू नका. त्यामुळे त्यांच्याशी समान पातळीवरच वागा. तुम्ही स्वतःला लहान समजलात तर सारे तुम्हाला लहान समजून दाबून टाकतील. तसं होऊ देऊ नका. आपल्या नागरी अधिकारांबाबत कायम जागृत असा.
समाज म्हणून देश म्हणून आपली एकजूट टिकून राहीली तरच व्यक्ति म्हणून तुम्हीही टिकून राहाल. समाजाची देशाची प्रगती होते तेव्हाच व्यक्ति म्हणून तुमचीही प्रगती होते. त्यामुळे असं काहीही करू नका किंवा अशा कोणत्याही गोष्टीला पाठींबा देऊ नका जी समाज विघातक असेल, देशाला अडचणीत आणेल. धर्म, जात, देव या खासगी श्रद्धेच्या बाबी आहेत. त्यावरून एकमेकांचा द्वेष करू नका. त्यांतून काहीही साध्य होत नाही. तुमच्या धार्मिक श्रद्धा, तुमच्या जातीय अस्मिता या देशापेक्षा आणि माणुसकीपेक्षा मोठ्या नाहीत हे विसरू नका.
निसर्गाचा सांभाळ करा. तर निसर्ग तुमचा सांभाळ करेल. माणूस म्हणून एक समंजस विचारी प्राणी म्हणून आपली ही जबाबदारी आहे. निसर्गाची हानी होणार नाही, झालेलं नुकसान भरून येण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. पुढच्या पिढ्यांसाठी हा निसर्ग जपून ठेवा.
मनात आणलं तर खूप काही करता येतं. स्वार्थ सोडला तर मोठमोठ्या गोष्टी मिळवता येतात. एकदा प्रयत्न नक्की करा. इतरांची मदत करून खूप आनंद मिळतो. प्रामाणिकपणे वागून सुखाची झोप लागते. पैसा मिळवण्यासाठी फसवणूकच करावी लागते असा भ्रम मनातून काढून फेका. आयुष्य क्षणिक आहे, अनपेक्षित आहे त्यामुळे उद्याचा विचार करून कायमच आज चांगला जगण्याचा प्रयत्न करा. आपण सारे एकमेकांसाठी आहोत. नव्या वर्षांत या गोष्टी लक्षांत ठेवूया.

तुम्हा सर्वांना वर्ष २०१८ च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Wednesday, December 27, 2017

माणसं-प्राणीसृष्टी-निसर्ग जोपासूया

नवीन वर्ष यायला आता आणखी तीन दिवस बाकी आहेत. नववर्षाचे संकल्प काय असावेत यावर आपण मागे बोललो होतो त्यातला आणखी एक संकल्प मी आज सुचवतोय. या नवीन वर्षांत आपण माणसं जोडूयात, प्राणीसृष्टी जोपासूयात आणि निसर्ग वाढवूयात.
माणसाची खरी संपत्ती पैसा, जमीन, सोनंनाणं ही नसते. ते मूल्यवान असतातच पण माणसाची खरी संपत्ती त्याच्या आयुष्यात आलेली माणसं असतात. ही संपत्ती कधीच नष्ट होत नाही. माणसं जोडणं हे वाटतं तितकं अवघड काम नाही. पण अनेकांना ते अवघड वाटतं कारण साध्यासोप्या गोष्टी करणं ते टाळतात. ते प्रेम करत नाहीत. ते विश्वास ठेवत नाहीत. ते व्यवहार आणि भावना यांची गल्लत करतात. ते मैत्री निभावत नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते माणुसकी पाळत नाहीत. मान्य की आपलं प्रत्येकाशी काही जुळत नाही आणि त्याचा आग्रहही धरण्याची गरज नाही. पण आपण सर्वांशी ओळख तर नक्कीच ठेवू शकतो. इतरांचा सन्मान करा, आदरानं वागा बोला, प्रामाणिक रहा, मदतीला धावून जा, हसून भेटा, या गोष्टी करणं खरंच इतकं कठीण आहे का? मला नाही वाटत तसं. एक साधा नियम आहे की तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला परत मिळतं. तेव्हा काय द्यायचं ते तुम्ही ठरवा.

