उत्तर प्रदेशातील
बनारस हिंदू विद्यापीठात एका मुलीवर मागिल आठवड्यात काही गुंडांनी बळजबरी करण्याचा
प्रयत्न केला. त्याबाबत तक्रार केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं काही कारवाई
करण्याऐवजी त्या मुलींवरच तुम्हीच या प्रकाराला जबाबदार कसे आहात हे सांगितलं.
त्यानंतर या मुलींनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांतून आपल्या तथाकथित उच्च
संस्कृतीचा बुरखा पुन्हा एकदा फाडला गेला. आपली मनोवृत्ती अजूनही किती कोती आहे,
आपला समाज अजूनही किती पुरुषी आहे आणि स्त्रियांबाबत घडलेल्या कोणत्याही
अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरच कशी शिताफिनं ढकलण्यात येते हे या घटनेतून
पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एकीकडे मुलींना शिकवा, वाढवा, त्यांना मोकळं जगू द्या
अशा घोषणांचा पाऊस पडतो तर दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली त्यांच्यावर भेदभाव
करण्यात येतो. त्यांच्यावर या ना त्या कारणानं वेगवेगळी बंधनं टाकण्यात येतात.
काही अनुचित गोष्टी घडल्या तर त्यासाठी पुन्हा त्यांनाच जबाबदार धरण्यात येतं. हे
आपण कितीकाळ सहन करणार हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. स्त्रियांच्या
सहनशक्तिची परिक्षा बघू नका. त्यांनी जर आपली मर्यादा ओलांडली तर त्यांच्यापुढे
सारा समाज वाहून जाईल. आपल्या समाजाची जी काही चांगली सभ्यता, संस्कृती, परंपरा
आहे ती टिकवण्यात या स्त्रियांचाच मोठा सहभाग आहे. पण त्यांनाच त्यांचा सर्वांत
मोठा फटका बसत आला आहे. त्यामुळे स्त्रियांनी जर हे सभ्यता-संस्कृतीचं जोखड फेकून
दिलं तर सारा समाजच रसातळाला जाईल. ही वेळ त्यांच्यावर येणार नाही यासाठी आपण
सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. स्वातंत्र्य हे विनाशर्त द्यायला हवं. जबाबदारीचं
भान ठेवणं योग्यच आहे पण त्यासाठी आपणही आपली जबाबदारी पूर्ण करण्याची गरज आहे. ही
जबाबदारी आहे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची, त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाचा सन्मान ठेवण्याची. त्यांना स्वातंत्र्य देऊन आपण त्यांच्यावर
नाही तर स्वतःवर उपकार करत आहोत हे लक्षात ठेवा. कारण स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व
हे पुरुषालाही सहाय्यक ठरतं. तिचं सक्षम असणं म्हणजे समाजाची शक्ति वाढणं. याचा
विसर पडू देऊ नका.
No comments:
Post a Comment