सर्वोच्च
न्यायालयानं काही दिवसांपूर्वी एका याचिकेवर निकाल देताना असं म्हटलं की चित्रपटगृहांत
राष्ट्रगीत सुरू असतांना उभं राहण्याची आवश्यकता नाही. तशी सक्ती कोणावर करता
येणार नाही. राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहीलं नाही म्हणून अनेक लोकांना मारहाण
झाली होती. स्वतःला देशभक्त समजणा-यांनी या तथाकथित देशद्रोह्यांना मारलं होतं. पण
असं करताना संबंधीत व्यक्ति का उभी राहिली नाही याचा विचार करण्याची त्यांना गरज
वाटली नव्हती. अर्थात हा सर्व सध्याच्या निर्लज्ज देशभक्तीपर राजकारणाचा एक भाग
आहे हे सांगायलाच नको. त्यामुळे या अतिरेकी देशभक्तांना न्यायालयानं चांगली तोंडात
मारली ते बरंच झालं.
पण
तरीही या विषयावर आपण थोडी चर्चा करणं गरजेचं आहे. राष्ट्रगीत सुरू असताना
आपल्यापैकी सारेच उभे राहतात यात मला शंका नाही. जे उभे राहू शकत नाहीत त्यांना
तशी कारणंही असतील. ते आजारी असतील, दिव्यांग असतील. पण तेही सावध असतील. शांत
असतील. राष्ट्रगीताचा आदर करणं हा महत्त्वाचा भाग असतो जो या कृतींतून दिसून येतो
जसा तो उभं राहण्यांतून दिसू येतो. आदर दाखवणं महत्त्वाचं त्यासाठी उभंच राहावं हे
काही गरजेचं नसतं. हा आदर आपण सारेच भारतीय दाखवतो.
दुसरा
मुद्दा असतो प्रेमाचा. देशावर आपलं प्रेम असतं. हे प्रेम व्यक्त करताना दरवेळी
सावधान स्थितीत राहणं गरजेचं नसतं. खेळात जेव्हा आपण जिंकतो आणि राष्ट्रगीत सुरू
होतं तेव्हा खेळाडू, त्यांचे समर्थक भारावून आनंदानं मैदानात फे-या मारतात तेव्हा
त्यात राष्ट्रगीताचा अनादर होत नाही. ते प्रेम असतं. ही गोष्ट कोणी विसरायला नको.
तसं करणं चूकीचं नाही. घरी टीव्ही बघताना एखाद्या कार्यक्रमांत राष्ट्रगीत सुरू
असतं, तेव्हाही ताडकन उभं राहण्याची गरज नसते. आपण आपल्या कामांत असतो. अशावेळी
आपण सावध झालो नाही म्हणून आपण राष्ट्रगीताचा अनादर करतो असं नसतं. आदर व प्रेम
मनात असला की तो कृतीतून येतोच पण जेव्हा तो तसा येत नाही तेव्हा तो आदर व प्रेम
नसतो असं मानायचं काही कारण नाही.
राष्ट्रगीताचं
गांभीर्य राहायला हवं म्हणून काही नियम आहेत आणि त्यासाठी काही खास प्रसंग असतात
जिथे ते पाळते जातात आणि पाळले गेलेच पाहिजेत. उदा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी
किंवा एखाद्या कार्यक्रमांत. राष्ट्रगीतासोबतच वंदे मातरम् म्हणतानाही हा आदर
दाखवायला हवा. तो दाखवतोही आपण. काही मुसलमानांना जरी धार्मिक कारणावरून वंदे
मातरम् म्हणायला आक्षेप असला तरीही त्यांची संख्या अत्यल्प आहे. आपण त्यांच्याही
मताचा आदर करायला हवा. कारण केवळ वंदे मातरम् म्हणत नाही म्हणून ते देशद्रोही होत
नाहीत. सर्वसामान्य मुसलमानाला तर त्याविषयी काही आपत्ती नसते. त्याचं या देशावरचं
प्रेम, आदर इतरांच्या तुलनेत कधीच कमी नसतं. पण जेव्हा यात राजकारण व धर्म शिरतो
तेव्हा अडचणी सुरु होतात. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे हा प्रकार सुरू झाला आहे.
पण सुजाण लोक त्याला विरोध करतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. सर्वोच्च
न्यायालयानंही ही बाब अधोरेखित केली आहे.