आपल्या सभोवतालची प्राणीसृष्टी जपण्यासाठीही आपण प्रयत्न करायला हवेत. पण त्याचबरोबर आपल्यापासून दूर राहणा-या प्राणीसृष्टीबद्दलही मनात प्रेमाची आपुलकीचीच भावना ठेवायला हवी. माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी अन्य प्राण्यांवर अत्याचार केले, करत आहेत, त्याची जमिन माणसानं बळकावली आणि जमेल तिथं हे प्राणी कसे आपल्याला त्रास दायक ठरतात याचा तो कांगावा करत राहतो. पण आपण त्यांच्यावर काय अन्याय करत असतो याचा त्याला सोयिस्कर विसर पडतो. ही प्राणीसृष्टी नष्ट झाली तर काय होईल याचा एकदा नक्की विचार करा. तुम्हाला आधी वाटेल की बरं आहे कटकट मिटली. पण या प्राण्यांमुळेच निसर्गाचं चक्र समतोल राहण्यास मदत होत असते. हे प्राणी नष्ट झाले तर हा समतोलही बिघडेल आणि त्याचे घातक परिणाम दिसतील. आपल्या हातानं आपला हा विनाश ओढवून घेऊ नका.
माणसं आहेत ती निसर्गामुळे. हवा. पाणी. सूर्यप्रकाश. आकाश. वनस्पती. जमिन. हे आपल्या जगण्याचे अत्यावश्यक घटक आहेत. ते प्रदुषित करू नका. त्याचे घातक परिणाम आपल्याला माहितच आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही. फार काही करायचं नाही त्यासाठी. फक्त तुम्ही निश्चय करा की मी माझा निसर्ग नष्ट करणार नाही, प्रदुषित करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. निसर्ग प्रदुषित झाला नष्ट झाला तर माणुसही नष्ट होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

आपल्या नव्या वर्षांचं स्वागत आपण या संकल्पानं करू यात. सो लेट्स डू इट!

Monday, December 25, 2017

त्यांना प्रेमाची उब द्या...


हिवाळा आता पूर्ण भरात आहे. पुढील महिन्यांत थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सकाळी उठून वाफाळता चहा कॉफी पिण्याची मजा वेगळीच असते. शिवाय याच दिवसांमध्ये व्यायाम करायचाही दांडगा उत्साह जागा होतो. दिवसभर स्वेटर, शॉल, जॅकेट्स, मफलर, कानटोपी घालून थंडी पळवायचे उपायही शोधायचे आणि रात्री मस्त दोनतीन दुलया, रजाई घेऊन झोपायचं.
पण हे सर्वांसाठीच शक्य असेल असं नाही. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारे लोकही संख्येनं बरेच आहेत ज्यांना घालायला गरम कपडे नाहीत. शेकोटीची उब नाही. वाफाळता चहा नाही. रात्री रजईत, ब्लँकेटमध्ये झोपण्याची त्यांची सोय नाही. या थंडीत त्यांचा विचार करायला विसरू नका. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात. आश्रमशाळा असतील, अनाथालयं असतील, झोपडपट्टीतील लोक असतील, बाहेरून कामासाठी आलेले आणि फुटपाथवर राहणारे लोक असतील, ज्यांच्यासाठी आपण नक्कीच काही करू शकतो. तुम्हाला शक्य असेल तर त्यांच्यासाठी गरम कपडे तुम्ही घेऊ शकता. ते शक्य नसतील तर तुमच्याकडचे वापरात नसलेले कपडे तुम्ही देऊ शकता. प्रेमाची ही उब त्यांना फार मोलाची ठरेल. कुठे वृद्धाश्रम असतील तर तिथल्या वृद्धांसाठी काय करता येईल याचा विचार करा. त्यांना तर कपड्यांसोबत सोबतीचीही उब हवी असते. त्यासाठी फार वेळ लागणार नाही.
समाजात राहताना आपण याचं भान कायम राखायला हवं की जर आपण सुस्थितीत असू तर जे तसे नाहीत त्यांच्यासाठी काही करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती माणुसकीची खूण आहे. त्याची सक्ती कोणावरच नाही पण आपल्या समाधानासाठीच हे सारं करायचं असतं. प्रसिद्धीसाठी नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कारण आपणही कदाचित त्यांच्या जागी असू शकलो असतो. ते झालं नाही याचा जसा आनंद आहे तसंच ज्यांना ते जमलं नाही त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातला सुखातला आनंदातला थोडा भाग वाटून घेणं ही आपली जबाबदारी आहे.

