Saturday, May 27, 2017

# मोफत सॅनिटरी नॅपकीन्स

सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त व्हावेत यासाठी अनेक महिला संघटना काम करीत आहेत. त्यांच्या कामाला आमचा पाठींबा आहेच पण याशिवाय ज्यांना ही नॅपकिन्स घेणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना ती मोफत पुरवली जावीत ही मागणीही आम्ही करतो आहोत. सबल राष्ट्र हवे असेल तर त्या राष्ट्राचे नागरिकही सबल असावे लागतात. सबल नागरिक हे समर्थ व्यक्तिंमधून तयार होत असतात. समर्थ व्यक्तिंना समर्थ आईवडील जन्म देत असतात. मुख्यतः आईचा यात मोठा सहभाग असतो. आई जर दूर्बळ असेल तर तिची संततीही दूर्बळच जन्माला येईल. या आईच्या, म्हणजेच या स्त्रीच्या आयुष्य़ातील प्रत्येक कालखंडात मासिक पाळी हा एक अविभाज्य भाग असतो. तो तिच्या केवळ शरिराशी नव्हे तर मनाशीही जोडलेला असतो. या काळात जर तिच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्याचे दीर्घ परिणाम तिला भोगावे लागतात. ही आपल्या सर्वांची जबाबदारी असायला हवी की प्रत्येक स्त्रीची तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान काळजी घेणं. तिच्याकडे आरोग्याकडे लक्ष देणं. समाज म्हणून, नातेवाईक म्हणून, मित्र म्हणून अन्य सर्व स्त्रीपुरुषांनी ही जबाबदारी घ्यायलाच हवी. स्त्रीचं आरोग्य तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान उत्तम राहिल तसेच तिला एक माणूस म्हणून सन्मानपूर्वक जीवन जगायला मिळेल ज्यात कोणत्याही लज्जेचा अंतर्भाव असणार नाही यासाठी या मागण्या आम्ही करीत आहोत. त्याला सर्वांचा पाठींबा मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. 

No comments:

Post a Comment