लग्नाची एक व्याख्या ही, लग्न हा एक सामाजिक करार आहे, अशी आहे. जिथं
करार असतो तिथं काही कलमं असतात, नियम असतात आणि लग्न झाल्यानंतर संसार करताना
त्या नियमांचं कलमांचं पालन व्हावं अशी अपेक्षा असते. आपल्या हिंदू संस्कृतीत सप्तपदीच्या
वेळी जे मंत्र म्हटले जातात त्यांत उत्तम पद्धतीनं या अपेक्षांची माहिती वधुवरांना
करून दिली जाते. अर्थात हे मंत्र संस्कृतमध्ये आहेत व ते समजावून सांगण्याची
जबाबदारी ना पंडित घेत ना ते समजून घेण्याची काळजी वधुवर घेत. असो. आजचा विषय आहे
लग्नाआधी काय काळजी घ्यावी यासंबंधीचा. आपल्याकडे लग्नाआधी ज्या गोष्टी केल्या
जातात त्यात मुलाची चौकशी, त्याच्या घरच्यांची चौकशी केली जाते. मुलाला नोकरी आहे
का, पगार काय, नोकरी टिकावू आहे का, त्याचं वय काय, त्याला व्यसनं आहेत का,
त्याच्या घरी शेती आहे का, स्वतःचं घर आहे का, अशा साधारण चौकशा केल्या जातात. तर
मुलीकडे ती गोरी आहे का, तिचा बाप श्रीमंत आहे का या दोन गोष्टींची बहुधा चौकशी
केली जाते. यातही लोक भरपूर खोटं बोलतात. आपल्या इथली जवळपास सारी लग्नं खोट्यावर
बेतलेली असतात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. या खोट्या गोष्टींमध्ये
मुलांच्या बाजूनं, त्यांची नोकरी, पगार, व्यसनं, आरोग्य इत्यादी गोष्टी लपवल्या
जातात तर मुलीच्या बाजूने तिचं वय, आरोग्याची स्थिती, तिची लफडी, शिक्षण अशा
गोष्टी साधारणपणे लपवण्यात येतात. यात दोन्ही बाजूंचा एकच विचार असतो की आधी लग्न
होऊ द्या, ते झालं की जी काय समस्या असेल ती ते लोक बघून घेतील. आधीच जर सा-या
गोष्टी सांगितल्या तर लग्न होणंच कठीण होऊन बसेल. पण या मानसिकतेमुळे असंख्य संसार
नंतर उध्वस्त होतात.
आता काळ बदलत आहे त्यामुळे लग्नाआधी करण्याच्या ज्या गोष्टी आहेत
त्यात काही बदल होणं आवश्यक आहे.
१-
आपण
लग्नासाठी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम आहोत का हे आधी बघणं व त्याची माहिती
समोरच्या पक्षाला देणं. शारिरीक गोष्टींमध्ये तुम्हाला काही रोग आहेत का, घरी काही
अनुवंशीक रोग आहेत का याबरोबरच काही महत्त्वाच्या चाचण्या करणंही गरजेचं आहे.
यातली सर्वांत महत्त्वाची चाचणी आहे एडस् या रोगाची. सिकलसेल हा आणखी एक रोग आहे.
थॅलसिमियाही. हे दोन्ही रोग टाळण्यासाठी मुलामुलींचे रक्तगट एकमेकांना पुरक आहेत
ना हे बघणं गरजेचं असतं. आणखी एक बाब म्हणजे मुलगी मुलगी एकमेकांनी लैंगिक सुख
देण्यास सक्षम आहेत की नाही हे बघणं. पुरुष असतील तर त्यांनी त्यांचा स्पर्म काउंट
घेणं गरजेचं आहे. स्त्रीयांनी त्या मूल धारण करण्यास सक्षम आहेत का ते पहाणं
गरजेचं आहे. मानसिक बाबींमध्ये अनुवंशीक मानसिक रोग आहेत का याची चौकशी करणं
महत्त्वाचं ठरेल. या सर्व गोष्टी तपासून एकमेकांना शेअर करायला हव्यात.
२-
दुसरी
गोष्टी आहे तुमची आर्थिक परिस्थिती जशी आहे तशी ती सांगणं.
३-
तुमचं
शिक्षण वय याची खरी माहिती देणं.
४-
घरासंबंधीची
खरी माहिती देणं.
५-
तुमच्या
भविष्यातील योजनांची माहिती देणं.
अलीकडेच परेश मोकाशी
यांचा चि. व चि. सौ. कां. हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात लग्नाआधी मुलगी
आपल्या भावी सासरी राहायला जाते. माझ्या मनात हीच कल्पना होती आणि त्यावर चित्रपट
काढला म्हणून परेशजींचं अभिनंदन. मुलींना लग्नानंतर एकदम हजारो गोष्टींशी तडजोड
करत जगावं लागतं त्याचे किती भयानक परिणाम त्यांच्यावर होतात याची कल्पनाही करवत
नाही. आपण दुस-याच्या घरी कधी गेलो तर तिथं रात्री झोपही लागत नाही. कारण वातावरण
बदललेलं असतं. त्यामुळे मुलींना लग्नाआधी त्यांच्या सासरी जर महिनाभर राहता आलं तर
त्यांची मानसिक तयारी होऊ शकते आणि एकमेकांशी मोकळा संवाद साधता येऊन अधिक गोष्टी
समजून घेता येतात. यात अर्थात दोन्ही पक्ष किती समंजस आहेत यावरच अशा गोष्टींचं
यशापयश ठरतं. पण हे व्हायला हरकत नाही.
आता वर सांगितलेल्या
गोष्टी प्रामाणिकपणे फार लोक अंमलात आणणार नाहीत हे उघड सत्य आहे. तशा गोष्टी
सांगितल्या तर होऊ घातलेली साठसत्तर टक्के लग्नं मोडतील यात शंका नाही. पण नंतर
संसार मोडून आयुष्य उध्वस्त होण्यापेक्षा लग्न मोडणं कधीही चांगलं. हाही मुद्दा
लक्षांत घ्यायला हवा की कोणीही परिपूर्ण नसतो त्यामुळे त्याचा हव्यास धरू नये पण
किमान प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं चूकीचं ठरणार नाहीत. प्रश्न सांगितले तर त्यावर
काही उपाय करता येऊ शकतात, मुख्य म्हणजे फसवणूक अपेक्षाभंग टळतो. त्यामुळे नवीन
पिढीनं यावर जरा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आशा करणं चूकीचं होणार नाही. काही
विवाहसंस्थांमध्ये अशा गोष्टींवर भर दिला जातोय ही चांगली गोष्ट आहे पण त्याचं प्रमाण
अत्यल्प आहे ते वाढीस लागावं आणि एकंदरीतच लग्नाआधीच्या काही महत्त्वाच्या बाबींची
पूर्णता केली जावी हे कधीही चांगलं. पुढचे अनेक संघर्ष यामुळे कमी होण्यास मदत
होईल.
No comments:
Post a Comment