प्रेमाची ही उब देताना आम्ही तुमच्यासोबत आहोत इतका विश्वास जरी त्यांना मिळाला तरी ती मोठी गोष्ट ठरेल. आपण कोणाचंही जगणं बदलू शकत नाही पण आहे त्या जगण्यात काही आनंदाचे क्षण नक्कीच देऊ शकतो. हे आपण कराल, करावं अशी आशा आणि अपेक्षाही आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मावळत्या वर्षांला आपण या काही सुंदर आठवणी भेट म्हणून देऊयात. सो लेट्स डू इट!

Saturday, December 23, 2017

जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे





उद्या नाताळ आहे. त्याच्या सर्वांना शुभेच्छा. जरी मी ख्रिश्चन नाही आणि तुमच्यातले बहुसंख्यही ख्रिश्चन नसले तरीही नाताळच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आपल्या धर्माचा सण नाही उत्सव नाही म्हणून तो करायचा नाही, ज्यांचा तो सण आहे त्यांना त्याच्या शुभेच्छा द्यायच्या नाही ही काही सभ्यता नाही. तशी आपली संस्कृतीही नाही. पण अलिकडच्या काळात तथाकथित धार्मिकांनी तुम्ही जर अन्य धर्मांचं गुणगान कराल तर तुम्ही धर्मद्रोही असे फतवे काढणं सुरू केलं आहे. असले करंटे लोक सर्वंच धर्मांत आढळतात. मला अशा लोकांचा आताशा राग येत नाही. मला त्यांची दया येते. एखादा आजारी माणूस असतो ना तसे हे धर्मांध लोक असतात. आजारी माणूस आपल्या आजारपणामुळे त्रस्त असतो तसे हे त्यांच्या धार्मिक श्रेष्ठगंडानं आजारी असतात. आजारी माणूस चीडचीड करतो पण म्हणून आपण त्याच्यावर ओरडत नाही. तो आजारी आहे म्हणून त्याला सांभाळून घेतो तसंच या धर्मग्रस्त लोकांना सांभाळून घेण्याची गरज आहे. त्यांनी ज्यादा चीडचीड केलीच तर सरळ त्यांच्याकडे दूर्लक्षच करा मग.
या विचार-गरीबांना आपण इतर धर्मियांचा राग करून, हेटाळणी करून कोणत्या आनंदाला मुकतो आहोत याचं भान नसतं. वेगवेगळे धर्म आहेत, जाती आहेत, (आता ते आहेत त्याला नाईलाज आहे) त्यांच्या विविध संस्कृती आहेत त्याचा आनंद घ्यायला हवा. त्यांचे सण असतात, कपडे असतात, खाणं-पिणं असतं, संगित, नाच असतो या सर्वांचा आनंद घ्यायला हवा. पण ते सोडून काही मूर्ख हे आपल्या धर्मात बसत नाही, असल्या आरोळ्या ठोकत राहतात. अशावेळी हमखास त्या धर्मातल्या चूकीच्या गोष्टींचा दाखला देऊन आपलं मनं भडकवली जातात. चूकीच्या गोष्टी काय आपल्या धर्मांत नाहीत? खरं तर धर्म चुकीचे नसतात. माणसं चूकीचं वागत असतात व त्यामुळे धर्म बदनाम होतात.
एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी एकमेकांचा दुस्वास मत्सर करण्यात काही लोकांना जो आनंद मिळतो त्याला निव्वळ विकृती म्हणतात. मला खात्री आहे तुम्ही असे विकृत नाही आहात. तुम्ही उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघणारे आहात. त्यामुळेच प्रत्येक धर्मातील चूकीच्या गोष्टी जशा तुम्हाला दिसतात तशाच चांगल्या योग्य गोष्टीही तुम्हाला दिसतात. त्या चूकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि चांगल्या गोष्टी वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल याची मला आशा आहे.

नाताळच्या निमित्तानं आपण या धर्मांधांना पुन्हा सांगूयात की आमचा प्रेमावर विश्वास आहे. द्वेषावर नाही. सो लेट्स जिंगल द बेल अँड से लेट्स डु इट!

Friday, December 22, 2017

संकल्प नव वर्षांचे


२०१७ संपायला आता अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. लवकरच २०१८ साल सुरू होणार आहे. वर्षाच्या शेवटी आपण सारे जसे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतो तसंच नवीन वर्षांसाठी कोणता संकल्प करायचा यासाठीही विचार करत असतो. मागच्या वर्षी मी २०१७ मध्ये एक कोटी रुपये कमवेन असा संकल्प केला होता. पण तो काही पूर्ण झाला नाही. म्हणून यावर्षीही मी त्याला मुदतवाढ देणार आहे. पण एक आहे की हा संकल्प काही माझ्या आवाक्यातला नाही. म्हणजे एका वर्षांत पूर्ण होईल असा तो नाही. त्यासाठी त्याहून बराच काळ लागेल. ते होत राहील. पण संकल्प करण्यामागे एक स्वतःला प्रोत्साहनं देणं, स्वतःला काही करण्यासाठी प्रेरीत करणं, जे एरव्ही जमत नाही आणि त्यांतून आनंद मिळवणं हा एक भाग असतो. त्यामुळे आपण अशाच काही गोष्टींचा विचार करूयात की ज्या सहज करणं शक्य होतील. मी काही गोष्टी सुचवतोय त्यासाठी. तुम्हीही त्या आवडल्या तर नक्की करा किंवा तुमच्यासाठी नवीन काही संकल्प शोधून काढा. तुमच्या मित्रांसोबत ते वाटून घ्या.
तर या नवीन वर्षासाठी माझे जे संकल्प आहेत ते म्हणजे –
पुस्तकं वाचण्याचा संकल्प. आपण असा संकल्प करूयात की दर महिन्याला किमान ५०० ते १००० रुपयांची पुस्तके मी विकत घेईन. वर्षभरात मी किमान १०० पुस्तके तरी वाचण्याचा प्रयत्न करेन. मग ती वाचनालयातली असतील, मित्रांकडून उधार घेतली असतील किंवा नेटवर ऑनलाईन वाचलेली असोत. या वर्षी मी किमान एका मराठी मासिकाचा वर्गणीदार होईन. मी माझ्या घरीही मराठी वाचनाची आवड वाढेल यासाठी प्रयत्न करेन. मुख्य म्हणजे नव्या पिढीला मराठीची गोडी लागेल यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. मी ज्या कोणत्या समारंभाला उपस्थिती राहीन, वाढदिवस, लग्न, इत्यादी, तिथं पुस्तकांची भेट देईन. वाचलेल्या पुस्तकासोबतची सेल्फी मी सोशल मीडियावर वेळोवेळी टाकत राहीन. किमान पाच लेखकांना भेटून त्यांच्याशी त्यांच्या मी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करेन. इतरत्रही जेव्हा शक्य असेल तेव्हा आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाला मी तसं नक्कीच कळवेन. सोशल मीडियावर माझ्या आवडत्या लेखकांना प्रकाशकांना मी फॉलो करेन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जायचा प्रयत्न करेन. ते शक्य झालं नाही तरी स्थानिक पातळीवरील एखाद्या संमेलनाला तरी नक्कीच उपस्थिती राहीन. साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहिन. माझ्या गावांत शहरांत कोणी मित्र पाहुणा आला तर त्याला इथल्या साहित्य संस्था, पुस्तकांची चांगली दुकानं, गॅलरी, वाचनालयं यांना भेटी द्यायला घेऊन जाईन. कोणी ओळखिचा लेखक असेल तर त्याच्याशीही भेट घडवून देईन.
वाचनसंस्कृती किती खालावली आहे, किती वाईट परिस्थिती आहे पुस्तक विक्रीची, यावर चर्चा करण्यापेक्षा (मी ती करतोच तरीही) मी वरील गोष्टींपैकी जास्तीतजास्त गोष्टी प्रत्यक्षात करण्यासाठी प्रयत्न करेन, अगदी प्रामाणिकपणे मनापासून.

तर हे काही माझे लहान लहान संकल्प आहेत. तुम्हीही तुमचे काही संकल्प ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करा. तर आपली मराठी भाषा वाढवण्यासाठी जोपासण्यासाठी लेट्स डू इट! (शेवटचे तीन शब्द फार मनावर घेऊ नकाः)

Wednesday, December 20, 2017

कंडोम्स बंदी आणि कंडम सरकार

सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यानं नुकताच एक फतवा काढून टीव्हीवर सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत कंडोम्सच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातली. त्यांचं असं म्हणणं आहे की यामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. आपल्या देशात काही वर्षांपासून संस्काराच्या नावाखाली जो अतिशयोक्त विनोद सुरू आहे त्यांतला हा आणखी एक ताजा विनोद आहे. पण त्यावर हसण्याचं धाडस मात्र होत नाही. कारण हा विषय वाटतो तितका गंमतीचा नसून ही गंमत अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे.

मूळात सरकारनं लोकांना संस्कार देण्याचं काम करू नये. पालक आणि त्यांची मुलं यांचा हा खासगी प्रश्न आहे. पण सरकार सध्या सर्वांनाच संस्कारी करण्याच्या मागे लागली आहे. संस्काराच्या या वावटळीत लैंगिकतेचा कायमच पहिला बळी जात असतो. ज्या शारिरीक कृतीमुळे आपण अस्तित्त्वात आहोत त्या कृतीबद्दल आपल्या मनात इतकी लाज, संकोच, भिती, न्यूनगंड जर असेल तर आधी आपण आपली मानसिक तपासनी करून घेणं योग्य राहील. एका नैसर्गिक आरोग्यदायी घटनेवर या ना त्या कारणानं बंदी टाकून आपण अनेक नव्या समस्यांना जन्म देत असतो यावर विचार करण्याची गरज आहे.
भारताची प्रचंड लोकसंख्या हा काही छाती ठोकून अभिमानानं मिरवण्याचा विषय नाही. ती एक अत्यंत मूलभूत, गंभीर, जीवघेणी नागरी समस्या आहे जिला खरं तर सर्वोच्च प्राधान्य असायला हवं. पण आपल्या या तथाकथित संस्कारांच्या नावावर तिच्याकडे कायम हेटाळणी, चेष्टा, आणि आता संस्कार घातकी म्हणून पाहिलं जात आहे. हा निव्वळ बालीशपणा आहे की कंडोम्सच्या जाहिराती पाहिल्यामुळे मुलांवर कुसंस्कार होतात. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की सरकारला माणसाच्या जैविक, शारिरीक, मानसिक, भावनिक अवस्थांविषयी, वर्तणुकींविषयी काडीचीही माहिती नाही. एरव्ही त्यांनी असली मूर्खपणाची विधानं केलीं नसती. त्यांच्या या तर्काचा आधार घ्यायचा तर पूर्वी जगात सारं काही सुरळीत होतं आणि मुलं आभाळातून टपकायची आणि लोक त्यांना घरी घेऊन यायचे असा होईल. मुलांनी काही पाहिलं नाही तर त्यांच्यात लैंगिक भावना निर्माण होणार नाहीत असा त्यांचा समज आहे असं जाणवतं. निसर्ग काहीच करत नाही केवळ यांचे संस्कारच सारं काही करतं किंवा करत नाही अशी यांची खात्री आहे. कोणी किती अतार्कीक वागू शकतो याचं हे उत्तम उदाहरण सांगता येईल.

आपल्या देशात लैंगिक शिक्षणाची प्रचंड गरज आहे पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी, कंडोम्सच्या जाहिरातींवर बंदी घालणं म्हणजे तोंड वेडंवाकडं दिसतं म्हणून जेवणच करायचं नाही असा काहीसा प्रकार आहे. या जाहिराती पाहून दहा टक्के मुलांनी जरी कंडोम्स वापरले तरी कुमारी मातांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, सेक्ससाठी कंडोम्स आवश्यक आहे हे समजलं तर त्यांतून उद्भवणारे अनेक रोग वेळीच रोखले जातील. सरकारला जर अशी भिती असेल की यामुळे मुलं मुक्तपणे सेक्सकडे वळतील तर त्यानं घाबरण्याची गरज नाही. मुक्त लैंगिकतेमुळे कोणताही समाज लयास गेला नाही. त्याची कारणं वेगळी असतात. त्यामुळे अशा भंपक कृती करणं सरकारनं टाळावं हे योग्य. 

कापडी पिशव्या आणि पर्यावरण रक्षण

एका साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी आपण आज बोलूयात. पर्यावरण हा आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अत्यावश्यक असा महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय माणूस आणि अन्य कोणतीही सजीव सृष्टी जगूच शकणार नाही. पण असं दिसतंय की या पर्यावरणाचं नुकसान करण्यांत आपण खूपच आघाडी घेतली आहे. आपण त्यात आता इतके अनुभवी झालो आहोत की या गोष्टींचं आपल्याला आता काही वाटेनासं झालंय. कित्येकदा कळत आणि बहुतेकदा नकळतच आपण या गोष्टी करतो. त्यामुळे आपण पर्यावरणाची हानी करतोय ही जाणीवही आपल्याला होत नाही. ही यातली सर्वांत भयानक गोष्ट आहे. जर आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय ही जाणीवच आपल्याला होत नसेल तर मग आपण पर्यावरणाचं रक्षण करण्याचं मनात आणणार तरी कसं?

ही जाणीव मग पर्यावरणच आपल्याला करून देते. मुंबईत नुकताच मुसळधार पाऊस झाला होता. ज्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं. हे सारं पाणी जे समुद्रात जाणं अपेक्षीत होतं तसं मात्र ते गेलं नाही. कारण ज्या गटारींतून ते पाणी वाहणं अपेक्षित होत्या त्या तुंबल्या होत्या. त्या तुंबल्या होत्या त्यांत साठलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे. प्लास्टिक सडत नाही त्यामुळे ते नाश पावत नाही. त्यामुळे ते जिथं कुठे असेल तिथं केवळ नुकसान करण्यापलीकडे काहीच करत नाही. ते उकीरड्यावर राहीलं तर गाई-म्हशी-शेळ्या ते प्लास्टिक खातात आणि त्याचे गोळे त्यांच्या पोटात साठत राहतात. प्लास्टिक गटारात गेलं की पाणी अडून राहतं. ते समुद्रात गेलं की मासे त्यात अडकून राहतात. जेव्हा वादळं येतात तेव्हा समुद्रातला हा प्लास्टिक कचरा पुन्हा आपल्याकडेच फेकला जातो. जमिनीत प्लास्टिक मुरलं की जमिनीचा कस निघून जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाचं केवळ आणि केवळ नुकसानच होतं आणि वर्षानुवर्षँ ते तसंच होत राहतं कारण ते सडत नाही. कारण आपण प्लास्टिक पिशव्या वापरत राहतो म्हणून.
पर्यावरण रक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे आपण सामान्य गोष्टीच करायच्या आहेत. मोठ्या गोष्टी आपण सरकार आणि निसर्ग यांच्यावर सोपवूयात. आपण काय करू शकतो –
१-       आजपासून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या वापरणं पूर्णपणे बंद करू शकतो. त्याऐवजी कापडी आणि कागदी पिशव्या वापरू शकतो.
२-       प्लास्टिकचा कचरा कमीतकमी होईल याची काळजी घेऊ शकतो.
३-       प्लास्टिकच्या पिशव्या आपण गटारं, समुद्र, नद्या, तळी, विहीरीत टाकण्यापासून स्वतःला आणि इतरांना थांबवू शकतो.

सुरूवात म्हणून आपण या तीन साध्या गोष्टी करू शकतो. तेवढं केलं तरी विश्वास ठेवा की आपण पर्यावरण रक्षणात एक मोठी मजल मारू शकतो. तेव्हा लेट्स डू इट!